क्रिकेट विश्वातील मानाची मानल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा थरार सध्या पाकिस्तानात रंगला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारताने खेळाडूंना पाठवण्यास नकार दिल्यानंतर भारतीय संघाचे सामने दुबई येथे खेळवले जात आहेत. अशातच, या स्पर्धेदरम्यान खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाने इस्लामिक स्टेट खोरासान प्रांतकडून (ISKP) संभाव्य धोक्याबद्दल इशारा जारी केला आहे. इस्लामिक स्टेट खोरासान प्रांतकडून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी आलेल्या परदेशी लोकांचे खंडणीसाठी अपहरण केले जाऊ शकते. तशी त्यांची योजना असल्याचा इशारा पाकिस्तान गुप्तचर विभागाने दिला आहे. विशेषतः चिनी आणि अरब नागरिक या दहशतवादी संघटनेच्या लक्ष्यावर असल्याची माहिती आहे. या देशांमधून येणाऱ्या पर्यटकांकडून वापरल्या जाणाऱ्या बंदरे, विमानतळ, कार्यालये आणि निवासी क्षेत्रांवर या संघटनेच्या सदस्यांकडून पाळत ठेवली जात आहे.
गुप्तचर अहवालांनुसार, ISKP चे कार्यकर्ते शहरांच्या बाहेरील भागात सुरक्षित घरे म्हणून मालमत्ता भाड्याने घेण्याची योजना आखत आहेत. शिवाय जाणूनबुजून कॅमेरा देखरेखीशिवाय आणि फक्त रिक्षा किंवा मोटारसायकलने पोहोचता येणारी ठिकाणे निवडत आहेत. सुरक्षा दलांपासून वाचण्यासाठी रात्रीच्या आडून अपहरण केलेल्या व्यक्तींना सुरक्षित घरांमध्ये हलवण्याचा या गटाचा मानस आहे.
मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे संरक्षण करण्याच्या क्षमतेबद्दल पाकिस्तानला वाढती चिंता असताना हा इशारा देण्यात आला आहे. २०२४ मध्ये शांगला येथे चिनी अभियंत्यांवर झालेला हल्ला आणि २००९ मध्ये लाहोरमध्ये श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर झालेला हल्ला यासारख्या घटनांमुळे त्यांच्या सुरक्षा तयारीबद्दल शंका निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानच्या गुप्तचर संस्थेने (GDI) देखील अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या ठिकाणांवर ISKP च्या संभाव्य हल्ल्यांबद्दल सतर्क केले आहे आणि गटाशी संबंधित बेपत्ता कार्यकर्त्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न वाढवले आहेत.
हे ही वाचा:
युक्रेन- रशियाच्या युद्धाची तीन वर्षे: अर्थव्यवस्थेवर काय झालाय परिणाम?
पीएम-किसान योजनेला सहा वर्षे पूर्ण; १० कोटी लाभार्थ्यांना मिळणार २००० रुपये
“शरद पवार गप्प कसे राहू शकतात?” नीलम गोऱ्हेंच्या विधानावरून संजय राऊत संतापले
‘हफ्ता वसूली’ कार्यक्रमात सांस्कृतिक मूल्यांचे उल्लंघन केल्याबद्दल मुनावर फारुकी विरुद्ध तक्रार
२०२४ मध्ये, ISKP शी संलग्न असलेल्या अल अझैम मीडियाने १९ मिनिटांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. ज्यामध्ये दावा करण्यात आला होता की, क्रिकेट हे मुस्लिमांविरुद्ध बौद्धिक युद्धाचे पाश्चात्य साधन आहे. या गटाने असा युक्तिवाद केला की हा खेळ राष्ट्रवाद आणि प्रचाराला प्रोत्साहन देतो, जो इस्लामच्या जिहादी विचारसरणीशी विरोधाभासी आहे. त्यांनी अफगाणिस्तान क्रिकेट संघाला पाठिंबा दिल्याबद्दल तालिबानवरही टीका केली होती.