शेख मुजीबुर रहमान यांच्या ‘मुजीब: द मेकिंग ऑफ अ नेशन’ या बायोपिकमध्ये पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांची भूमिका साकारणारी लोकप्रिय बांगलादेशी अभिनेत्री नुसरत फारिया हिला रविवारी (१८ मे) ढाका विमानतळावर अटक करण्यात आली. २०२४ च्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान हिंसाचार भडकवण्याचा आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा अभिनेत्रीवर आरोप आहे.
३१ वर्षीय अभिनेत्रीला आज सकाळी थायलंडला जात असताना शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इमिग्रेशन चेक पॉईंटवरून अटक करण्यात आली. इंडिया टुडेच्या बातमीनुसार, ढाका विमानतळाच्या इमिग्रेशन युनिटमधील एका सूत्राने सांगितले की, सरकारविरोधी निदर्शनांदरम्यान हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली दाखल केलेल्या खटल्याच्या संदर्भात फारियाविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले होते.
शेख हसीना यांच्या समर्थकांच्या नेतृत्वाखालील चळवळींना आर्थिक मदत केल्याचा आणि हिंसक संघर्षांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिल्याचा आरोप फारियावर आहे. या आंदोलनांदरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे देशभरात अराजकता निर्माण झाली, त्यानंतर शेख हसीना यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यांना भारतात आश्रय घ्यावा लागला.
बड्डा झोनचे सहाय्यक पोलिस आयुक्त शफीकुल इस्लाम यांनी अटकेची पुष्टी केली. ते म्हणाले की, फारियाला प्रथम वातारा पोलिस ठाण्यात नेण्यात आले आणि नंतर ढाका मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या गुप्तहेर शाखेकडे (डीबी) सोपवण्यात आले, जिथे तिची चौकशी केली जात आहे. सध्या, अभिनेत्रीची अटक ही बांगलादेशच्या विद्यमान सरकारकडून शेख हसीना यांच्या समर्थकांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईचा एक भाग मानली जात आहे.
हे ही वाचा :
पाकिस्तानकडून भारताची पुन्हा नक्कल, शिष्टमंडळ पाठवणार परदेशात !
ऑपरेशन सिंदूरच्या यशानिमित्त दिल्लीत भव्य ‘तिरंगा यात्रा’
लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी सैफुल्ला खालिदचा पाकिस्तानच्या सिंधमध्ये ‘गेम’
धर्म विचारून खरचं मारलं का?, असा प्रश्न पडणाऱ्या राजकारण्यांनी आमच्या समोर या!
दरम्यान, नुसरत फारियाची गणना बांगलादेशातील आघाडीच्या तरुण अभिनेत्रींमध्ये केली जाते. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मुजीब: द मेकिंग ऑफ अ नेशन’ या बायोपिकमध्ये तिची सर्वात प्रसिद्ध भूमिका होती, ज्यामध्ये तिने शेख हसीना यांची भूमिका केली होती. हा चित्रपट प्रसिद्ध भारतीय दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केला होता.
