देशविरोधी कारवाया आणि आयएसआय एजंटशी असलेल्या संबंधांप्रकरणात हरियाणामधील ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्रा हिला अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. अशातच आता उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कारवाई करत आणखी एका हेराला अटक केली आहे. शहजाद असे या आरोपीचे नाव असून तो व्यावसायिक आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याला मुरादाबाद येथून ताब्यात घेण्यात आले.
शहजाद या व्यावसायिकाला पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय) साठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. एटीएसने जारी केलेल्या निवेदनानुसार, इस्लामाबादच्या गुप्तचर संस्थेच्या संरक्षणाखाली भारत- पाकिस्तान सीमेवरून तस्करी करण्यात शहजादचा सहभाग असल्याची गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. तो राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहिती त्याच्या हँडलरना देत होता, असे समोर आले आहे. तसेच शहजाद हा गेल्या काही वर्षांत अनेक वेळा पाकिस्तानला गेला होता. तो सीमेपलीकडून सौंदर्यप्रसाधने, कपडे, मसाले आणि इतर वस्तूंची तस्करी करत होता. त्याचा हा बेकायदेशीर व्यवसाय आयएसआयच्या गुप्त कारवाया लपवण्यासाठी होता, असे समोर आले आहे.
तपासात असेही समोर आले की, शहजाद भारतातील आयएसआय एजंटना पैसे आणि भारतीय सिम कार्ड पुरवत असे. तसेच तो रामपूर जिल्हा आणि उत्तर प्रदेशच्या इतर भागातील लोकांना आयएसआयसाठी काम करण्यासाठी पाकिस्तानात पाठवत असे. माहितीनुसार, या व्यक्तींसाठी व्हिसा आणि प्रवास कागदपत्रे आयएसआयच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने तयार करण्यात आली होती.
लखनऊमधील एटीएस पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिताच्या कलम १४८ आणि १५२ अंतर्गत शहजादविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
हे ही वाचा:
ऑपरेशन सिंदूरच्या यशानिमित्त दिल्लीत भव्य ‘तिरंगा यात्रा’
पाकिस्तानकडून भारताची पुन्हा नक्कल, शिष्टमंडळ पाठवणार परदेशात !
शक्तिपीठ देवीपाटन मंदिरात पर्यटनाला चालना
खालच्या पातळीवरचे राजकारण काँग्रेसला संपवणार!
पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना संवेदनशील माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली हरियाणातील एका युट्यूबरला अटक केल्यानंतर काही दिवसांनी शहजादला अटक करण्यात आली आहे. युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिने २०२३ मध्ये पाकिस्तानला भेट दिली होती. कमिशनद्वारे व्हिसा मिळवून ही भेट केली होती. या काळात ज्योतीची भेट पाकिस्तान उच्चायोगातील कर्मचारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिशशी झाली, ज्याच्याशी तिचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले. दानिशच्या माध्यमातून ज्योतीची ओळख पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या इतर एजंट्सशी झाली, ज्यात अली अहसान आणि शाकीर उर्फ राणा शाहबाज यांचा समावेश होता. पुढे ज्योती व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मद्वारे या एजंट्सच्या संपर्कात राहिली. ती सोशल मीडियावरही पाकिस्तानच्या बाजूने सकारात्मक प्रतिमा सादर करत होती, असे आढळून आले होते. शिवाय संवेदनशील माहितीही शेअर केल्याचे उघडकीस आले.
