26 C
Mumbai
Tuesday, November 1, 2022
घरसंपादकीयन आलेले प्रकल्प, देवेंद्र फडणवीस आणि वाटी पत्रकारिता

न आलेले प्रकल्प, देवेंद्र फडणवीस आणि वाटी पत्रकारिता

वेदांता पाठोपाठ, टाटा एअरबस, सॅफ्रन हे महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला... अशी ओरड सुरू आहे.

Google News Follow

Related

वेदांता प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची बोंब सर्वप्रथम ठोकली गेली तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन पत्रकारांकडे अंगुली निर्देश केला होता. हे तिघे राजकीय नेत्यांसाठी काम करतात असा उघड आरोप केला होता. गेले काही दिवस वेदांता पाठोपाठ, टाटा एअरबस, सॅफ्रन हे महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला… अशी ओरड सुरू आहे. शिंदे फडणवीस सरकारला रोज हाणले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा या वाटी पत्रकारीता करणाऱ्या गँगवर हल्लाबोल केला असून त्यांचा उल्लेख ‘हिज मास्टर्स व्हॉईस’ असा केला आहे.
एचएमव्ही ही मोठी कंपनी होती. तिच्या लोगोवर संगीताच्या तबकडीसोबत एका कुत्र्याचे चित्र होते. फडणवीसांना काय म्हणायचे आहे, ते त्यांनी न बोलता सांगितले. महाराष्ट्रातील पत्रकारीतेचा विचार केल्यास ती महाविकास आघाडी काळातील आणि महाविकास काळानंतर अशी करता येईल.

देशाच्या उद्योग जगतात खळबळ निर्माण होईल असे एक कांड महाविकास आघाडी सरकारच्या काळात घडले होते. मुकेश अंबानी यांच्या एंटालिया या इमारतीबाहेर जिलेटीनच्या कांड्या भरलेली जीप ठेवण्यात आली होती. एपीआय सचिन वाझे यात सामील असल्याचे उघड झाले. बहुधा मोठ्या खंडणीसाठी हा प्रकार झाला असावा अशी दाट शक्यता आहे. हे कांड घडल्यानंतर अग्रलेख मागे घेणारे देशातील एकमेव संपादक ज्यांच्या नावावर दुसऱ्याचे लेख उचलल्याचाही ठपका आहे, अशा संपादक महोदयांनी वाझे तुझे माझे हा अग्रलेख लिहिला होता. मुख्यमंत्री निवासस्थानावर राबता असलेल्या आणि उद्धव ठाकरे यांना रीपोर्टिंग करणाऱ्या वाझेवर लिहिताना संपूर्ण अग्रलेखात उद्धव ठाकरे यांचा साधा उल्लेखही नाही. विधीमंडळात बोलताना वाझे हा लादेन आहे? का असा सवाल विचारणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच होते. ही महाराष्ट्रातील तटस्थ पत्रकारितेची कहाणी आहे.

आजच्या पत्रकार परिषदेत वेदांता, टाटा एअरबस आणि सॅफ्रॉन या तिन्ही कंपन्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातच इतर राज्यात गेल्या होत्या हे पुराव्यानिशी स्पष्ट केले. खरे तर फडणवीस यांनी जी माहिती उघड केली ती शोधण्यासाठी अजित डोवाल यांची गरज नाही. इंटरनेटची थोडीशी समज असलेला कोणीही माणूस ही माहिती काढू शकतो. मग लक्षात येते की, गुजरात सरकारने टाटा एअरबसचे डील सप्टेंबर २०२१ मध्येच केले होते. सॅफ्रन विमानाची इंजिने बनवणारा सॅफ्रन ग्रुप महाराष्ट्रातून गेला अशी बोंब ठोकणाऱ्यांना हैदराबादमध्ये या कंपनीने उत्पादनही सुरू केले आहे, हे माहीत नसेल की माहीत असून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय? सत्ता गेल्यामुळे तडफडणारे महाविकास आघाडी सरकारचे नेते विशेषत: ठाकरे पितापुत्र शिंदे फडणवीस सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करणार हे गृहीत आहे. पण पत्रकार त्यांच्या दावणीला बांधल्यासारखे हाकाटी का पिटतायत?

वाझे, वसूली, कोविड भ्रष्टाचार, घरी बसलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे मंत्री पुत्र याबाबत गप्प असलेल्या एचएमव्ही पत्रकारांना आता कंठ फुटला आहे. अंबानींच्या घराखाली स्फोटके ठेवल्यामुळे उद्योग जगतात कोणता मेसेज जाईल, असे प्रश्न ज्यांना पडले नाहीत ते आता ठाकरेंचे नेरेटीव्ह रुजवण्यासाठी घाम गाळताना दिसतायत. अर्थात हा लाभाचा मामला आहे.

हे ही वाचा: 

वर्ल्डकपमध्ये चेतन शर्मा यांनी रचलेला इतिहास आठवतोय?

फडणवीसांच्या स्पष्टीकरणावर आदित्य ठाकरेंकडून पुरावे नाहीतच

अलीबागला जा आता अवघ्या ४० मिनिटात

पोत्यातून नाणी ओतली आणि ५० हजाराची बाईक खरेदी केली

 

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या शिवाजी पार्कमध्ये असलेल्या फ्लॅटचा बभ्रा होतो, दुर्दैवी आहेत बिच्चारे, कारण दादरच्या पॉश इमारतीत दोन दोन फ्लॅट घेण्याची क्षमता असलेले महारथी पत्रकार मुंबईत आहेत, त्यांच्याबद्दल चर्चा होत नाही.
हीज मार्स्टर्स व्हॉईसबद्दल देवेंद्र फडणवीस जे बोलतायत ते कोण याचा उलगडा त्यांनी केला असता तर बरं झालं असतं.
मुळात ज्या कंपन्या आल्याच नव्हत्या, त्या गेल्यामुळे महाराष्ट्राचे किती नुकसान झाले, किती रोजगार बुडाले याची चर्चा माध्यमांतील एचएमव्ही घडवतायत. सोयीनुसार मथळे कसे बदलतात याची झलक पाहायची असेल तर वेदांता, टाटा एअरबस आणि सॅफ्रनच्या मथळ्यांची रत्नागिरी रिफायनरीसोबत तुलना केली पाहीजे.

हे काही मथळे पाहा
उद्धव की चेतावनी

राजापूरात रिफायनरीविरुद्ध एल्गार

रिफायनरीवरून कोकण तापले

नाणार रिफायनरी आता हे अति झाले…

या सर्व मथळ्यांमध्ये कुठेच किती रोजगार बुडाले, किती गुंतवणुकीचा फटका बसला कसलीही चर्चा नाही. रिफायनरी प्रकल्प तीन लाख कोटींचा. महाराष्ट्राच्या जीडीपीमध्ये १० टक्क्यांची भर घालणारा. प्रकल्प उभारणीच्या काळात राज्यात दीड लाख रोजगारांची निर्मिती, प्रकल्प उभारल्यानंतर २० हजार प्रत्यक्ष रोजगार आणि सुमारे एक लाख अप्रत्यक्ष रोजगार. रिलायन्सच्या जामनगर रिफायनरीत आंब्याचे विक्रमी उत्पादन होत असताना आंबे आणि काजू उत्पादनावर परिणाम होईल अशी आवई उठवून शिवसेनेने प्रकल्पाला विरोध केला. त्यावेळी एचएमव्ही पत्रकारांनी शिवसेनेमुळे किती रोजगार गेले आणि गुंतवणुकीची किती हानी झाली याची चर्चा केली नाही.

जी भूमिका रत्नागिरी रिफायनरीबाबत घेतली तीच भूमिका जैतापूर प्रकल्पाबाबतही घेतली. जैतापूर प्रकल्प आणि रत्नागिरीतील रिफायनरी रद्द करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली होती. ठाकरे पिता – पुत्रांनीही या प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतली होती. मग आता रोजगार आणि गुंतवणुकीचा कळवळा कुठून आलाय.
इतके रामायण झाल्यानंतर एकच प्रश्न पडतो, खोट्या आणि बदनामीकारक बातम्या छापणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारचे हात कोणी बांधले आहेत. सत्ताधारी पक्षाचे अनेक नेते, याच पत्रकारांच्या गळ्यात गळे घालून वैयक्तिक संबंध वृद्धिंगत करत असतात. लोकांची दिशाभूल करणाऱ्यांवर चाप लावण्याची भूमिका सरकारनेच घ्यायला हवी.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,956चाहतेआवड दर्शवा
1,958अनुयायीअनुकरण करा
46,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा