प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात करोडोंच्या संख्येने लोक त्रिवेणी संगमात डुबकी घ्यायला येत असताना हे पाणी अंघोळीसाठी चांगले नसल्याचा दावा करणारा अहवाल समोर आला होता. यावरून विरोधकांकडून टीका केली जात असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे दावे फेटाळून लावले आहेत.
प्रयागराज येथील आयोजित महाकुंभमेळ्यादरम्यान पाण्याची गुणवत्ता स्नान करण्यासाठी आणि आचमन (पाणी पिण्याचा विधी) करण्यासाठी योग्य असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. तसेच हे पाणी आंघोळीसाठी अयोग्य असल्याचा प्रचार करणाऱ्या विरोधकांवर टीका केली आहे. प्रयागराजमधील गंगा नदीत ‘फेकल कॉलिफॉर्म’ बॅक्टेरियाचे धोकादायक प्रमाण आढळून आल्याच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) अहवालावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी हे विधान केले आहे.
उत्तर प्रदेश विधानसभेत बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, महाकुंभमेळ्यात ५६.२५ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले आहे आणि स्नान केलेल्या अनेकांनी या व्यवस्थेचे कौतुक केले आहे. जेव्हा आपण सनातन धर्म, गंगा माता, भारत किंवा महाकुंभ यांच्याविरुद्ध कोणतेही निराधार आरोप करतो किंवा बनावट व्हिडिओ दाखवतो, तेव्हा ते या ५६ कोटी लोकांच्या श्रद्धेशी खेळण्यासारखे आहे, असे म्हणत योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत.
योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (यूपीसीबी) अहवालाचा हवाला देत म्हटले की, गंगा नदीत जैविक ऑक्सिजन मागणी (बीओडी) पातळी ३ मिलीग्राम/लिटरपेक्षा कमी आहे आणि विरघळलेल्या ऑक्सिजनची (डीओ) पातळी ५ मिलीग्राम/लिटरवरून ९ मिलीग्राम/लिटरपर्यंत सुधारली आहे. सीपीसीबीनुसार, फेकल कॉलिफॉर्म जे सांडपाण्याच्या दूषिततेचे एक प्रमुख सूचक आहे ते प्रति १०० मिली मागे २,५०० युनिट्सच्या आत असावे.
हेही वाचा..
कारवार नौदल तळाची माहिती लीक करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या
शेतकरी नेते सुखविंदर सिंग सुख गिल यांच्यावर गुन्हा
काँग्रेसच्या मोफत धोरणाचा फटका हिमाचल प्रदेशाला
राहुल गांधींनी तोडले अकलेचे तारे; छत्रपती शिवरायांना जयंतीच्या दिवशी वाहिली श्रद्धांजली
१४४ वर्षांनंतर होणाऱ्या महाकुंभाला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. लालू प्रसाद यादव आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्याचा उल्लेख त्यांनी केला. समाजवादी पक्षाच्या अध्यक्षांनी विचारले की महाकुंभावर पैसे खर्च करण्याची काय गरज होती. लालू यादव यांनी कुंभाला ‘फालतू’ म्हटले. तर, आणखी एका पक्षाने सांगितले की महाकुंभ ‘मृत्यू कुंभ’ बनला आहे. जर सनातन धर्माशी संबंधित कार्यक्रम आयोजित करणे गुन्हा असेल, तर आमचे सरकार तो गुन्हा करत राहील, असे ठाम मत योगी आदित्यनाथ यांनी मांडले.