30 C
Mumbai
Wednesday, May 29, 2024
घरसंपादकीयराज ठाकरेंनी भूमिका बदलली की, मूळ भूमिकेकडे परतले?

राज ठाकरेंनी भूमिका बदलली की, मूळ भूमिकेकडे परतले?

राज ठाकरे यांच्या पक्षाने आता शिवराजमुद्रा अंकीत असलेला भगवा ध्वज स्वीकारला आहे

Google News Follow

Related

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या सभेत लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. लाव रे तो व्हीडियो मोहीमेमुळे… राज ठाकरे अनेकांच्या आँखो का तारा बनले होते. अशा सगळ्यांना ते डोळ्यात कुसळ गेल्यागत खुपायला लागले. राजसाहेब अचानक राजू पेंटर बनले. राज ठाकरेंनी हे का केले? कदाचित त्यांना शरद पवारांसारखा भावी पंतप्रधान बनण्यात रस नसावा. कदाचित एक कॉमेडीअन पंतप्रधान होऊ नये असे त्यांना वाटत असेल.

 

राजकीय भूमिका बदलू शकतात. बदललेली भूमिका चुकीची आहे, याची उपरतीही होऊ शकते. अशी उपरती झाल्यानंतर एखादा मूळ भूमिकेकडे परतत असेल तर हरकत काय? हरकत घेणारे बहुतेक मोदीविरोधी टोळक्यातील लोक आहेत. देशात कोणीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बोलायला लागला की यांना नवा बाप मिळाल्याचा आनंद होतो. ही मंडळी त्याला डोक्यावर घ्यायला तयार होतात. त्याचे पोवाडे गायला लागतात. बोलणारा राज ठाकरे यांच्यासारखा दमदार नेता असलाच पाहिजे असे काही नाही, निरंजन टकले, कन्हैया कुमार असे कोणीही कवडी-दमडीचे लोक चालतात. माणूस महत्वाचा नाही, तो मोदींच्या विरोधात आहे, हे महत्वाचे.

 

राज ठाकरे यांचा वैचारिक पिंड शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत घडलेला आहे. त्यांचे वारसदार म्हणून त्यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेणे लोकांना अपेक्षित होते. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर त्यांनी भगवा हाती घ्यावा, अशी लोकांची स्वाभाविक अपेक्षा होती. परंतु त्यांनी सुरूवातीच्या काळात मल्टीकलर झेंडा स्वीकारला. भगव्या रंगाला कोणत्याही रंगाचे वावडे नाही या इतिहासाचा त्यांना बहुधा विसर पडला असावा. एकदा का बोगस सर्वधर्मसमभाव तुमच्या मेंदूत शिरला की तुम्हाला अगणित भास व्हायला लागतात. कोकणी मुसलमान आणि परप्रांतिय मुसलमान अशा नव्या फुटपट्ट्या त्यांनी लावायला सुरूवात केली. मुळात या देशाचा नंबर एकचा गद्दार दाऊद इब्राहीम हा कोकणी आहे, याचा सोयीस्कर विसर त्यांना पडला. लाव रे तो व्हीडियो… च्या मौसमात हा वैचारिक गोंधळ टिपेला गेलेला एवढेच.

 

देशाच्या जनतेच्या मनात गोंधळ का नाही याचे कारण स्पष्ट आहे. त्यांना मोदी की राहुल गांधी यात निवड करायची आहे. हा काही मेंदूला ताण देणारा पेच नाही. देशाचे भले कोणी केले नाही, कोण करते आहे यातला फरक ठसठशीत आहे. नेत्यांच्या फूटपटट्या जनतेपेक्षा वेगळ्या असतात. त्यांच्यासाठी देशाच्या सुरक्षेपेक्षा तळघरांची सुरक्षा महत्वाची असते. त्यामुळे त्यांचा गोंधळ उडतो. सुरूवातीच्या काळात राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेमात होते. ही त्यांची मूळ भूमिका होती. लाव रे तो व्हीडियो… हा त्यानंतरचा काळ. तेव्हा ते मोदी विरोधक बनले. आज त्यांनी पुन्हा मूळ भूमिकेकडे वळण्याचे ठरवलेले आहे. हे काही एका दिवसात झालेले नाही. त्यापूर्वी त्यांनी पक्षाचा झेंडा बदलला. हिंदुत्वाची भूमिका घेतली. हे बदल झाले तेव्हा ते मोदींकडे वळणार हे निश्चित होते.

राज ठाकरे हे पठडीतले राजकारणी नाहीत. परिणामांची चिंता न करता मनातले बोलणे हा त्यांचा पिंड आहे. राज्यातील तमाम राजकीय नेते जेव्हा मनोज जरांगे यांना कुरवाळत होते तेव्हा उपोषण वगैरे करून मराठा आरक्षण मिळणार नाही, असे सांगणारे ते एकमेव होते.

राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रात जातीचे विष कालवले असा आरोप करून शरद पवारांकडे बोट दाखवण्याचे धाडस करणारेही तेच. शरद पवार कधीच छत्रपती शिवरायांचे नाव घेत नाहीत, या मुद्द्याकडे सर्वात आधी अंगुलीनिर्देश त्यांनीच केला. जातीपातीच्या राजकारणाचा शिवसेनाप्रमुखांनी कायम धिक्कार केला, त्याच भूमिकेवर आजही कायम राहणारा नेता म्हणजे राज ठाकरे. या वेगळेपणामुळेच एखादी भूमिका चूक वाटली तर मिशीचा प्रश्न करून त्यावर ठाम राहण्यापेक्षा त्यात बदल करावासा त्यांना वाटू शकतो. मूळ भूमिकेकडे वळले पाहिजे, असे त्यांना वाटू शकते. राज ठाकरे यांच्या पक्षाने आता शिवराजमुद्रा अंकीत असलेला भगवा ध्वज स्वीकारला आहे. या राजमुद्रेसमोर नतमस्तक होणारा या देशातील एकमेव नेता म्हणजे नरेंद्र मोदी. पंतप्रधान म्हणून मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा कायम जय जयकार केला. त्यांच्या पाठीशी उभे राहावे असे राज ठाकरे यांना वाटले तर ते आपल्या मूळपदावर आलेले आहेत, एवढाच त्याचा अर्थ.

देशाची परिस्थिती अशी आहे की, नरेंद्र मोदी यांच्यासारख्या भक्कम नेत्याची देशाला गरज आहे, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. जस्टीस चौधरी, वागळे आदी मंडळींचा या नव्या भूमिकेमुळे पार जळफळाट झाला आहे. भाजपाला बिनशर्त पाठिंबा देऊन राज ठाकरे यांनी कदाचित राजकीय शहाणपणा दाखवलेला आहे. एका भाषणात राज ठाकरे असे म्हणाले होते की, एक दोन जागा घेऊन आघाडी करायला मी प्रकाश आंबेडकर थोडाच आहे. त्यामुळे भाजपाकडून एखाद दुसरी जागा घेणे शब्द फिरवल्यासारखे झाले असते. त्यापेक्षा बिनशर्त पाठींबा देऊन मोठेपणा घ्यावा, असे गणित त्यांनी मांडले असावे.

हे ही वाचा:

तिकीट मिळाले नसल्याने राजीनामा दिलेल्या निशा बांगरे यांचा पुन्हा नोकरीसाठी अर्ज

गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का, रोहन गुप्ता यांचा भाजपमध्ये प्रवेश!

केमोथेरपीनंतर महिलेचे केस गळले,त्वचा खराब झाली, नंतर कळले कर्करोग झालाच नाही!

महिलेच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी देणाऱ्या रेहमानला अटक

एक-दोन खासदार निवडून आले असते तर काय दिव्य झाले असते. त्यापेक्षा विधानसभा निवडणुकीत ताकद आजमवावी असे गणित त्यांनी मांडले असावे. फक्त साडेतीन जिल्ह्यात ताकद असताना शरद पवारांनी देशाचा पंतप्रधान होण्याची इच्छा बाळगली. दोन आकडी खासदारांची संख्या हाती नसताना अशी ईच्छा बाळगणे हास्यास्पदच आहे. परंतु काही तरी जुगाड करून होऊ आपण पंतप्रधान असे त्यांना वाटत होते. इंदरकुमार गुजराल आणि हरदनहळ्ळी देवेगौडा यांच्यासारखे लोक पंतप्रधान पदावर विराजमान होत असताना आपल्यालाही मटका लागू शकतो, असे पवारांना वाटणे स्वाभाविक होते. परंतु मोदी सत्तेवर आल्यानंतरही त्यांचा स्वप्नभंग झाला नाही. पवारांची ही महत्वाकांक्षा त्यांच्या समर्थकांपर्यंत अशी काही झिरपली ती पवारांचे भावी पंतप्रधान म्हणून हसे होईपर्यंत ही चर्चा सुरू राहिली. मविआच्या औटघटकेच्या कार्यकाळात उद्धव ठाकरेंनाही अशी स्वप्न पडू लागली होती. हवा भरायला संजय राऊत होतेच. भावी पंतप्रधानपदाच्या आभासी झोपाळ्यावर महाराष्ट्रातील आणखी एका नेत्याने काही काळ का होईना मनसोक्त झोके घेतले.

राज ठाकरेंना अशा विनोदी महत्वाकांक्षा नाहीत, हे त्यांचे बलस्थान आहे. एक-दोन खासदार संसदेत पाठवून आकाशाला हात टेकायला हा काही कडबोळे सरकारचा काळ नाही, हे राज ठाकरे यांना ठाऊक आहे. देशात पुन्हा एकदा मिलीजुली सरकार आली पाहिजे असे अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी रामलीला मैदानावरील इंडी आघाडीच्या केजरीवाल समर्थन मेळाव्यात व्यक्त केला होता. मिलीजुली आघाडी अशासाठी ही कोणाही बिनकण्याचा नेता पंतप्रधान पदाचा दावेदार ठरू शकतो. सुदैवाने अशी परिस्थिती नाही. राज ठाकरेंना याचे भान आहे. त्यामुळे लोकसभेत एक दोन जागांचा खुळखुळा वाजवण्यापेक्षा विधानसभा निवडणुकीत ताकद आजमावू असा विचार त्यांनी केला असावा. ही भूमिका घेतली तर समाजवादी बांडगुळं तुटून पडणार याचीही त्यांना जाणीव असेल.

राहुल गांधी नावाच्या स्टँडअप कॉमेडीअन पेक्षा मोदी बरे असे त्यांना वाटले असण्याची शक्यता आहे. देशाला आवश्यक असलेली भूमिका घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदनच करायला हवे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
157,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा