31 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
घरसंपादकीयफडणवीस गरजले, चुकीला माफी नाही..

फडणवीस गरजले, चुकीला माफी नाही..

फडणवीसांची गर्जना फक्त फरार आरोपींपुरती मर्यादित नाही. त्यांचे लक्ष सूत्रधाराकडे आहे.

Google News Follow

Related

बीड आणि माजलगावात झालेल्या दंगलीप्रकरणी झालेल्या चर्चेला उत्तर देताना जात, धर्म, पक्ष कोणताही असो, ज्यांनी जाळपोळ केली त्यांना सोडणार नाही, अशी गर्जना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सरकारने हे प्रकरण खूप गांभीर्याने घेतले आहे, दंगलीच्या मास्टर माईंडपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही आता मागे हटणार नाही, या शब्दात त्यांनी इरादाही स्पष्ट केला. फडणवीसांचा इशारा ज्यांना कळायला हवा त्यांना व्यवस्थित कळला आहे.

नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षण आंदोलन आणि त्यानंतर बीडमध्ये उसळलेल्या दंगलीचे पडसाद उमटणे स्वाभाविक होते. गर्दी दाखवून सरकारवर गुन्हेगारांना सोडण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न अनेकजण करतायत. त्यामुळे आंदोलनाच्या आडून राज्यात अराजक माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांबाबत सरकारची भूमिका काय असेल असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. जाळपोळ करणाऱ्यांना माफी नाही, हे फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केले आहे. परंतु आज सभागृहात त्यांनी जे वक्तव्य केले, त्यानंतर कारवाईबाबत कोणतीही संदीग्धता शिल्लक राहीलेली नाही.
बीडमध्ये ज्यांचे घर जाळण्यात आले त्या संदीप क्षीरसागर यांनी आज सभागृहात आपल्या भावना व्यक्त केल्या.

जाळपोळ सुरू असताना पोलिस सात तासांनी का पोहोचले होते. पोलिसांचे हात कोणी बांधले होते? असा सवाल त्यांना उपस्थित केला. सभागृहात आणि सभागृहाबाहेर घेण्यात येणाऱ्या तमाम आक्षेपांना फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले. याप्रकरणात २७८ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यापैकी ३० जण सराईत गुन्हेगार आहेत. माजलगावात ४० जण आणि बीडमध्ये ६१ फरार आहेत.

पोलिस निष्पापांना पकडतात… असा आक्षेप काही जण घेतात, असा उल्लेख फडणवीस यांनी केला. त्यांचा टोला अर्थात मनोज जरांगे पाटील यांना होता. अटक करण्यात आलेले किती निष्पाप आहेत, हेही फडणवीसांनी तपशीलवार सांगितले.
‘ज्यांच्याविरुद्ध सबळ पुरावा आहे, ते काही कृती करताना दिसतायत, ज्यांच्या विरोधात सीसीटीव्ही फूटेज आहे अशा लोकांवर कारवाई झाली आहे. प्रकाश साळोंकेच्या घरावर हल्ला करणाऱ्यांनी सीसीटीव्ही फोडला. अशा प्रसंगी पोलिस मोबाईल लोकेशन, व्हॉट्सअप मेसेज, टेक्स मेसेज या पुराव्यांच्या आधारे कारवाई करीत आहेत’, असे फडणवीस म्हणाले.

‘आम्ही दंगलींच्या मास्टर माईंडपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. एकदा का फरार आरोपी हाती आले की दंगल नियोजित होती का त्याचे मास्टर माईंड कोण होते, याचाही उलगडा होईल’, असे फडणवीस म्हणाले. कारण स्पष्ट आहे.
सराईत गुन्हेगार याचा अर्थ मुरलेले गुन्हेगार, ज्यांचा आधी रेकॉर्ड आहे, ज्यांच्या नावावर काही गुन्हे आहेत. असे अनेक सराईत बीड दंगलीचे नेतृत्व करत होते. आंदोलनाच्या आडून अराजकतेचा अजेंडा चालवत होते. जाळपोळ करून हे गुन्हेगार आता गायब झाले आहेत. कदाचित त्यांच्या राजकीय गॉडफादरच्या पदराखाली लपले आहेत. त्यांना खणून काढण्याचा इरादा फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

बीडमध्ये जे काही घडले ते अचानक घडलेले नाही. हे शिजवलेले कारस्थान आहे. हे ज्यांनी घडवले त्याचे धोगेदोरे बहुधा पोलिसांच्या हाती असावेत. त्यामुळे कोणालाही सोडणार नाही, ही फडणवीसांची गर्जना फक्त फरार आरोपींपुरती मर्यादीत नाही. त्यांचे लक्ष आता सूत्रधाराकडे आहे. कदाचित तो कोण आहे, हे एव्हाना त्यांचा लक्षात आलेले आहे. मागे हटणार नाही, ही फडणवीसांची घोषणा आहे. आमदारांच्या घराची जाळपोळ करण्याचे कारस्थान रचणारा माणूस हा काही छोटामोठा माणूस नसणार हे उघडच आहे.

हे ही वाचा:

मालदीवला चीनची लागण लागली!

अबब! स्विगीकडून त्याने वर्षभरात मागवले ४२ लाखांचे पदार्थ!

४७ वर्षांचा अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका

संसद घुसखोरी प्रकरणातील मास्टरमाईंड ललित झा शरण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटाने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पोलिसांनी दंगलखोरांवर गोळीबार का केला नाही, असा सवाल केला. ही पवार गटाच्या नेत्यांची खासियत आहे. पोलिसांनी जमावाला नियंत्रणात ठेवण्यासाठी जर गोळीबार केला असता आणि त्यात जर काही जणांचा बळी गेला असता, तर निशस्त्र जमावावर गोळीबार का केला, असा सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केला असता. जखमी आणि बळी गेलेल्या दंगेखोरांच्या नावाने गळा काढला असता. अंतरावलीमध्ये पोलिसांवर आणि सर्वसामान्य जनतेवर दगडफेक करणाऱ्या गुंडांवर जेव्हा पोलिसांनी लाठीमार केला, तेव्हा शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जालियनवाला बाग हत्याकांड आठवले. जर गोळीबार झाला असता तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी कोणती प्रतिक्रिया दिली असती याची कल्पना करा. दंगेखोरांना हुतात्मा ठरवायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नसते.

फडणवीसांनी हेच सांगितले. पोलिसांच्या बाबत लोक दोन्ही बाजूनी बोलतात. अंतरावलीत केलेल्या कारवाईबाबत अनेक नेत्यांनी पोलिसांना दोष दिला असे त्यांनी सांगितले. अर्थात त्यांनी याप्रकरणात कोणाचेही नाव घेतले नाही. परंतु त्यांचा रोख कोणाच्या दिशेने आहे, हे सगळ्यांच्या व्यवस्थित लक्षात आले. जयंत पाटील यांनी आरोपींच्या जमावातला पप्पू शिंदे कोण, असा सवाल सरकारला केला. हा आरोपी कुणा सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या जवळचा असल्याचे त्यांना सूचवायचे होते. फडणवीसांनी याबाबत उत्तर द्यावे अशी मागणी त्यांनी केली.

खरंतर त्यांनी असा सवाल न केलेला बरा होता. कारण बीडमध्ये अटक कऱण्यात आलेला ऋषीकेश बेदरे हा शरद पवार गटाचा पदाधिकारी असल्याचा खुलासा त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे बऱ्यापैकी झाला होता. अशी ढीगभर उदाहरणं आहेत. जी माहीत सर्वसामान्य जनतेला ठाऊक आहे, ती राज्याच्या गृहमंत्र्याकडे नसेल असे जयंतरावांना का वाटले असेल? फडणवीसांनी त्यांना अगदी सडेतोड उत्तर दिले. कोणीही कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला सोडणार नाही.
जयंत पाटलांनी एका नावाचा उल्लेख केला, फडणवीसांनी अशी चार नावे त्यांना ऐकवली. हा राजकारणाचा विषय नाही, हेही त्यांना ऐकवले. सरकार जाळपोळ करणाऱ्यांसमोर झुकणार नाही, हे फडणवीसांनी ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे भावनेच्या अतिरेकामुळे घडले असे कारण देऊन काही करायला पुढे कोणी धजावणार नाही. सर्वसामान्य जनतेला त्यामुळे दिलासा मिळणार आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा