30.1 C
Mumbai
Monday, May 11, 2026
घरसंपादकीयममता बॅनर्जींना घंटातज्ज्ञ भेटले का?

ममता बॅनर्जींना घंटातज्ज्ञ भेटले का?

Google News Follow

Related

महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रात एक घटनातज्ज्ञ कुत्र्याच्या छत्रीसारखे अचानक उगवले. ‘ठाकरे माझा’, ‘मातोश्री तक’, ‘राऊत २४ तास’ अशा सगळ्याच वाहिन्यांवर ते दिसू लागले. सर्वोच्च न्यायालयात काय होणार, याचा तपशीलच ते चॅनेलवर मांडू लागले. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी नेमके काय केले पाहिजे याचे सल्ले देऊ लागले. ते जे काय म्हणत होते, त्यातले काहीच घडले नाही. नेमके काय घडले, हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे.

असाच एखादा ‘घंटा’ तज्ज्ञ ममता बॅनर्जी यांना सापडलेला दिसतो. त्यामुळेच मुख्यमंत्री पद अबाधित राहण्याची आशा त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे. “मी हरलेले नाही, मी राजीनामा देणार नाही”, अशी वक्तव्ये त्या करीत आहेत. पश्चिम बंगालच्या जनतेवर वरवंटा चालवून ममता बॅनर्जी सलग तीन टर्म पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री झाल्या. त्यामुळे गेली १५ वर्षे लोकशाही जिवंत होती. ४ मे रोजी जनतेने नौका बुडवल्यानंतर अचानक त्यांचा निवडणूक प्रक्रियेवरून विश्वास उडाला. २०२१ च्या निवडणुकीत ५४ बळी गेले होते; यंदा एकही गेला नाही. त्यामुळे निवडणूक लोकशाही पद्धतीने पार पडल्यासारखे त्यांना वाटले नसेल.

एका बाजूला काँग्रेस कार्यकर्ते ममता यांच्या पराभवाचा जल्लोष साजरा करतायत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी नादिया जिल्हा, करीमपूर तालुका येथील कार्यालय ताब्यात घेतले आहे. हे मुळात त्यांचेच होते; तृणमूलच्या गुंडांनी हे ताब्यात घेतले होते. तेही मुक्तीचा आनंद घेतायत. निवडणूक हिंसाचारात यावेळी आसनसोलमध्ये देबदीप चटर्जी या काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली होती. हत्या करणारे तृणमूलचे गुंड होते. काँग्रेसच्या दुर्दैवाने राहुल गांधींसारखा निलाजरा नेता त्यांना मिळाला आहे. त्यांनी ममतांबाबत सहानुभूती व्यक्त केली आहे. “तुमच्या १०० जागा चोरल्या गेल्या आहेत”, या शब्दांत त्यांना सांत्वना दिली आहे.

ठिकठिकाणी पराभूत झाल्यामुळे रिकामटेकड्या असलेल्या देशभरातील नेत्यांनी ममता यांना फोन करून शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. काल ममता बॅनर्जी यांनी पराभवानंतर पहिली पत्रकार परिषद घेतली. “मी हरलेले नाही, मी राजीनामा देणार नाही”, अशी घोषणा केली. ‘इंडी’ आघाडीतील तमाम नेत्यांनी ममता बॅनर्जी यांच्या स्वरात स्वर मिसळला आहे; जणू लोकशाही म्हणजे त्यांच्या बापाचा माल!

मुख्यमंत्री म्हणून ममता यांचे मुख्य सल्लागार जे कधीकाळी त्यांचे मुख्य सचिव होते, असे ए. बंदोपाध्याय आणि एच. के. द्विवेदी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. पश्चिम बंगाल औद्योगिक विकास महामंडळ आणि लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष अभिरूप सरकार यांनीही राजीनामा दिलेला आहे. राज्याचे ॲडव्होकेट जनरल किशोर दत्ता यांनीही राजीनामा दिला आहे. ममता मात्र राजीनामा द्यायला तयार नाहीत.

ममता बॅनर्जी यांच्या सत्ताकाळात अनेक घोटाळे झाले. शिक्षक भरती घोटाळा, नोकर भरती घोटाळा, सारदा चिटफंड – असे अनेक घोटाळे. या घपल्यांची सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. अनेक घोटाळे अजून उघड झालेले नाहीत, ते फाईल्समध्ये बंद आहेत. त्यामुळे सत्तेवरून पायउतार होण्याआधी या फाईल्स नष्ट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. महाराष्ट्रात मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याला २०१२ मध्ये आग लागली होती; हजारो फाईल्स नष्ट झाल्या होत्या आणि पाच जणांचा मृत्यू झाला होता. ‘नबाना’ला तशीच आग लागू शकते, याची शक्यता गृहीत धरून सुरक्षा दलांची तैनाती करण्यात आलेली आहे.

दणदणीत पराभव झालेला असूनही ममता बॅनर्जी राजीनामा द्यायला तयार नाहीत. हंगामी मुख्यमंत्री म्हणून जाता जाता काही कामे उरकण्याचा त्यांचा विचार दिसतो. मागील तारखेने काही फाईल्सवर सह्या कराव्या, अडचणीत आणणाऱ्या काही फाईल्सची वासलात लावावी, असा बहुधा त्यांचा हिशोब असावा. सत्ताकाळात तृणमूलने नागडा भ्रष्टाचार केला. ममता यांचा भाचा अभिषेकने तर काहीही शिल्लक ठेवले नाही. जहांगीर खानसारख्या गुंडांना हाताशी धरून त्याने गेल्या १५ वर्षांत पश्चिम बंगालला जेवढे ओरबडता येईल तेवढे ओरबडले आहे. ही अंडीपिल्ली ज्या फाईल्समध्ये आहेत, त्या सुरक्षित राहाव्या यासाठी केंद्र सरकार दक्ष आहे.

बाई राजीनामा द्यायला तयार नाहीत, परंतु त्यामुळे काही बिघडत नाही. त्यांची लहर आणि त्यांच्या मर्जीनुसार देश चालत नाही. देश घटनेच्या चौकटीत चालतो. त्यांनी राजीनामा दिला तर ठीक, नाहीतर राज्यपाल त्यांची हकालपट्टी करतील, असे स्पष्ट मत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वसर्मा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले आहे. “ममता यांना वाटते की भाजपने माझ्या १०० जागा चोरल्या, तर मलाही वाटते आसाममध्ये काँग्रेसने माझ्या १९ जागा चोरल्या, त्याही माझ्या वाट्याला आल्या पाहिजे होत्या”, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.

हिमंता जे काही म्हणतात, त्याला कायद्याचा आधार आहे. घटनेच्या कलम १६४ अंतर्गत मुख्यमंत्र्यांना हटवण्याचा राज्यपालांना पूर्ण अधिकार असल्याचे स्पष्ट म्हटले आहे. सरळ मार्गाने पायउतार नाही झाल्या तर त्यांना अपमानित होऊन जावे लागेल. ७ मे रोजी पश्चिम बंगाल विधानसभेची मुदत संपणार आहे, त्यानंतर त्या मुख्यमंत्री राहण्याचा प्रश्नच येत नाही. नवे आमदार शपथ घेतील, आपला नेता निवडतील आणि सर्वात मोठ्या पक्षाला मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला राज्यपालांकडून बोलावले जाईल. ममतांना हे माहित नसण्याचे काहीच कारण नाही.

आपण हरणार आहोत हे ममता बॅनर्जी यांना आधीपासून माहिती होते, म्हणूनच त्यांनी ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूममध्ये जाऊन तमाशा केला होता. केंद्रीय सुरक्षा दलाच्या तैनातीवरून त्या वारंवार हल्लेबोल करीत होत्या. निवडणूक आयोगाच्या नावाने बोटे मोडत होत्या. सुरक्षा दलाचे जवान नसते तर आपल्याला बांगलादेशी घुसखोरांच्या फौजेसह हिंदूंना व्यवस्थित रगडता आले असते; निवडणूक आयोग दक्ष नसता तर पुन्हा ‘छापा वोट’च्या सहाय्याने मुख्यमंत्री पद मिळवता आले असते, याची सल त्यांना निश्चितपणे असणार.

तमिळनाडू आणि केरळचे निकाल भाजपच्या बाजूने लागलेले नाहीत, तिथे लोकशाहीचा विजय झाला आहे. या राज्यांत ईव्हीएममुळे कोणतीही समस्या झाली नाही, परंतु पश्चिम बंगालमध्ये मात्र झाली, हा विरोधकांचा दावा आहे. ममता बॅनर्जी यांचा काटा निघाल्यामुळे खरे तर राहुल गांधी प्रचंड खुश असतील; कारण आता त्या ‘इंडी’ आघाडीच्या नेतेपदाची दावेदारी करू शकणार नाहीत. त्यांना राहुल गांधींच्या पाठीशीच उभे राहावे लागेल. त्यामुळे पश्चिम बंगालच्या जनतेने तृणमूल काँग्रेसची तिरडी उचलल्यानंतर तेही धाय मोकलून रडतायत.

एरव्ही ममता काँग्रेस आणि राहुल गांधींना हिंग लावून विचारत नव्हत्या, परंतु आता त्यांना रडण्यासाठी मिळतील तेवढे खांदे हवे आहेत. राहुल गांधी, उद्धव ठाकरे, तेजस्वी यादव, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल यांनी आपले खांदे देऊ केले आहेत. केजरीवाल यांचे दुःख ताजे आहे; तेजस्वी आणि ठाकरे यांनीही खुर्ची गमावल्यानंतर फार काळ लोटलेला नाही. अखिलेश यांनाही ठाऊक आहे की २०२७ मध्ये त्यांच्यावरही ही वेळ येणार आहे. ते उद्या पश्चिम बंगालमध्ये सांत्वनाला जाणार आहेत. हे सगळे तेराव्याचे जेवणकरी आहेत; आंबट तोंडाने जेवणावर आडवा हात मारून रवाना होणार आहेत. भाजपशी लढण्याची ताकद एकातही उरलेली नाही.

हेही वाचा :

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा उसळी

शेअर बाजारात जोरदार उसळी; सेन्सेक्समध्ये ९४० अंकांची वाढ

तिकीटासाठी तृणमूलकडून पाच कोटींची मागणी

इसिस रिसिन बायोटेरर प्रकरण: विष देऊन मोठ्या प्रमाणावर हानी करण्याची होती योजना

राज्यसभेचे खासदार असलेले महाराष्ट्रातील एक नेते ममतांसाठी जोरदार बॅटिंग करीत आहेत. त्यांच्या पक्षातून खासदार म्हणून त्यांना नारळ देण्याची तयारी सुरू झालेली आहे. ममता यांच्या कृपेमुळे तरी खासदारकी मिळेल म्हणून ममतांना जमेल तेवढा गूळ लावण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. भाजप आणि मोदींना शिव्या घालून शत्रूघ्न सिन्हा यांनी तृणमूलकडून अशीच खासदारकी मिळवली होती. खासदार झाल्यानंतर मात्र ते मोदींच्या विरोधात चकार शब्द काढत नाहीत.

२०१४ नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक राज्यांत भाजपची सत्ता आली. एखाद्या निवडणुकीनंतर भाजप नेते अमित शाह केंद्रीय निरीक्षक म्हणून गेले नाहीत, परंतु पश्चिम बंगालमध्ये ते निरीक्षक म्हणून जात आहेत. शाह जातायत म्हणजे पेच मोठा आहे. फक्त हा पेच पक्षात नसून पक्षासमोर आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
306,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा