कांजूरमार्ग मेट्रो कारशेड येथे रविवारी मृत अवस्थेत सापडलेल्या राजेश सारवान या व्यक्तीच्या हत्येची उकल करण्यात कांजूरमार्ग पोलीस आणि गुन्हे शाखेला यश आले आहे.
या हत्येप्रकरणी कांजूरमार्ग पोलीस आणि गुन्हे शाखेने विजय सारवान, रोहित चंडालिया, (२९) सागर पिवाळ (३०) या तिघांना अटक केली आहे. विजय सारवान हा मृत राजेश सारवान याचा चुलत भाऊ असून राजेश याने चुलत भाऊ विजयच्या बहिणीच्या साखरपुड्यात दारू पिऊन धिंगाणा घातला होता, या रागातून विजय याने चुलत भावाच्या हत्येसाठी भाडोत्री गुंडांना ३ लाख रुपयांची सुपारी देऊन राजेश सारवान याची हत्या घडवून आणली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
कांजूरमार्ग पोलिसांना रविवारी दुपारी कांजूरमार्ग द्रुतगती महामार्गावर असलेल्या मेट्रो कारशेड जवळील झुडुपात एका व्यक्तीच्या मृतदेह आढळून आला होता.या मृत व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी समोर आले होते.
याप्रकरणी कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून मृतव्यक्तीची ओळख पटविण्यात आली. मृत व्यक्तीच्या खिशात मिळून आलेल्या आधारकार्ड वरून मृत व्यक्तीचे नाव राजेश सारवान (४१)असल्याचे समोर आले. राजेश हा अंधेरी पूर्व चकाला येथे राहणारा असून मुंबई महानगर पालिकेत झाडू खात्यात कामाला असल्याची।माहिती पोलिसांना मिळून आली.
कांजूरमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मारेकऱ्याचा शोध सुरू केला होता, दरम्यान मुंबई गुन्हे शाखा कक्ष ७ चे प्रभारी पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत, कक्ष ८ चे प्रभारी पोलिस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांच्या पथकाने संलग्न तपास सुरू केला होता. कांजूरमार्ग पोलिसांनी या हत्येप्रकरणी मृत राजेश याचा चुलत भाऊ विजय सारवान याला संशयित म्हणून ताब्यात घेतले होते.
दरम्यान कक्ष ७ आणि ८ च्या पथकाने तांत्रिकरित्या तसेच खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीवरून विलेपार्ले परिसरातून रोहित चंडालिया, (२९) सागर पिवाळ (३०) याना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता हे दोघे सराईत गुन्हेगार असून या दोघांना राजेश सारवण याच्या हत्येसाठी मृताचा चुलत भाऊ विजय सारवन याने ३ लाख रुपयांची सुपारी दिली होती, अशी माहिती गुन्हे शाखेच्या तपासात समोर आली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृत राजेशला दारूचे भयंकर व्यसन होते, दारूच्या नशेपायी त्याला मुंबई महानगर पालिकेची नोकरी गेली होती. राजेश हा दारूच्या नशेत नातेवाईक आणि कुटूंबाना त्रास देत होता. शुक्रवारी विजय सारावान याच्या बहिणीचा साखरपुडा होता. राजेश याने साखरपुड्यात दारू पिऊन धिंगाणा घातला होता. त्याच्या या कृत्यामुळे विजयला मनस्ताप सहन करावा लागला होता. अखेर विजयने त्याला संपविण्याचा कट आखला.
हे ही वाचा:
बांगलादेशी रोहिंग्यांचा मुद्दा कुणाच्या धोतरात शिरणार?
गाडीने उडवल्याने ११ जणांचा मृत्यू!
प्रजाकसत्ताक दिनी होणार संविधानाचा जागर
मणिपूरमधून जेडीयूने भाजपाचा पाठींबा काढून घेतला; सरकार राहणार स्थिर
विजय याने विलेपार्ले येथे राहणाऱ्या सागर आणि रोहित या दोन भाडोत्री गुंडांना राजेशच्या हत्येसाठी ३ लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यापैकी ५० हजार आगाऊ रक्कम दिली होती उर्वरित काम झाल्यानंतर देण्यात येणार होते.शनिवारी रात्री सागर आणि रोहित यांनी राजेशला भरपूर दारू पाजून त्याला घेऊन कांजूरमार्ग पूर्व मेट्रो कारशेड येथे आले. त्याला झुडुपात आणून त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करून मृतदेह झुडुपात दडवून दोघांनी तेथून पोबारा केला.
कांजूरमार्ग पोलिसांनी चुलत भाऊ विजय सारवान याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात आली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
दरम्यान मुंबई गुन्हे शाखा कक्ष ७ आणि ८ च्या पथकाने रोहित आणि सागर या दोघांना विलेपार्ले परिसरातून अटक करण्यात आली. रोहित आणि सागर हे सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांनी दिली. गुन्हे शाखेने अटक करण्यात आलेल्या भाडोत्री गुंडांचा ताबा कांजूरमार्ग पोलिसांकडे सोपवला आहे.