भाजपाचे खासदार निशिकांत दुबे हे अत्यंत अभ्यासू आहेत. जुने-पुराणे दस्तावेज शोधून काढायचे, त्याचे धारधार तीर बनवायचे आणि ते काँग्रेसवर सोडायचे, यात ते वाकबगार आहेत. गेल्या काही अधिवेशनात त्यांनी थेट सोनिया गांधी आणि त्यांच्या परिवारावर शरसंधान केलेले आहे. स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात १५० काँग्रेस नेते रशियाच्या पे-रोलवर होते, असा खळबळजनक आरोप त्यांनी केलेला आहे. पुरावा म्हणून नेहमीप्रमाणे काही कागदपत्रे सादर केलेली आहेत. ते जे काही बोलले त्यात निर्विवादपणे दम आहे. मुद्दा तो नाही, काल त्यांनी एक्सवर जी पोस्ट केली त्यातल्या अखेरच्या वाक्यात ते सवाल करतात, आज इस पर जांच हो या नही? या प्रश्नावर आमचा आक्षेप आहे. दर वेळी फडताळातील सांगाडे दाखवून उपयोग काय, त्यापुढे काही तरी झाले पाहिजे.
गेल्या काही अधिवेशनात निशिकांत दुबे यांनी उपस्थित केलेले मुद्दे अत्यंत गंभीर होते. जॉर्ज सोरोस यांचे काँग्रेस कनेक्शन, सोनिया गांधी, राहुल गांधी, सॅम पित्रोदा यांचे सोरोस यांच्याशी संबंधांबाबत त्यांनी अनेक पुरावे सादर केले. संसदेत राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वाचा प्रश्न असो वा गांधी परिवाराशी संबंधित कोणताही मुद्दा दुबे संसदेत पेपर घेऊन उभे आहेत, असे चित्र वारंवार दिसलेले आहे. काँग्रेसचे १५० खासदार केजीबीच्या पे रोल वर होते, त्यानंतर इंदिरा गांधी यांनी सीआयएशी सुद्धा संधान बांधले. त्यांच्याकडून पैसे घ्यायला सुरूवात केली, असा ताजा आरोप त्यांनी आज केलेला आहे. त्यासाठी १९७९ मध्ये संसदेत झालेल्या चर्चेचा हवाला दिलेला आहे. अमेरिकेचे तात्कालिन राजदूत मोयनिहान यांच्या अ डेंजरस प्लेस या पुस्तकावर राज्यसभेत चर्चा झाली. या पुस्तकात अमेरिकेने दोनवेळा भारतातील निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केला. काँग्रेस पक्षाला पैसा पुरवला. एकदा तर मी स्वत: इंदिरा गांधींना पैसा दिल्याचे त्यांनी या पुस्तकात म्हटले आहे.
हे ही वाचा:
लुटलेले दीड कोटींचं सोनं १८ तासांत मिळवलं !
…तर ‘एअर लोरा’ कराची, रावळपिंडी, बहावलपूरला लक्ष्य करू शकते!
लुटारूशाही ही हिमाचल सरकारची ओळख
टीम इंडियाचा कमबॅक प्लान तयार – एजबेस्टनवर हिसका दाखवण्याची वेळ!
दुबे यांनी काल आणि आज केलेल्या पोस्टमध्ये काँग्रेसचे वस्त्रहरण केलेले आहे. काँग्रेसवाले एकेकाळी केजीबीकडून पैसे घ्यायचे. काही लोकांना दरमहा पाकिट जायचे. काही लोकांना मोफत रशिया यात्रा, काही नेत्यांच्या मुलांना रशियात फुकट शिक्षण. सुमारे १५० नेते लाभार्थी होते. काँग्रेस नेते एच.के.एल. भगत त्यांचे नेतृत्व करत होते. दुबे यांनी हा जो आरोप केला आहे, त्यात काही नवे नाही. ताश्कंद फाईल्समध्ये हेच सगळे दाखवण्यात आले आहे. केजीबीचे एजण्ट विसीली मित्रोखीन याने १९३० ते १९८० या काळात घडलेल्या बऱ्याच गोष्टी पुराव्यासह टिपून ठेवल्या. १९९२ मध्ये ब्रिटनमध्ये गेला. ख्रिस्तोफर एण्ड्रू यांनी या कागदपत्रांचा अभ्यास करून द सोअर्ड एण्ड द शिल्ड, द वर्ल्ड इज गोईंग अवर वे ही पुस्तके लिहिली.
मित्रोखीनची ही कागदपत्र खळबळजनक आहेत. सोव्हिएट रशियाचा अन्य देशांमध्ये असलेला हस्तक्षेप, तिथे रशियाचे हित साधण्यासाठी त्यांनी निर्माण केलेले एजण्टचे जाळे, तिथे पुरवलेला पैसा या सगळ्या गोष्टी या कागदपत्रांमध्ये आहेत. भारताच्या राजकारणाबाबत आणि या राजकारणाचा केंद्र बिंदू असलेल्या काँग्रेस पक्षाबाबत या कागदपत्रांत भरपूर मसाला आहे. रशियाचा शत्रू असलेला अमेरिका या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून होता. त्या काळात भारतात सीआयएचा सुद्धा सुळसुळाट होता. त्यामुळे त्यांच्या कागदपत्रांतही काँग्रेस-केजीबी प्रेमसंबंधांबाबत भरपूर माहिती आहे.
काँग्रेसचे १५० नेते, अनेक पत्रकार, वृत्तसंस्था केजीबीसाठी कशा कार्यरत होत्या. याबाबत दुबे यांनी दिलेली माहिती सीआयएच्या कागदपत्रांत होती. ती २०११ मध्ये डीक्लासिफाईड कऱण्यात आली. म्हणजे जनतेसाठी खुली करण्यात आली. आज निशिकांत दुबे यांनी जी पोस्ट केली आहे. त्यात राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि हेन्री किसिंजर यांच्या संभाषणात काँग्रेसला ३०० कोटी देण्याबाबत चर्चा केली होती.
काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी हे आरोप खळबळ निर्माण कऱण्यासाठी करण्यात आले असून तो पोकळ असल्याचा दावा केला. काँग्रेसवाले या आरोपांना फार मनावर घेत नाहीत. भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी तर सोनिया गांधी यांच्यावर यापेक्षाही भयंकर आरोप केलेले आहेत. बांग्लादेशातील पत्रकार सल्लाउद्दी शोएब चौधरी याने तर सोनिया गांधी यांचे आयएसआय़शी संबंध होते. असे आरोप केले आहेत.
हे सगळे ऐकल्यानंतर लोकांचाही या आरोपांवर विश्वास बसतो. तो बसला नसता तर काँग्रेसची नाव अशी चिखलात अडकली नसती. गेल्या काही वर्षांत या पक्षाचा आलेख खाली खाली गेला नसता. निशिकांत दुबे यांना काँग्रेसचे हिशोब चुकते करायचे आहे, त्यांना सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना बदनाम करायचे आहे, असे कोणी म्हणू शकतो. परंतु रशियाच्या केजीबीचा एजण्ट मित्रोखीन किंवा अमेरिकेचा भारतातील तत्कालीन राजदूत मोहनिहान यांचे काँग्रेस पक्षाशी काही वैर असण्याचे कारण नाही. त्यांना कोणाचे हिशोब चुकेत करण्याची काही गरज वाटत नसावी. त्यांनी ही माहिती उघड केली आहे. दुबे ती पुन्हा एकदा समोर आणतायत. परंतु असे आरोप करायचे आणि आज इस पर जांच हो या नही, असे प्रश्न जनतेला विचाराचये हा मात्र शुद्ध आचरटपणा आहे. कारण निशिकांत दुबे हे सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत. संसदेत त्यांना जितका वेळ बोलायला मिळतो ते लक्षात घेतले तर ते वरिष्ठ नेत्यांचे विश्वासू आहेत, ही बाबही स्पष्ट आहे. आपल्या मनातल्या प्रश्नांची आणि समस्यांची उत्तरे मिळावीत म्हणून जनता दुबे यांच्यासारख्या नेत्यांना संसदेत पाठवते. दुबे तर सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत. त्यांना ही उत्तरे शोधायची असतात. द्यायची असतात. ते जेव्हा ती उत्तरे द्यायची सोडून सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर जनतेला प्रश्न विचारतात की, या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे की नाही, तेव्हा हसावे की रडावे तेच कळत नाही.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे प्रताप जनतेला कळले आहेत, म्हणूनच त्यांना जनतेने सत्तेवरून खाली खेचले. २०१९ च्या निवडणुकीत त्यांना ५० च्या आत नेऊन आपटले. आता ९९ खासदार निवडून आल्यावर त्यांना आकाशाला हात लागल्याचा भास होतोय ते काही उगाचच नाही. केंद्र सरकार शक्तिशाली आहे. त्यांनी या मायलेकांच्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून त्यांचा योग्य तो न्याय करावा, कायद्यानुसार त्यांचा करेक्ट कार्यक्रम करावा अशी अपेक्षा जनता बाळगून आहे. त्या जनतेसमोर नियमितपणे काही तरी खळबळजनक गौप्यस्फोट करत राहायचे, जनतेच्या आशा वाढवत राहायच्या असा प्रकार भाजपाचे नेते करीत आहेत.
लोकांना आता वाटू लागलंय की, देशात गेली अनेक दशके वाटमारी करणाऱ्या या नेत्यांना शासन कऱण्यापेक्षा त्यांना फडताळातील सांगाडे दाखवून सतत घाबरवत राहायचे, अशी रणनीती भाजपाने स्वीकारली आहे. दुबे यांच्यासारखे लोक नित्यनियमाने हे काम करत असतात. हे कुठे तरी थांबले पाहिजे. कधी काळी पाकिस्तानने भारतात दहशतवादी कारवाया केल्यानंतर काँग्रेस पक्षाचे नेते सतत कडी निंदा करून थांबायचे, तसा हा प्रकार आहे. भाजपाच्या नेत्यांनी आता सोनिया गांधी, राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाची ही निंदा थांबवावी आणि त्याच्या पुढे पाऊल टाकावे. झाले इतके पुरे झाले, एवढेच आम्हाला सांगायचे आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
