दिल्लीमध्ये ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. संमेलनात झालेल्या टीका, टिपण्णीमुळे यंदाचे संमेलन चर्चेचा विषय ठरले. यावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. साहित्य संमेलनात बोलताना मर्यादा ठेवायला हव्यात असा सल्ला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना मर्यादा ठेवल्या पाहिजेत. अनेक साहित्यिकांना वाटतं की राजकारणी आमच्या मंचावर येऊ नयेत. मग त्यांनीही पार्टी लाईनवरील कमेंट्स करणं योग्य नाही. त्यांनीही मर्यादा पाळायला हव्यात,” असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी दिला.
शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीमध्ये आयोजित मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलताना आरोप केला की, ठाकरे गटात एका पदासाठी दोन मर्सिडीज द्यावा लागत होत्या यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “नीलम गोऱ्हे या आधी त्यांच्या पक्षात होत्या. मी त्या पक्षात नव्हतो. त्यामुळे त्या पक्षात काय चालायचे हे त्या सांगू शकतात. मी काही बोलू शकत नाही.”
तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात कोणीही कुणाशी सुसंवाद करत असेल तर त्याचे स्वागत आहे. यावर दुमत नाही. सर्वांनी सुसंवाद करावा. पुढे ते माध्यमांना म्हणाले की, सकाळच्या ९ वाजताच्या भोंग्याला सुसंवाद कसा करायचा हे शिकवलं तर राज्यातील संवादाची परिस्थिती सुधारेल, असा टोला त्यांनी नाव न घेता संजय राऊत यांना लगावला आहे.
हे ही वाचा :
बांगलादेशमधील हवाई दलाच्या तळावर हल्ला; एकाचा मृत्यू
अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘मढी’ च्या यात्रेत मुस्लिम दुकानदारांना बंदी!
दहशतवादी करणार होते चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांचे अपहरण
युक्रेन- रशियाच्या युद्धाची तीन वर्षे: अर्थव्यवस्थेवर काय झालाय परिणाम?
दरम्यान, ओएसडी आणि पीएस सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री ठरवतात, आमच्या हातात काहीच नाही, असं वक्तव्य कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “माणिकराव कोकाटे यांना कदाचित हे माहिती नसेल पीए आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांनाच आहे. त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्यांकडे पाठवतात, आणि मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतात. कॅबिनेटमध्येचं स्पष्ट सांगितलं होतं की, जी नावं पाहिजे ती पाठवा. पण ज्या नावांचा चुकीच्या कामांमध्ये समावेश आहे, त्यांच्या नावांना परवानगी दिली जाणार नाही. आतापर्यंत १२५ जणांची नावं आली, त्यातील १०९ नावं क्लिअरही केली आहेत, उर्वरीत नावांना परवानगी दिली नाही, कारण त्यांच्यावर कुठला न कुठला आरोप आहे, त्यामुळे कोणी नाराज झालं तरीही अशा लोकांच्या नावाला मान्यता देणार नाही,” अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली आहे.