मध्य प्रदेशातील हॉक फोर्स आणि पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत तीन महिला नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी बुधवारी या चकमकीची माहिती दिली आहे. बालाघाट जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गढी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुपखार वन परिक्षेत्रातील रौंडा वन छावणीजवळ सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी घटनास्थळावरून तीन शस्त्रेही जप्त करण्यात आली आहे. INSAS (इंडियन स्मॉल आर्म्स सिस्टम) रायफल, सेल्फ- लोडिंग रायफल (SLR) आणि 303 रायफल अशी शस्त्रे जप्त करण्यात आली असून इतर दैनंदिन वापराच्या वस्तूही सापडल्या आहेत. तीन महिला नक्षलवादी या कारवाईत ठार झाल्या असून आणखी काही नक्षलवादी जखमी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हे नक्षलवादी घनदाट जंगलाचा फायदा घेऊन पळून गेले, असा अंदाज आहे.
हॉक फोर्स, CRPF, कोब्रा आणि जिल्हा पोलिस दलासह १२ हून अधिक पथकांद्वारे त्यांचा शोध घेण्यासाठी या परिसरात शोध मोहीम सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री मोहन यादव यांनी नक्षलवाद्यांना ठार केल्याबद्दल पोलिस दलाचे कौतुक केले. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या मोहिमेचा भाग म्हणून राज्य सरकार २०२६ पर्यंत देशातून नक्षलवाद संपवण्यासाठी गांभीर्याने काम करत असल्याचेही सांगितले.
हे ही वाचा..
संगमाच्या पाण्याची गुणवत्ता स्नान करण्यासाठी योग्य
कारवार नौदल तळाची माहिती लीक करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या
शेतकरी नेते सुखविंदर सिंग सुख गिल यांच्यावर गुन्हा
काँग्रेसच्या मोफत धोरणाचा फटका हिमाचल प्रदेशाला
मोहन यादव म्हणाले की, “मी मध्य प्रदेश पोलिसांचे अभिनंदन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे २०२६ पर्यंत देशातून नक्षलवाद संपवण्यासाठी मोहीम राबवत आहेत आणि आमचे सरकार देखील या दिशेने गांभीर्याने काम करत आहे. आज, तीन महिला नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. शिवाय शस्त्रे देखील जप्त करण्यात आली आहेत. राज्यात नक्षलवाद्यांना जागा राहणार नाही,” असा निर्धार मुख्यमंत्री मोहन यादव यांनी बोलून दाखवला आहे. तसेच पुढे ते म्हणाले की, राज्यातून नक्षलवाद्यांना संपवण्यासाठी पोलिस पूर्ण क्षमतेने काम करत असून सैन्याला पूर्ण मदत करण्यासाठी सर्व व्यवस्था देखील केल्या आहेत.