पंधरा वर्षीय मैत्रिणीला ३२ व्या मजल्यावरून लोटून आत्महत्या असल्याचा बनाव करणाऱ्या १६ वर्षीय मुलावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भांडुप पोलिसांनी या मुलाला अटक केली असून त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.
भांडुप पश्चिम या ठिकाणी असलेल्या एका ३२ मजली इमारतीच्या डी विंग जवळ २४ जून रोजी १५ वर्षाच्या मुलीचा मृतदेह भांडुप पोलिसांना मिळून आला होता.पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली असता हा मृतदेह मुलुंड पूर्वेत राहणाऱ्या मुलीचा असल्याचे समोर आले. २४ जून रोजी बळीत मुलगी भांडुप येथे राहणाऱ्या मित्राला भेटायला आली होती, दोघेही मुलाच्या राहत्या इमारतीच्या डी विंगच्या ३२व्या मजल्यावरील टेरेसवर गेले होते.
पोलिसांनी या मुलांकडे याबाबत चौकशी केली असता,आम्ही दोघे टेरेसवर गेलो होतो, त्या ठिकाणी आम्ही गप्पा मारल्या, मुलीने पुन्हा नापास होऊन त्याच वर्गात बसण्याची भीती मुलाजवळ बोलून दाखवली होती, त्यानंतर तिचा मित्र तिला एकटीला सोडून निघून गेला होता त्यानंतर काय झाले त्याला काहीच माहित नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते.
हे ही वाचा:
कझाकस्तानमध्ये आता नकाबवर बंदी
फडताळातील सांगाडे दाखवून किती काळ घाबरवणार ?
…तर ‘एअर लोरा’ कराची, रावळपिंडी, बहावलपूरला लक्ष्य करू शकते!
टीम इंडियाचा कमबॅक प्लान तयार – एजबेस्टनवर हिसका दाखवण्याची वेळ!
परंतु हा सर्व प्रकार संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी तपास सुरू केला आणि इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन सुरक्षा रक्षक आणि डी विंग मधील काही रहिवाश्यांकडे चौकशी केली असता मुलाने सांगितलेला घटनाक्रम आणि इमारतीत राहणाऱ्यानी सांगितलेली माहितीत पोलिसांना तथ्य आढळून आले नाही.तसेच मुलाने सांगितल्या प्रमाणे तो तिला सोडून जिममध्ये गेला होता पोलिसांनी जिम मधील त्यांच्या येण्याची वेळ तपासली असता रजिस्टर मध्ये खाडाखोड आढळून आली.पोलिसांचा संशय आणखीच बळावला, पोलिसांनी या मुलाला सोमवारी ताब्यात घेऊन त्याच्या वडीलासमोर त्याच्याकडे उलटतपासणी केली असता त्याने कबुल केले की, त्याने यापूर्वी दिलेली माहिती खोटी होती.
“मैत्रीण भेटायला आली होती, तिचे माझ्यावर प्रेम होते, मात्र मी केवळ तीला मैत्रीण समजत होतो, तिने डेटवर जाण्याबद्दल विचारले,मी तिला नकार दिल्यामुळे तिने मला धक्का दिला म्हणून मला राग आला आणि मी तिला धक्का दिला असता ती खाली कोसळली, तिचा मोबाईल टेरेस वर पडला मी तो ई विंग च्या दिशेने फेकला,असे संशयिताने पोलिसांना माहिती दिली. भांडुप पोलिसांनी आत्महत्येचे रूपांतर हत्येच्या गुन्ह्यात करून १६ वर्षाच्या मुलाला त्यात आरोपी बनवून त्याला अटक करून बाल सुधारगृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे.
