भारताचा शेजारी देश असलेल्या बांगलादेशमध्ये सध्या राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच बांगलादेशमधील हवाई दलाच्या तळावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. बांगलादेशच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने (ISPR) या हल्ल्यासंदर्भात एका अधिसूचनेत माहिती दिली आहे. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी बांगलादेशच्या कॉक्स बाजार जिल्ह्यातील हवाई दलाच्या तळावर काही लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला, अशी माहिती लष्कराने दिली आहे. माहितीनुसार, ३० वर्षीय स्थानिक व्यापारी शिहाब कबीर अशी या हल्ल्यात बळी पडलेल्या व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचे वृत्त आहे. बांगलादेश सशस्त्र दलाच्या जनसंपर्क विभाग, इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने एका संक्षिप्त निवेदनात म्हटले आहे की, “कॉक्स बाजार हवाई दल तळाशेजारी असलेल्या समिती पारा येथील काही गुन्हेगारांनी कॉक्स बाजार हवाई दल तळावर हल्ला केला. बांगलादेश हवाई दल या संदर्भात आवश्यक उपाययोजना करत आहे.”
माहितीनुसार, स्थानिक आणि हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांमध्ये काही कारणावरून तणाव निर्माण झाला आणि त्यांनी हा हल्ला केला. काही स्थानिक पत्रकारांच्या मते जिल्हा आयुक्तांनी समिती पाराच्या लोकांना हवाई दलाचा परिसर सोडून खुरुष्कुल गृहनिर्माण प्रकल्पात जाण्यास सांगितल्यानंतर वाद सुरू झाला. हल्लेखोरांनी तळावर हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल, हवाई दलाने गोळीबार केला, ज्यामुळे तणाव आणखी वाढला. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि हालचालींवर बंदी घातली आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीदरम्यान एकाला गोळी लागली आणि त्याला कॉक्स बाजार जिल्हा सदर रुग्णालयात मृत अवस्थेत आणण्यात आले. संबंधित व्यक्तीच्या डोक्याच्या मागच्या बाजूला खोलवर दुखापत झाली आहे. कॉक्स बाजारचे उपायुक्त मोहम्मद सलाहुद्दीन यांनी सांगितले की, हा संघर्ष कशामुळे झाला याची चौकशी केली जाईल आणि गुन्हेगारांवर कारवाई केली जाईल. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि आणखी वाढ रोखण्यासाठी अधिकारी काम करत असल्याने परिसरात सुरक्षा उपाययोजना वाढवण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा :
अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘मढी’ च्या यात्रेत मुस्लिम दुकानदारांना बंदी!
दहशतवादी करणार होते चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांचे अपहरण
युक्रेन- रशियाच्या युद्धाची तीन वर्षे: अर्थव्यवस्थेवर काय झालाय परिणाम?
यूएसएआयडीने मंजूर केलेले प्रकल्प सरकारच्या भागीदारीत
कॉक्स बाजार हवाई दल तळ हा बांगलादेश हवाई दलाचे एक प्रमुख तळ आहे, जे कॉक्स बाजार शहरात बांधले गेले आहे. हे विमानतळ देशातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या आणि बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या कॉक्स बाजार विमानतळाजवळ आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडल्यापासून, देशातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती नाजूक आहे. अजूनही अनेक भागांमध्ये हिंसक घटना सुरूच आहेत.