बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात दिसून आले होते. आरोपींवर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. यानंतर विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड येथील सरपंचाच्या हत्येवर सविस्तर निवेदन दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हत्या प्रकरणाचा जो कोणी मास्टरमाईंड असेल त्याच्यावर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “बीडमधील हे प्रकरण गंभीर असून कायद्याची परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. बीडमध्ये कायदा व सुव्यवस्था अधिक कडक करणे आवश्यक आहे. बीड प्रकरणात कोण मास्टरमाईंड असे त्यावर कारवाई होईल. जर वाल्मिक कराड यांच्याविरुद्ध पुरावे असतील, त्यांचे कोणासोबत फोटो असतील, तर त्यावर कोणताही विचार न करता तातडीने कारवाई केली जाईल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मस्साजोग येथे पवनचक्की उभारण्याचे काम सुरू आहे. तेथील कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला आणि प्रोजेक्ट अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली होती. तर वाल्मिक कराड याने धमकी दिल्याचे समोर आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तर त्यानंतर संतोष देशमुख यांची हत्या झाली. या संपूर्ण प्रकरणांमध्ये या दोन्ही गुन्ह्यांचा काय संबंध आहे याची चौकशी करण्यात येत आहे. एका गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड याच्यासंबंधी पुरावा दिसत आहेचं. त्यामुळे त्याच्यावर कारवाई होणारच आहे पण देशमुख यांच्या हत्येप्रकरणात वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कुणा कुणा सोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. या सर्व प्रकरणात जे कोणी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आरोपी आहेत. त्यांच्यावर मोक्का लावण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
सर्व लोकांवर संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल. यामध्ये दोन प्रकारची चौकशी केली जाणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. एक आयजी दर्जाचा अधिकारी यांच्याअंतर्गत एसआयटी तयार केलेली आहे ती एसआयटी या प्रकरणाची चौकशी करेल. तर, संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून न्यायालयीन चौकशी देखील करण्यात येईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
बीडमधील गुन्ह्यांचा घटनाक्रम काय?
अवाडा एनर्जी यांच्याकडून मोठी गुंतवणूक पवनऊर्जा क्षेत्रात केलेली असून मस्साजोग येथे पवनचक्की उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या भागात काही कामं आम्हालाच द्या नाही तर खंडणी द्या, अशा मानसिकतेत लोक वावरत असल्याचं चित्र आहे. याच गुन्ह्यामध्ये ६ डिसेंबरला अवाडा एनर्जीच्या ऑफिसमध्ये अशोक घुले, सुदर्शन घुले आणि प्रतिक घुले हे आरोपी गेले होते आणि त्यांनी वॉचमनला शिवीगाळ करत मारहाण केली. सिनियर प्रोजेक्ट मॅनेजरला त्यांनी मारहाण केली.
हे ही वाचा:
जयपूरमध्ये एलपीजी टँकरचा स्फोट, ८ जणांचा होरपळून मृत्यू!
‘नीलकमल’च्या अपघातानंतर जाग; बोट प्रवासासाठी लाइफ जॅकेट अनिवार्य!
सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर मानवी चुकीमुळे कोसळले!
कल्याणमध्ये परप्रांतीयाकडून गरळ ओकत देशमुख कुटुंबाला मारहाण; प्रकरण काय?
यादरम्यान पीडितांनी सरपंचांना संपर्क केला. बाजुच्या गावातील आरोपी मारहाण करत असल्याने सरपंच घटनास्थळी आले. दादागिरी करत असल्याने सरपंचांच्या लोकांनी चोप दिला, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. पुढे ९ डिसेंबरला संतोष देशमुख चारचाकी वाहनातून गावी परतत होते. ते एकटेच होते पुढे पेट्रोल पंपावर आतेभाऊ भेटले आणि देशमुख त्यांना सोबत घेऊन निघाले. टोल नाक्याजवळ काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आणि एक गाडी वाट पाहत होती. टोल नाक्यावर देशमुख यांची गाडी पोहचताच त्यांनी गाडी अडवली आणि काच फोडून त्यांना बाहेर काढले. स्कॉर्पिओ गाडीत टाकून त्यांना मारहाण केली. अमानुष मारहाणीत देशमुख यांचा मृत्यू झाला. देशमुख मृत झाल्यावर हे सर्व लोक पळाले, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.