ऑनलाइन गेमच्या आहारी गेलेल्या तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी दरोड्याची योजना आखल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घाटकोपर येथील दर्शन ज्वेलर्स दुकानावर टाकलेल्या दरोड्याप्रकरणी पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांना अटक केली असून एक जण अद्याप फरार आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये सूरज यादव आणि तनिष्क भैताडे यांचा समावेश असून फरार आरोपी चंद्रकांत यादवचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. ही तिघेही बी.कॉमच्या शेवटच्या वर्षात शिकणारे विद्यार्थी असून, ऑनलाइन गेम आणि गेम झोनच्या व्यसनामुळे त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
बुधवारी सकाळी घाटकोपर (प.) येथील अमृतनगर परिसरातील दर्शन ज्वेलर्स या दुकानावर तिघांनी पिस्तुलाच्या धाकावर दरोडा टाकला होता. मात्र, घाईगडबडीत एका दरोडेखोराची बॅग दुकानातच राहून गेल्याने पोलिसांना मोठा धागा मिळाला. त्या बॅगेत काही कागदपत्रे आणि आधारकार्ड सापडले. चौकशीत ही बॅग फरार आरोपी चंद्रकांत यादवची असल्याचे निष्पन्न झाले.
आधारकार्डवरील मोबाईल क्रमांकाच्या कॉल डिटेल्स तपासल्यानंतर पोलिसांना सूरज यादव आणि तनिष्क भैताडे यांचे संपर्क क्रमांक मिळाले. या दोघांचे लोकेशन साकिनाका येथील मार्वेल्स इमारतमधील एका गेम झोनमध्ये असल्याचे निदर्शनास आले. घाटकोपर पोलिसांनी तात्काळ छापा टाकत दोघांना ताब्यात घेतले.
सूरज हा ठाण्यातील कोपरी परिसरात राहणारा असून तनिष्क हा कुर्ला (प.) येथील मसराणी लेन परिसरात रहिवासी आहे. फरार आरोपी चंद्रकांत यादव हा नवी मुंबईत राहतो. हे तिघे एका कॉमन मित्राच्या माध्यमातून ओळखीचे झाले होते.
हे ही वाचा :
‘राहुल गांधींमध्ये पंतप्रधान बनण्याची गुणवत्ता नाही!’
बरेली हिंसाचार: मौलाना तौकीर रजांचे सचिव अफजल बेग कोर्टात शरणागत!
पाक संरक्षण मंत्री म्हणतात, दोन आघाड्यांवर युद्धासाठी तयार!
कॅनडा, अमेरिकेतील विमानतळांवर सायबर हल्ला; हमास समर्थनार्थ संदेश प्रसारित
या तिघांची आर्थिक पार्श्वभूमी मध्यमवर्गीय असून, ऑनलाइन गेम खेळण्यासाठी लागणाऱ्या पैशांसाठी त्यांनी दरोड्याचा मार्ग स्वीकारला. चंद्रकांत यादवने पिस्तुलाची व्यवस्था केली आणि दुकानाची रेकीही केल्याचे तपासात समोर आले आहे.
हा तपास घाटकोपर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग साळुंखे, पोलीस हवालदार दिपक भारती, निलेश पवार, अमोल सूर्यवंशी आणि अजय अहिरे यांच्या पथकाने केला.







