आयकर विभागाने भोपाळमधील मंडोरा गावाजवळील जंगलात एका सोडून दिलेल्या वाहनातून तब्बल ५२ किलो सोने आणि १० कोटी रुपयांची रोकड उघडकीस आणली आहे. भोपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागाचे धाडसत्र सुरू आहे. याच कारवाई दरम्यान पथकाला मोठे यश मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंडोरा गावाजवळील जंगलात एक अज्ञात इनोवा कार उभी असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलीस आणि आयकर पथकाने पहाटेच्या २ च्या सुमारस छापा टाकला. कारवाई दरम्यान पथकाला कारमधून दोन बॅग सापडल्या, ज्यामध्ये सोने भरलेले होते. यासह १० कोटी रुपयांची रोकडही सापडली.
हे ही वाचा :
सरपंच संतोष देशमुख प्रकरणाची एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी होणार!
‘वीज चोर’ सपा खासदार बर्क यांना १.९ कोटी रुपयांचा दंड
जयपूरमध्ये एलपीजी टँकरचा स्फोट, ८ जणांचा होरपळून मृत्यू!
‘नीलकमल’च्या अपघातानंतर जाग; बोट प्रवासासाठी लाइफ जॅकेट अनिवार्य!
टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, सापडलेल्या सोने आणि रोकडीचा संबंध माजी आरटीओ कॉन्स्टेबल सौरभ शर्मा आणि त्यांचे सहकारी चंदन सिंह गौर यांच्या छाप्याशी जोडला गेला आहे. बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणात यांचा तपास सुरु आहे. पथकाने दोघांच्या निवासस्थानांवर गुरुवारी (१९ डिसेंबर) छापा टाकला होता, त्यावेळी अरेरा कॉलनीतील शर्मा यांच्या घरातून २.५ कोटी रुपये रोख, सोने, चांदीचे दागिने आणि मालमत्तेची कागदपत्रे सापडली.
या मालमत्तेची किंमत ३ कोटींहून अधिक असल्याची माहिती आहे. वर्षभरापूर्वी परिवहन विभागातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले सौरभ शर्मा आता रिअल इस्टेटमध्ये सक्रिय आहेत. छाप्यांमध्ये अनेक मालमत्ता, हॉटेल आणि शाळांमध्ये गुंतवणूक उघड झाली आहे. या प्रकरणी पथकाकडून अधिक तपास सुरु आहे.