अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील अनेक देशांवर नवीन आयात शुल्क लागू केले होते. यातून अनेक देशांना त्यांनी तात्पुरती सूट देऊ केली असून चीनला मात्र दणका देण्याचे काम सुरूचं ठेवले आहे. चीनवर मात्र विशेष निशाणा साधत अमेरिकेने चिनी वस्तूंवर १४५ टक्के इतका कर लादला आहे. तर चीननेही पलटवार करत गेल्या आठवड्याच्या शेवटी सर्व अमेरिकन उत्पादनांवर १२५ टक्के प्रत्युत्तरात्मक कर लादला. यामुळे अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर सुरू आहे. दरम्यान, चीनला सातत्याने भारताची आठवण येताना दिसत आहे. ट्रम्प प्रशासनाने लादलेल्या शुल्कामुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी भारत आणि चीनने एकत्र उभे राहिले पाहिजे, असे भारतातील चिनी दूतावासाच्या प्रवक्त्यांनी यापूर्वी जाहीरपणे म्हटले होते. यानंतर चीनने भारतातील नागरिकांसाठी व्हिसा संबंधी निर्णय घेतला आहे.
भारतातील चिनी दूतावासाने १ जानेवारी ते ९ एप्रिल २०२५ दरम्यान भारतीय नागरिकांना ८५,००० हून अधिक व्हिसा जारी केले आहेत, जे दोन्ही देशांमधील लोकांमधील संबंध वाढवण्याच्या प्रयत्नावर प्रकाश टाकते. भारतातील चीनचे राजदूत झू फेईहोंग यांनी अधिकाधिक भारतीयांना चीनला भेट देण्यासाठी आणि तेथील खुले, सुरक्षित आणि मैत्रीपूर्ण वातावरण अनुभवण्यासाठी आमंत्रित केले आहे. “९ एप्रिल २०२५ पर्यंत, भारतातील चिनी दूतावास आणि वाणिज्य दूतावासांनी या वर्षी चीनला जाणाऱ्या भारतीय नागरिकांना ८५,००० हून अधिक व्हिसा जारी केले आहेत. भारतीय मित्रांचे चीनला भेट देण्यासाठी स्वागत आहे, खुल्या, सुरक्षित, उत्साही, प्रामाणिक आणि मैत्रीपूर्ण चीनचा अनुभव घ्या,” असे झू यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
चीनचा हा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देशांना संभाव्य शुल्काचा इशारा देत आहेत. त्यातही प्रमुख व्यापारी भागीदार आणि सर्वोच्च आर्थिक प्रतिस्पर्धी असलेल्या चीनला लक्ष्य करण्यात येत आहे. ट्रम्प यांनी चिनी आयातीवरील एकत्रित शुल्क वाढवून तीव्र वाढ जाहीर केल्यानंतर, चीनने अलिकडेच भारताला अमेरिकेला विरोध करण्यासाठी आपल्यासोबत उभे राहण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे या व्हिसाच्या माध्यमातून चीन पुन्हा एकदा भारताशी जवळीक साधू पाहत असल्याचे बोलले जात आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने ही पावले उचलली जात आहेत, अशा चर्चा आहेत.
हे ही वाचा :
सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध MUDA प्रकरणात पुढील चौकशीचे आदेश
बंगाल वक्फ हिंसाचारात बांगलादेशी बदमाशांचा सहभाग!
‘हिंदू देवतांमध्ये शक्ती असती तर आक्रमकांना शाप देत नष्ट केले असते!’
डिजिटल अरेस्टप्रकरणी चार जणांच्या मुसक्या आवळल्या; ७.६७ कोटींची झालेली फसवणूक
भारतीय प्रवाशांसाठी व्हिसामध्ये कोणत्या सवलती?
- भारतीय प्रवासी व्हिसा केंद्रांमध्ये जाऊन कामाच्या दिवशी त्यांचे अर्ज सादर करू शकतात आणि त्यांना ऑनलाइन अपॉइंटमेंट आगाऊ बुक करण्याची आवश्यकता नाही.
- चीनमध्ये कमी कालावधीसाठी प्रवास करणाऱ्यांना बायोमेट्रिक डेटा देण्याची आवश्यकता नाही, ज्यामुळे प्रक्रियेचा वेळ कमी होणार.
- चीनमधील व्हिसा कमी दरात उपलब्ध आहेत, यामुळे भारतीय पर्यटकांसाठी चीनचा प्रवास अधिक बजेटमध्ये बसणारा झाला आहे.
- व्हिसा मंजुरीची प्रक्रिया अधिक जलद गतीने केली जात आहे.