हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील राय येथील अशोका युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक अली खान महमुदाबाद यांना दिल्लीमधून अटक करण्यात आली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि महिला लष्करी अधिकाऱ्यांबाबत वादग्रस्त टिप्पणी प्रकरणात त्यांच्यावर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत.
डीसीपी क्राइम नरेंद्र कादियान यांनी पत्रकार परिषदेत अटकेची पुष्टी करत सांगितले की, अली खान यांना दिल्लीहून अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले जाईल. पोलिस पथक त्यांच्यासाठी पाच दिवसांच्या रिमांडची मागणी करणार आहे.
महमुदाबादने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, १४ मे रोजी महमुदाबाद यांनी आपल्या ९ मेच्या पोस्टसंदर्भात लिहिले की, सर्वसामान्य जनतेकडून युद्धाबद्दलचा जो ज्वर दिसून येत होता, त्याबद्दल आपण चिंता व्यक्त केली होती. युद्धामुळे गरिबांचे नुकसान होते तर राजकारणी आणि शस्त्रनिर्मिती कंपन्यांचे उखळ पांढरे होते. जे लोक कोणताही विचार न करता युद्धाचे समर्थन करतात ते कधीही त्या परिस्थितीला सामोरे गेलेले नसतात किंवा त्या युद्धस्थळाला त्यांनी कधीही भेट दिलेली नसते.
सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांच्याबद्दलही महमुदाबाद यांनी लिहिले होते. त्यांनी म्हटले होते की, या महिला अधिकाऱ्यांची स्तुती अनेक उजव्या विचारसरणीचे लोक करत आहेत, त्याचा आनंद आहे. पण याच लोकांनी मॉब लिचिंग, बुलडोझर कारवाईबद्दलही आवाज उठवायला हरकत नव्हती. या महिला अधिकाऱ्यांनी जे मांडले ते महत्त्वाचे असले तरी प्रत्यक्ष रणांगणावरच्या स्थितीशी ते मिळतेजुळते असायला हवे होते. नाहीतर ते केवळ एक ढोंग ठरेल.
हे ही वाचा:
मुंबईत बॉम्बस्फोट होणार असल्याच्या कॉलमुळे उडाली खळबळ
जम्मू- काश्मीरच्या शोपियानमध्ये दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक
बांगलादेश: शेख हसीना यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला अटक!
सुधांशू त्रिवेदी यांच्या हस्ते टर्माईट्स, वामपंथी दीमक पुस्तकांचे प्रकाशन
प्राध्यापक अली खान यांच्याविरुद्ध पहिला गुन्हा जटेड़ी गावाचे सरपंच यांच्या तक्रारीवरून दाखल झाला आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १९६, १९७, १५२ आणि २९९ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. दुसरा गुन्हा हरियाणा महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणु भाटिया यांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला असून, सोशल मीडियावर वादग्रस्त टिप्पणी केल्याचा आणि आयोगाच्या नोटीसकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात BNS च्या कलम ३५३, ७९, १५२ आणि १६९(१) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
डीसीपी कादियान यांनी सांगितले की, प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, प्राध्यापक अली खान यांच्याकडून इतर बाबींचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणामुळे केवळ सोशल मीडियावर होणाऱ्या वादग्रस्त कृतींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले नसून, सार्वजनिक जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या व्यक्तींच्या भूमिकेवरही गंभीर चर्चा सुरू झाली आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ बाबत काही अराजक प्रवृत्तींकडून केलेल्या टिप्पणींवर प्रशासनाकडून योग्य ती कारवाई केली जात आहे. अनेकांनी सोशल मीडियावरून अशोभनीय मजकूर शेअर केला असून, तो हटवण्यात आला आहे आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही राजकीय नेत्यांनीही महिला लष्करी अधिकाऱ्यांवर वादग्रस्त टिप्पणी केली असून, त्याविरोधात देशभरात कठोर कारवाईची मागणी होत आहे.
