मालाड परिसरात राहणाऱ्या एका निवृत्त व्यावसायिकाची तब्बल १.३६ कोटींची सायबर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेअर ट्रेडिंग आणि आयपीओमध्ये गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवत सायबर ठगांनी त्यांना व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये सामील करून ही फसवणूक केली. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर मुंबई सायबर सेलने तपास सुरू केला आहे.
फसवणुकीची सुरुवात ५ मे २०२५ रोजी झाली. तक्रारदाराला एका अनोळखी व्यक्तीने “367 SC PLC Policy Radar” नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडले. या ग्रुपमध्ये सुमारे १०० सदस्य होते आणि बहुतांश जण सक्रिय होते. या ग्रुपमध्ये शेअर बाजाराशी संबंधित प्रशिक्षण आणि गुंतवणूक सल्ला दिला जात होता.
या ग्रुपची अॅडमिन स्वत:ची ओळख “आराध्या मिश्रा” अशी सांगत होती. तिने तक्रारदाराशी वैयक्तिकरित्या संपर्क साधून त्यांना शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीसाठी तयार केले. त्यानंतर तिने एक गूगल फॉर्म लिंक पाठवून एक मोबाइल अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.
तक्रारदाराने अॅप इन्स्टॉल करून आपले नाव, मोबाईल नंबर, आधार, पॅन कार्ड आणि शहराचे तपशील भरले. या अॅपमध्ये ऑनलाइन सेवा, जमा-निधी, पैसे काढणे, बँक कार्ड जोडणी, व्यवहार पासवर्ड अशा विविध सुविधा होत्या. ठगांच्या सूचनेनुसार तक्रारदाराने व्हॉट्सअॅपवर दिलेल्या अनेक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले.
हे ही वाचा:
‘दहशतवादाची केंद्रे आता सुरक्षित नाहीत’
साकिब नाचन ब्रेन स्ट्रोकनंतर रुग्णालयात दाखल; प्रकृती चिंताजनक
राहुल गांधींना पुन्हा माफी मागावी लागणार !
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीत एका वीटभट्टी कामगाराने बिबट्याला लोळवले
थोड्याच कालावधीत तक्रारदाराकडून एकूण १,३६,९४,००० रुपये ट्रान्सफर करण्यात आले. अॅपवर सतत “निवेशावर परतावा” दाखवला जात होता, ज्यामुळे तक्रारदाराचा विश्वास अधिकच वाढला. मात्र, जेव्हा त्यांनी परतावा मागवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना फायदेशीर रकमेवर १०% सेवा कर भरावा लागेल, असे सांगण्यात आले. ते शक्य नसल्यास अर्धी रक्कम भरण्याची मागणी केली गेली.
शेवटी तक्रारदाराला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई सायबर सेल करत आहे.
