लोकशाहीत राजकीय मतभेद असू शकतात, परंतु जिथे विषय देशाच्या सुरक्षेचा असतो, तिथे तरी एकवाक्यता हवी, राजकारण नको. घुसखोरांचा मुद्दा खूपच गंभीर बनला आहे. सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी बांगलादेशी
असल्याचे उघड झाल्यानंतर या समस्येचे उग्र रुप ठसठशीतपणे समोर आलेली आहे. परंतु तरीही काही राजकीय नेत्यांना या मुद्द्याचे राजकारण करावेसे वाटते. ज्वलंत हिंदुत्व ते नमाजवाद, नमाजवाद ते पुन्हा हिंदुत्व असा नाट्यमय
प्रवास करणारा उबाठा शिवसेना हा पक्ष त्यात आघाडीवर आहे. एके काळी दिवाळीत चिडीया नावाचा फटाका फोडला जायचा. परंतु वात पेटवल्यानंतर तो अचानक भिरभिरत कुणाच्याही धोतरात शिरत असल्यामुळे हा फटाका बॅन
करण्यात आला. बांगलादेशींचा मुद्दा उद्धव ठाकरे यांच्या धोतरात घुसणार हे राऊतांना पक्के ठाऊक आहे. त्यामुळे ते या मुद्द्यातील हवा काढण्याच्या कामाला लागले आहेत.
‘बांगलादेशी घुसखोर हा धोका असेल तर आधी शेख हसीना यांना बाहेर काढा’, असे बालीश विधान संजय राऊत यांनी केलेले आहे. घुसखोरीचे खापर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे ज्या ममता बॅनर्जी यांनी प.बंगालमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांना मोकळे रान दिले. ज्यांच्या राज्यात या घुसखोरांना भारतीय ओळखपत्रे पुरवली जातात. त्या ममता बॅनर्जी यांच्या पक्षाशी ठाकरे आघाडी करणार, त्यांचे मुंबईत मातोश्री निवासस्थानी स्वागत करणार आहे. ठपका मात्र मोदी-शहा यांच्यावर ठेवणार, असा उफराटा मामला आहे.
घुसखोरी करणारे लोक गरीब-बिच्चारे आहेत, अशी कुजबुज आधीच सुरू झालेली आहे. आरोपी मोहम्मद शेहजाद गरीब होता, त्याच्याकडे आईच्या उपचारासाठी पैसे नव्हते म्हणून त्याने सैफच्या घरात घुसखोरी केली, अशा बातम्या पेरण्याची सुरूवात झालेली आहे. याच गरीब बिच्चाऱ्याने आधी स्वत:चे नाव विजय दास असल्याची बतावणी केली होती. त्याच्याकडे घातक हत्यार होते. त्यानेच सैफवर सहा वार केले. याचा लोकांना विसर पडतो.
मुंबईत घुसलेले बांगलादेशी किंवा रोहिंगे मुस्लीम आज ज्या झोपडपट्टयांमध्ये रिचवले जात आहेत, त्या झोपड्या कुणाच्या काळात भरभराटीला आल्या याचे उत्तर आधी नमाजवादी उबाठाने देण्याची गरज आहे. निवडणुकांच्या काळात मुल्ला-मौलवींसोबत बंद दाराआड झालेल्या बैठकांमध्ये पवित्र कुराणाच्या आणाभाका घेणारे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या ‘मी हिंदुत्व सोडले नाही’, असे सांगत गल्लीबोळात फिरतायत. बांगलादेशी घुसखोरांचा विषय सध्या तापलेला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी हे ‘बांगलादेशी हटाओ’ हे नवे मिशन हाती घेतले आहे. महाराष्ट्रातील घुसखोरीचे बिंग फुटू लागले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर तोंड उघडणे उबाठा शिवसेनेला भाग पडणार आहे. बांगलादेशींच्या बाजूने बोलले तर
लोकं उरली सुरली लंगोटीही काढून घेतील आणि विरोधात बोलले जर मुस्लीम मतांचे ठेकेदार असलेले मुल्ले चवताळतील, अशा पेचात उबाठा शिवसेना सापडली आहे.
जेव्हा बोलता येणे शक्य नसते तेव्हा बरळायचे, जेव्हा वाद घालणे शक्य नसेल तेव्हा वितंडवाद घालायचा, हे संजय राऊतांनी विकसित केलेले तंत्र आहे. बांगलादेशातील मुस्लीम कट्टरतावाद्यांना झुकांडी देत बांगलादेशच्या पंतप्रधान
शेख हसीना भारताच्या आश्रयाला आल्या. त्यांना भारताबाहेर हाकला अशी मागणी राऊत करतायत. अबू आजमी यांच्या घरची बिर्याणी आणि काँग्रेसवाल्यांच्या घरचा पास्ता खाऊन बहुधा राऊतांची बुद्धी नाठी झालेली आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणारा बांगलादेशी आहे का? सोमनाथ सूर्यवंशीची हत्या करणारा बांगलादेशी आहे का? असे फाजील सवाल राऊत करतायत. या दोन्ही हत्या करणारे आरोपी मराठी आहेत. तुम्ही मराठी माणसाच्या नावाने वर्षोनुवर्ष दुकान चालवत आला आहात. म्हणून तुम्ही त्या मराठी आरोपींची पाठराखण करणार आहात का? असा आमचा सवाल आहे.
बांगलादेशींचा मुद्दा उद्धव ठाकरे यांच्या धोतरात घुसणार हे राऊतांना पक्के ठाऊक आहे. कारण बांगलादेशातून घुसखोरी करणारे जेव्हा मुंबईसारख्या शहरात येतात तेव्हा त्यांना इथल्या झोपडपट्ट्यांमध्ये आश्रय मिळतो. या झोपडपट्ट्या
कोणाच्या काळात भरभराटीला आल्या, याचे उत्तर मुंबईकरांना माहीत आहे. मुंबई महापालिका २५ वर्षे शिवसेनेच्या म्हणजे पर्यायाने ठाकरेंच्या ताब्यात होती. या काळात महापालिकेचे धोरण आणि तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या भ्रष्टाचारामुळे दोन गोष्टी घडल्या. एक तर मराठी माणसाला मुंबईतून काढता पाय घ्यावा लागला. मोकळ्या जमिनीवर झोपड्या फोफावल्या.
महापालिकेला चिरीमिरी दिली, नगरसेवकांचे हात ओले केले की काहीही होते, असा मुंबईकरांचा अनुभव आहे. आज जनसुविधांच्या मोठ्या मोठ्या भूखंडांवर कब्जा करून झोपड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. याची जबाबदारी सुद्धा मोदी
आणि शाह यांची आहे का? ठाकरेंची मातोश्री ज्या कलानगरमध्ये आहे, तिथून हाकेच्या अंतरावर असलेल्या बेहराम पाड्यात पाच पाच मजली झोपड्या या महापालिकेच्या कृपेने उभ्या राहिल्या. मुंबईच्या कानाकोपऱ्यात वसवलेल्या या छोट्यामोठ्या बेहराम पाड्यात बांगलादेशातून आलेल्या घुसखोरांना रिचवले जाते. त्यांना मतदार बनवले जाते. या उपऱ्यांनी कुठे कुठे आपला जम बसवला आहे. स्थानिक लोकांचे रोजगार कसे बुडवले आहेत, या विषयावर न्यूज डंकाचे विशेष प्रतिनिधी सुदर्शन सुर्वे यांनी भरपूर माहिती जमवलेली आहे. या विषयावर आम्ही एक सविस्तर मालिकाच करणार आहोत. घुसखोरांचे आश्रयदाते कोण याबाबत दूध का दूध पानी का पानी… या मालिकेच्या माध्यमातून केले जाणार आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान धारावीतील अनधिकृत मशिदीच्या विरोधात कारवाई झाली, तेव्हा काँग्रेस सोबत उबाठा शिवसेनेनेही कोलदांडा घातला होता. महायुतीचे सरकार आल्यानंतर वांद्रे पूर्व येथील भारत नगरमध्ये जेव्हा अनधिकृत झोपड्यांविरुद्ध कारवाई झाली तेव्हा त्या झोपड्या वाचवण्यासाठी आमदार वरुण सरदेसाई तिथे पोहोचले. कारण त्या झोपड्यांमध्ये राहणारे उबाठा शिवसेनेचे नव मतदार आहेत. हीच मंडळी हिरवे झेंडे फडकवत उबाठा शिवसेनेच्या प्रचार फेऱ्यांमध्ये दिसत होती. मंबईत त्यांच्या जीवावर उबाठा शिवसेनेचे १० आमदार विजयी झाले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत ही मतं गमावण्याची उबाठा शिवसेनेची तयारी नाही. त्यामुळे बांगलादेशींच्या मुद्द्यावर सरकारला समर्थन द्यायचे सोडून राऊत दिशाभूल करण्याचे धंदे करतायत. हा मुद्दा महापालिका निवडणुकांसाठी तापवला जातोय
असा दावा करतायत. ज्यांचे वडील काँग्रेसचे मोठे नेते होते, नेहरु-गांधी घराण्याचे अत्यंत निकटवर्तीय होते, ते शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनीही बांगलादेशी घुसखोरांना कारवाई करा, असे पत्र मुख्यमंत्र्यांना दिलेले आहे. ठाकरे-
राऊत मात्र या मुद्द्याच्या आडून नव मतपेढी मजबूत करण्याचा प्रयत्न करतायत. अर्थात जेव्हा मतदार जागृत असतो, तेव्हा राजकीय पक्षांचे असे डावपेच निव्वळ आत्मघात ठरतात.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)