मुंबईच्या माहिम परिसरात मंगळवारी सकाळी एक खळबळजनक घटना घडली. कपडा बाजार परिसरातील प्लस मेडिकल या मेडिकल स्टोअरमध्ये घुसून एका व्यक्तीने केमिस्टवर एअरगन रोखत जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेची माहिती मिळताच माहिम पोलिसांनी तातडीची कारवाई करत आरोपीला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सौरभ कुमार सिंह (वय ३५ वर्षे) असे आहे.
माहिम पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी आणि मेडिकल स्टोअरच्या मालकात पूर्वीपासून वाद होता. त्याच रागातून आरोपीने ही कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास आरोपीने चेहरा रुमालाने अंशतः झाकून मेडिकल स्टोअरमध्ये प्रवेश केला आणि आत असलेल्या केमिस्टला एअरगन दाखवून धमकावू लागला.
ही संपूर्ण घटना दुकानात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मात्र केमिस्टने प्रसंगावधान राखत संयम दाखवला आणि धैर्याने आरोपीला दुकानाबाहेर काढले. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.
हे ही वाचा:
उद्योजक प्रशांत कारुळकर यांना देवरुखे भूषण पुरस्कार
ऊर्जा क्षेत्रात क्रांतीची नांदी; तारांशिवाय वाहिली वीज! प्रकरण काय?
अमेरिका- फ्रान्स टॅरिफ युद्ध: फ्रेंच वाइनवर २०० टक्के टॅरिफ लावणार
भारत- बांगलादेश तणावादरम्यान ‘चिकन नेक’जवळ चीनी राजदूतांचा दौरा
केमिस्टने दिलेल्या तक्रारीवरून माहिम पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली असून घटनेत वापरण्यात आलेली एअरगनही जप्त करण्यात आली आहे. पोलिसांकडून आरोपीच्या नेमक्या हेतूंची आणि घटनेमागील कारणांची सखोल चौकशी सुरू असून पुढील तपास सुरू आहे.







