दुबईतील एका बेकरीमध्ये घोषणाबाजी देत एका पाकिस्तानी नागरिकाने केलेल्या हल्ल्यात तेलंगणातील दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, आणखी एक जण जखमी झाला आहे. अष्टपू प्रेमसागर (वय ३५ वर्षे) आणि श्रीनिवास यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. सागर नावाचा तिसरा व्यक्ती जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तेलंगणामधील निर्मल जिल्ह्यातील सोन गावातील अष्टपू प्रेमसागर (वय ३५ वर्षे) यांची ११ एप्रिल रोजी तलवारीने हत्या करण्यात आली, असे त्यांचे काका ए पोशेट्टी यांनी माहिती दिली. ही हल्ल्याची घटना पीडित लोक ज्या बेकरीत काम करत होते तिथे घडली. प्रेमसागर हे गेल्या पाच- सहा वर्षांपासून त्या बेकरीमध्ये काम करत होते. पोशेट्टी म्हणाले की, तो शेवटचा दोन वर्षांपूर्वी त्याच्या कुटुंबाला भेटायला भारतात आला होता. प्रेमसागर यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत. त्यांच्या कुटुंबियांना या दुर्घटनेची माहिती देण्यात आलेली नाही, असे पोशेट्टी म्हणाले. प्रेमसागर याचे पार्थिव भारतात आणण्यास मदत करण्याची विनंती त्यांनी सरकारला केली.
दरम्यान, केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी म्हणाले की, दुसऱ्या मृताचे नाव श्रीनिवास होते, जे निजामाबाद जिल्ह्यातील रहिवासी होते. या हल्ल्यात सागर नावाचा तिसरा पुरूष जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती त्याची पत्नी भवानी यांनी दिली. या घटनेबद्दल दुःख व्यक्त करताना रेड्डी म्हणाले की, त्यांचे पार्थिव भारतात आणण्यासाठीच्या मदतीसाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी बोललो आहे. “दुबईमध्ये तेलंगणातील दोन तेलुगू तरुणांची निर्मळ जिल्ह्यातील अष्टपु प्रेमसागर आणि निजामाबाद जिल्ह्यातील श्रीनिवास यांच्या क्रूर हत्येने मला धक्का बसला आहे. या प्रकरणावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी बोललो आणि त्यांनी शोकग्रस्त कुटुंबांना पूर्ण पाठिंबा देण्याचे आणि मृतदेह तातडीने मायदेशी परत आणण्याचे आश्वासन दिले आहे,” असे रेड्डी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. जयशंकर यांच्या मदतीबद्दल आभार मानताना त्यांनी सांगितले की, परराष्ट्र मंत्रालय (MEA) या प्रकरणात जलद न्याय मिळावा यासाठी देखील काम करेल.
हे ही वाचा :
‘मोदी काफीर आहेत, त्यांना मत देणारेही काफिर’
बंगाल वक्फ हिंसाचारात बांगलादेशी बदमाशांचा सहभाग!
चीनने अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून ऑर्डर घेणे केले बंद!
डिजिटल अरेस्टप्रकरणी चार जणांच्या मुसक्या आवळल्या; ७.६७ कोटींची झालेली फसवणूक
केंद्रीय गृह राज्यमंत्री बंदी संजय कुमार यांनी दुःख व्यक्त करताना सांगितले की त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला आहे आणि केंद्रीय गृह मंत्रालयाचे अधिकारी त्यांच्या संपर्कात आहेत. “११ एप्रिल रोजी दुबईतील मॉडर्न बेकरी एलएलसीमध्ये कामाच्या वेळेत एका पाकिस्तानी नागरिकाने केलेल्या क्रूर हल्ल्यात तेलंगणातील कामगार अष्टपू प्रेमसागर आणि श्रीनिवास यांच्या हत्येमुळे दुःख झाले आहे,” असे त्यांनी एक्स वर म्हटले आहे. तसेच या प्रकरणाचा तातडीने पाठपुरावा करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या जलद प्रतिसादाबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले.