नाशिकच्या काठेगल्ली परिसरात मंगळवारी रात्री उशिरा दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. या भागातील अनधिकृत दर्गा हटवण्यापूर्वीच राडा झाला. जमावाने पोलिसांवर दगडफेक केली असून यात काही पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, काही वाहनांचेही नुकसान झाले. सध्या पोलिस बंदोबस्तात पहाटेपासून दर्गा हटवण्याचे काम सुरू आहे. काठेगल्ली परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
माहितीनुसार, नाशिक महानगरपालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत दर्ग्याला १ एप्रिल रोजी नोटीस बजावली होती. स्वतःहून अनिधिकृत दर्ग्याचे बांधकाम काढून टाका अन्यथा पालिकेकडून तोडकाम करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. मात्र, पालिकेने दिलेली मुदत संपल्यानंतरही कारवाई झाली नसल्यामुळे आज अनधिकृत दर्गा पाडण्याचे काम पालिकेकडून सुरू करण्यात आले. पण, काल रात्रीच याबाबत अफवा पसरली आणि जमावाने काठेगल्ली गाठली. वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे जमाव आणखी आक्रमक झाला. काठेगल्लीमध्ये रात्री ५०० पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी ४०० पेक्षा जास्त लोकांचा जमाव एकाचवेळी आला आणि जमावाने आक्रमक होत पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये अनेक पोलिस जखमी झाले.
हे ही वाचा :
‘मोदी काफीर आहेत, त्यांना मत देणारेही काफिर’
बंगाल वक्फ हिंसाचारात बांगलादेशी बदमाशांचा सहभाग!
चीनने अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून ऑर्डर घेणे केले बंद!
डिजिटल अरेस्टप्रकरणी चार जणांच्या मुसक्या आवळल्या; ७.६७ कोटींची झालेली फसवणूक
दगडफेक करणाऱ्या जमावातील काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आठपेक्षा अधिक जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. या तणावपूर्ण परिस्थितीवर परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या काठेगल्ली परिसरातील वाहतूक मार्गात अनेक बदल केले आहेत. मोठ्या पोलिस बंदोबस्तात दर्गा पाडण्याचे काम सुरू असून परिसरातील १०० मीटरच्या अंतरावर बॅरिकेडींग करण्यात आले आहे. कोणालाही आत जाण्यास परवानगी नाही. दुपारपर्यंत हा अनधिकृत दर्गा हटवण्यात येणार आहे, अशी माहिती आहे.