34 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरसंपादकीयलाल किल्ल्यावरून भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढ्याची हाक...

लाल किल्ल्यावरून भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढ्याची हाक…

Google News Follow

Related

देश ७६ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करतोय. सालाबादप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. सर्वसामान्य भारतीयाला ऊर्जा प्रदान करणारे हे भाषण होते. आपल्या प्रदीर्घ भाषणात त्यांनी महिला सबलीकरण, हिंदुस्तानला लाभलेली भव्यदिव्य परंपरा, स्वातंत्र्य आंदोलनातील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान, आत्मनिर्भर भारत, रसायन मुक्त शेती, इंधनाबाबत आत्मनिर्भरता, डिजीटल तंत्रज्ञान, शंभराव्या स्वातंत्र्यदिनी अपेक्षित असलेले देशाचे चित्र, कोविड काळात देशाने एकसंधपणे महामारीचा केलेला मुकाबला, अशा अनेक बाबींवर चर्चा केली.

पण, भाषणाच्या शेवटी ते जे काही म्हणाले त्यामुळे देशातील भ्रष्टाचाऱ्यांच्या पोटात गोळा आला असणार. भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या विरोधात लढण्यासाठी मला तुमची साथ हवी आहे, असे आवाहन मोदी यांनी केले. परिवारवाद केवळ एकाच परिवाराचे भले करतो, घराणेशाहीत देशाच्या भल्याचा विचार नाही, असा घणाघात मोदींनी केला.

भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून मोदींचे नाव जाहीर झाल्यापासून त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून काँग्रेसला लक्ष्य केले आहे. गेल्या आठ वर्षात त्यांनी भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी अनेक आश्वासक पाऊले उचलली. ते पाहता मोदी यांच्या आजच्या वक्तव्यामुळे अनेकांची झोप उडाली असणार यात शंकाच नाही.

गेल्या काही वर्षात भ्रष्टाचार विरोधी मोहीम अधिक तीव्र झाली. अंमलबजावणी संचनालय, आयकर विभाग आदी तपास यंत्रणा प्रचंड सक्रीय झाल्या. भ्रष्ट राजकीय नेते, अधिकारी, व्यापारी, उद्योजक यांच्याविरोधात केंद्र सरकारने मोठी आघाडी उघडली आहे. कोट्यवधी रुपयांची रोकड आणि अगणित संपत्ती या कारवायांमध्ये जप्त करण्यात आली आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. अनेक राजकीय नेते गजाआड झाले आहेत, असे चित्र असताना भ्रष्टाचारविरोधी लढा अधिक तीव्र करण्याचे संकेत पंतप्रधान मोदी यांनी दिले आहेत. भ्रष्टाचार ही देशाला आतून पोखरणारी वाळवी आहे, वेळीच उपाय केला नाही तर भविष्यात त्याचे भयंकर परीणाम होतील, असा इशारा त्यांनी दिला.

मला हा लढा तीव्र करायचा आहे, तो निर्णायक पातळीवर न्यायचा आहे. त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे.
भ्रष्टाचाराबद्दल लोकांच्या मनात घृणा आहे, परंतु अनेकदा भ्रष्टाचाऱ्यांबद्दल सहानुभूती दिसते. भ्रष्टाचार प्रकरणात आरोपी म्हणून सिद्ध झाल्यानंतर, कारवाई झाल्यानंतरही हे लोक समाजात मिरवतात. अनेकदा त्यांना प्रतिष्ठा मिळते अशा लोकांबाबत लोकांच्या मनात तिरस्कार निर्माण झाला पाहिजे, त्यांना माना खाली घालून वावरायला लागले पाहिजे, असे आवाहन मोदींनी केले. त्यामुळे भविष्यात काय घडणार याचे संकेत मिळाले आहेत.

देश भ्रष्टाचारविरोधी लढ्यात एका निर्णायक वळणावर आहे, यातून आता मोठे मासेही वाचू शकणार नाहीत, अशी गर्जना मोदी यांनी केली. याचा अर्थ स्पष्ट आहे, देशात ज्या नेत्यांच्या आणि बड्या धेंडांच्या विरोधात भ्रष्टाचाराची प्रकरणे आहेत, त्यांची सुटका नाही याचे संकेत मोदींनी दिले आहेत.

हा इशारा अनेकांना आहे. गांधी परिवाराविरुद्ध नॅशनल हेराल्ड प्रकरणी सुनावणी सुरु आहे. सोनिया आणि राहुल गांधी जामीनावर बाहेर आहेत. महाराष्ट्रात ठाकरे परिवार, पवार कुटुंबिय यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे. पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगढ अशा अनेक राज्यात ही मोहीम सुरू आहे. शिवसेना नेते संजय राऊतांच्या अटकेनंतर सेटलमेंटचे राजकारण यापुढे चालणार नाही, असे स्पष्ट संकेत पंतप्रधानांनी दिले आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात गांधी परिवारासह अनेक बड्या धेंडाना तुरुंगात जावे लागले तर आश्चर्य वाटायला नको.

भ्रष्टाचाराबरोबर मोदींनी घराणेशाही विरोधातही तोफ डागली आहे. खरे तर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची प्रकरणे सुरू आहेत, त्यातली अनेक मंडळी घराणेशाहीतूनच पुढे आलेली आहेत. घराणेशाही राजकारणातून समाजाच्या सर्वस्तरात झिरपलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला संधी नाकारल्या जातायत. ही बाब देशाच्या प्रगतीच्या आड येते आहे, अशी तोफ मोदींनी डागली.

हे ही वाचा:

‘भ्रष्टाचार आणि घराणेशाही नष्ट करू’

राणा अयुबने चक्क सलमान रश्दींचे समर्थन केले मग केले ट्विट डिलिट

देशाचै पाऊल लवकरच ५ जी मोबाईल युगाकडे

मुकेश अंबानी आणि कुटुंबीयांना धमकीचा काॅल

मोदींनी या दोन प्रवृत्तींवर वरवंटा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, देशातील बड्या धेंडाना हात लावणे सोपे नाही हे मोदींनाही ठाऊक आहे. बड्या नेत्यांना हात लावला तर देशात जाळपोळ, दंगलीच्या मार्गाने अराजक माजवण्याचा प्रयत्न होईल. सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ पुरावे दिले तरी, लोकशाहीची हत्या, अघोषित आणीबाणी असा अपप्रचार करून लोकांना भडकवण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे हा लढा जनतेच्या साथीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, हे मोदींना ठाऊक आहे.

कोविड महामारीच्या काळात जनता मोदींच्या पाठीशी ठामपणे उभी राहिलेली दिसते. जनता कर्फ्यू असो, थाळी वाजवण्याचे किंवा दिवे लावण्याचे आवाहन, लोकांनी त्याला भरभरून पाठींबा दिला. विरोधक आणि टीकाकारांनी या आवाहनांची खिल्ली उडवण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करून जनता मोदींच्या पाठीशी उभी राहीली. हर घर तिरंगा अभियान हे त्याचे ताजे उदाहरण. शहर असो वा गावखेडे, श्रीमंत असो वा गरीब प्रत्येकजण या अभियानाच्या पाठीशी मजबूतीने उभा राहीला. घरा घरावर तिरंगा फडकतोय हे चित्र जगाने पाहिले. वेळोवेळी जनतेला पाठीशी उभे करण्यात मोदींना यश आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढा देताना मोदींनी जनतेला पुन्हा साद घातली आहे. भ्रष्टाचाऱ्यांची आता खैर नाही. परंतु, या अभियानाची विश्वासार्हता टीकवण्यासाठी आणि हे अभियान यशस्वी करण्यासाठी अपना- पराया हा भेद टाळाणे गरजेचे आहे. लोकांचा विश्वास टीकवण्यासाठी ही अपरिहार्य बाब आहे. भ्रष्टाचारावर कुठाराघात करताना घरे आणि बाहेरचे, आपले आणि परके असा भेद चालणार नाही. हे पथ्य पाळले तर भ्रष्टाचाराच्याविरोधातील लढा या देशातील दुसरे स्वातंत्र्य युद्ध ठरेल.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा