उमेदीच्या काळात खो खोच्या मैदानावर या खेळाचा ध्यास घेऊन कार्यरत असणारे दादरच्या विजय क्लबचे खेळाडू व क्रीडा संघटक अनिल गोखले यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी शनिवारी सकाळी निधन झाले. सुरुवातीपासून त्यांच्या क्रीडाप्रेमी घरात खो खो खेळाचा व कार्यकर्त्याचा वारसा चालत आलेला होता.त्यांचे मोठे बंधू दिवंगत आनंद गोखले हे वन गेम वन फेडरेशन संघटनेपूर्वी अखिल भारतीय शारीरिक शिक्षण महामंडळाच्या अधिपत्याखाली असलेल्या खो खो विभागाचे सर कार्यवाह होते.नंतर खो खो महामंडळावर देखील पदाधिकारी होते.
ते स्वतः महाराष्ट्र शासनाच्या गृह निर्माण महामंडळावर (म्हाडा) वरिष्ठ अधिकारी म्हणून ते कार्यरत असल्याने प्रशासकीय व व्यवस्थापक कामकाजाचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. तसेच त्यांचे सहकार्य खेळाडूंना निवास व्यवस्था म्हाडाकडून होण्यासाठी होत असे. तोच वसा धाकटे बंधू अनिल यांनी सुरू ठेवला होता. गोखले हे स्वतः निवृत्त झाल्यावर त्यांनी खो खो संघटनेवर काम करण्याची इच्छा प्रकट केली. या खेळाच्या विकासासाठी पूर्णवेळ मुंबई खो खो संघटनेत प्रमुख कार्यवाह पद स्वीकारून सर्व सदस्यांना बरोबर घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने ते कार्यरत होते. त्यांनी राज्य आणि जिल्हा संघटनांना घटना व नियमावलीचे चौकटीत राहून कार्यरत रहाण्यास भाग पाडले.
विविध जिल्हा संघटनांवर होणाऱ्या विविध अन्यायाची वाचा राज्य खो खो संघटनेकडे लेखी स्वरूपात करत.यास राज्य संघटनेने देखील सहकार्य केले.मुंबईच्या राज्य संघटनेवर असलेल्या पदाधिकाऱ्यांना व सदस्यांना खो खो. च्या भल्यासाठी हे काम करण्यास भाग पाडत. त्या वेळच्या राज्य संघटनेने नव्याने घटना बदल,खो खो मराठीमध्ये सुधारित नियमावली आणि नव्याने सांख्यिकी सुधारित आवृत्ती करण्यास देखील भाग पाडले. या त्यांच्या गोष्टींना राज्य संघटनेचे सरचिटणीस माधवराव पाटील यांनी त्यांच्या पदाधिकारी मंडळींनी नेहमीच सहकाराचा हात दिला.राज्य संघटनेने तांत्रिक समितीस अधिकार देऊन नव्याने मराठी नियमावली करण्यास मनोहर साळवी यांच्यावर पूर्ण जबाबदारी दिली.
या समितीत स्वतः गोखले, अनंत भाताडे आणि अध्यक्ष वासुदेव ठाणेकर होते. ही नियमावली प्रसिद्ध झाल्यावर अशीच इंग्रजी प्रत देखील तयार करावी, असे राज्य संघटनेत ठरले.या सर्व कामात इंग्रजीचा गाढा अभ्यास अनिल गोखले यांच्याकडे होता. यांनी दिलेले हे योगदान कधीच विसरता येणारे नाही. अनिल गोखले या नव्या नियमावलीची इंग्रजी प्रत देखील प्रसिद्ध केली. या मराठी आणि इंग्रजी सुधारित प्रती मात्र साऱ्या देशात नंतर जागतिक स्तरावर कौतुकास्पद ठरली. हे विविध राज्यांतील प्रतिनिधी आणि सदस्यांनी सांगितले. पुढे मात्र नव्याने आलेल्या राज्य संघटनेच्या कार्यकारिणीने यामध्ये काही प्राथमिक फेरबदल करून पुस्तके प्रसिद्ध केली. योग्य सुधारित बदल केलेले मूळ पुस्तकावरील योगदान दिलेल्या पहिल्या मंडळींची नावे पुसून टाकली.याचं शल्य गोखले यांनी वारंवार बोलून दाखविले. मात्र या विचारवंत आणि अभ्यासू गोखलेंना राज्य खो खो संघटनेने नंतर वाळीत टाकले. अनेकदा अनेक स्पर्धातून अधिकृत हरकती आल्यावर त्यावर निर्णय घेण्याची क्षमता त्या अनुभवी नसलेल्या तांत्रिक समितीत नव्हती. हे अनेकदा स्पष्ट झाले.
हे ही वाचा:
मंत्री विजय शाह यांच्या वादग्रस्त विधानाच्या चौकशीसाठी एसआयटी
जम्मू- काश्मीरच्या शोपियानमध्ये दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याबद्दल उत्तर प्रदेशातील व्यावसायिकाला अटक
बांगलादेश: शेख हसीना यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला अटक!
अनिल गोखले यांच्याकडे मराठी, इंग्रजी भाषेचे विविध विषयांवरील प्रचंड वाचन होते.काम करीत असलेल्या आस्थापनेतील प्रशासकीय कामकाज पद्धत व व्यवस्थापन यांची व्यवस्थित जपणूक केलेली होती.गोखले स्वतः विविध पातळीवरील खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, निवड समिती सदस्य, सांख्यिकी,पंच, संघटक आणि अभ्यासू प्रवृत्ती असलेले खो खो क्रीडा संघटक होते. अनेक राष्ट्रीय स्पर्धेची प्रसिद्धी वर्तमान पत्रातून साऱ्या भारतभर इंग्रजीतून केलेली आहे. अनेक राष्ट्रीय स्पर्धेतील विविध समित्यांवरील काम केलेल्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव होता. जेथे कमी तेथे गोखले कधी कमी नव्हते. तसेच ते विविध राज्यांतील प्रतिनिधींशी विचार मंथन करून आपल्या ज्ञानाचा परीघ नकळतपणे वाढविण्याचा ते प्रयत्न करीत.
