देशभरातील बड्या व्यापाऱ्यांचे कर्जाचे सीबील स्कोर बघून बनावट कागदपत्रे तयार करून बँकांकडून महागडया वाहनांवर कर्ज घेऊन ती महागडी वाहने परराज्यात विक्री करणारी टोळी मुंबई गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केली आहे. या टोळीतील ७ सदस्यांना विविध राज्यातून गुन्हे शाखेच्या कक्ष ३ च्या पथकाने अटक केली आहे. या टोळीकडून पोलिसांनी १६ महागड्या कार जप्त करण्यात आलेल्या आहेत.जप्त करण्यात आलेल्या मोटारीच्या किमती ६ कोटी ३० लाख आहे.
रविंद्र दिनानाथ गिरकर उर्फ परदिप रविंदर शर्मा (४७), मनिष सुभाष शर्मा (३९),सय्यद नावेद सय्यद जुल्फीकार अली (५२),दानिश रफिक खान (३२), साईनाथ व्यंकटेश गंजी (२९),यशकुमार सुनिल कुमार जैन (३३) आणि इमान अब्दुल वाहिद खान उर्फ देवा (३८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक आरोपी हे इंदोर, मध्यप्रदेश, कल्याण, डोंबिवली, ठाणे, भिवंडी आणि कुर्ला येथे राहणारे आहे.
विक्रोळीतील पार्क साईट पोलीस ठाण्यात दोन वर्षांपूर्वी महिंद्रा अँड महिंद्रा फायनांशिअल,कंपनीचे कर्मचारी कल्पक म्हात्रे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या फायनान्स कंपनीकडून बोगस कागदपत्राच्या आधारावर ‘महिंद्रा थार’ या वाहनावर कर्ज घेऊन फसवणूक करण्यात आली असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी पार्क साईड पोलीस ठाण्यात फसवणूक,बोगस कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा सलग्न तपास मुंबई गुन्हे शाखा कक्ष ३ चे पथक करीत असताना तपास पथकाने रविंद्र दिनानाथ गिरकर उर्फ परदिप रविंदर शर्मा याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष ३ चे प्रभारी पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर,पोलीस निरीक्षक शामराम पाटील, सपोनि. अमोल माळी, समीर मुजावर,पोलीस उपनिरीक्षक इंद्रजित शिरसाठ, गोरेगावकर आणि पथक यांनी मध्यप्रदेश इंदोर, कल्याण, डोंबिवली, ठाणे येथून इतर आरोपीना अटक केली.
हे ही वाचा:
कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा, कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती!
‘सकाळच्या भोंग्याला सुसंवाद शिकवा तरच राज्यातील संवादाची परिस्थिती सुधारेल!’
हे साहित्य संमेलन की भंपकांचा तमाशा?
इरा जाधव, अनिरुद्ध नंबुद्रीने जिंकले सुवर्णपदक
या टोळीने वेगवेगळ्या राज्यातील व्यापाऱ्यांचे कर्जाचे सीबील स्कोर काढून त्याच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून ब्रेडेड कंपन्यांच्या १६ मोटार कार वर बँकांकडून कर्ज काढून त्या मोटारीचे चेसिस नंबर बदलून त्या नव्या कोऱ्या मोटारी उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात येथे कमी किमतीत विकल्या होत्या, अशी माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी पत्रकाराना दिली.
गुन्हे शाखेने विविध राज्यात विक्री करण्यात आलेल्या १६ ब्रँडेड कंपनीच्या मोटारी जप्त केल्या आहेत. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार बोगस नावाने आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहनांचे आर. सी. बुक,एमएमआरडीएचे ऍलॉटमेंट लेटर, बॅक स्टेटमेंट व आयटी रिटर्न फाईल अशी बनावट कागदपत्रे तयार करून त्या आधारे मुंबईमधील विविध बँकांकडून वाहन कर्ज मिळवून ब्रेडेड कंपन्यांच्या मोटार कार घेवून त्या वेगवेगळया राज्यामंध्ये सामान्य लोकांना डुप्लीकेट आरसी बुक बनवून विक्री करीत होते, तसेच चोरीच्या वाहनावर बनावट चेसिस व इंजिन क्रंमाक लावून त्यांची देखील परराज्यात विक्री करण्यात आली होती.