26 C
Mumbai
Thursday, October 10, 2024
घरसंपादकीयलाडक्या बहिणींचे आशीर्वाद फळणार का?

लाडक्या बहिणींचे आशीर्वाद फळणार का?

महायुतीला सध्या आशीर्वाद आणि शुभेच्छा दोहोंची खूप गरज

Google News Follow

Related

आज नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचा सण. महायुतीने राज्यातील लाडक्या बहीणींसाठी जाहीर केलेल्या योजेनेचा लाभ आजवर सुमारे एक कोटी महिलांना मिळाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राज्यभरात दौरे करतायत. लाडक्या बहीणींचे आशीर्वाद घेतायत. महीला वर्गाचा महायुतीकडे झुकलेला कल पाहून विरोधी पक्षातील नेते बिथरलेले दिसतात. मविआतील नेत्यांची विधाने ऐकली तर याची कल्पना येऊ शकेल. सरकारची योजना आपले लेबल लावून महिलांपर्यंत पोहचवायची, श्रेय लाटायचे आणि योजनेला विरोधही करायचा अशी दुहेरी रणनीती विरोधक वापरत आहेत.

लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जुलै रोजी जाहीर झाले. निकालांचा कल स्पष्टपणे महाविकास आघाडीच्या बाजूने झुकला होता. एकगठ्ठा मुस्लीम मतांमुळे मविआला ३० जागा मिळाल्या तर महायुतीच्या वाट्याला १७ जागा आल्या. एका जागेवर काँग्रेस समर्थक अपक्ष विजयी झाला. जय-पराजयातील फरक मोठा असला तरी मतांच्या टक्क्यातील फरक फक्त ०.३ टक्क्यांचा होता. पद्धतशीर प्रयत्न केले तर हे अंतर कापणे कठीण नव्हते.

महिला मतदार हा निर्णायक ठरू शकतो याचा प्रत्यय यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये आलेला आहे. विजयासाठी महिलांना प्रसन्न करणे भाग आहे, हे लक्षात घेऊन महायुतीने प्रयत्न सुरू केले. ७ ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली. लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेची अंमलबजावणी इतकी झपाट्याने झाली की अवघ्या दहा दिवसात लाखो महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले. १७ ऑगस्टला ८० लाख महिलांच्या खात्यात पैसे आले. रक्षाबंधन म्हणजे १९ ऑगस्टपर्यंत हा आकडा एक कोटीवर गेला. किती मोठी यंत्रणा कामाला लावण्यात आली असेल कल्पना करा. यात आणखी एक कोटी महिलांची भर पडेल असा अंदाज महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

म्हणजे या योजनेच्या माध्यमातून साधारणपणे २ कोटी महिलांना आर्थिक लाभ मिळवून देण्याची योजना आहे. ज्या वेगाने ही योजना महिलांपर्यंत पोहोचवण्यात आली तो वेग सरकार नावाच्या यंत्रणेची ताकद दाखवणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पक प्रयासामुळे या देशात आजमितीला ५२ कोटी जनधन खाती उघडण्यात आलेली आहे. त्यामुळे हा पैसा थेट महिलांच्या खात्यात पोहोचवण्यात कोणताही अडथळा नाही. राज्य सरकारने ३५ हजार कोटींची तरतूद केल्यामुळे पैशाचीही कमी नाही.

महिना दीड हजार ही फार मोठी रक्कम नाही. परंतु एवढ्या पैशात घरात महिन्याभराचे तांदूळ, डाळ, गव्हाचे पिठ, तेल, मीठ येऊ शकते, किंवा महिन्याचे वीज बिल फेडता येऊ शकते, किंवा एका मुलाच्या शाळेचा खर्च काही प्रमाणात भागवता येऊ शकतो. विरोधकांना मळमळ होण्याचे कारण हेच आहे. उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून सुप्रिया सुळे, रोहित पवार, संजय राऊत सगळ्यांनीच योजनेच्या विरोधात टकळी चालवली. महिलांना दीड हजार देऊन विकत घेण्याचा प्रयत्न आहे. अशा शेलक्या भाषेत टीका करण्यात आली.

मुळात या योजनेचा गोरगरीब महिलांना फायदा होईल आणि त्या महायुतीच्या बाजूने झुकतील ही भीती. योजेनचा विरोध करणाऱ्या अनेकांनी अर्जावर स्वत:चे फोटो छापले. योजेनेचे कटआऊट लावून त्यात स्वत: चा फोटो झळकवला. जणू ही योजना त्यांच्याच कृपेमुळे सुरू आहे. म्हणजे एका बाजूला योजनेला विरोध करायचा आणि दुसऱ्या बाजूला श्रेय लाटण्याचाही प्रयत्न करायचा असा हा प्रकार आहे. याच्या पुढे एक पाऊल टाकत आम्ही सत्तेवर आलो तर तीन हजार देऊ अशी घोषणा मविआच्या नेत्यांनी केली. काँग्रेस नेते कितीही घोषणा करीत असले तरी उत्तर प्रदेशातील खटाखट अनुभवानंतर लोक त्यांच्यावर फारसा विश्वास ठेवायला तयार नाहीत.

विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये होतील अशी शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत मविआ आणि महायुतीमध्ये जो ०.३ टक्क्यांचे जे अंतर आहे ते कापणे या योजनेमुळे सहज शक्य होईल. टाईम्स मॅट्रीक्सचा जो ताजा सर्वे जाहीर झालेला आहे. त्यात महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुती चार पावले पुढे आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या निवडणुकीत भाजपाचा आकडा शंभर पार होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. लोकसभा निवडणुकीत सर्व एक्झिट पोल आणि ओपिनिअन पोल तोंडावर आपटल्यानंतर खरे तर या ताज्या पोलवर विश्वास ठेवता येत नाही. परंतु लोकसभा निवडणुकीनंतर जे आकडे समोर आले त्यावर विसंबून काही ठोकताळे मांडणे शक्य आहे.

हे ही वाचा:

बाळासाहेबांची इच्छा नव्हती, परंतु उद्धव ठाकरेंमुळेच राज ठाकरेंनी शिवसेना सोडली !

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवरील विश्वास उडाला !

ममता बॅनर्जींना शिवीगाळ करणाऱ्यांची ‘बोटे तोडा’

तृणमूल काँग्रेसच्या खासदार रचना बॅनर्जीचा माफीनामा

लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपामध्ये जी मरगळ आली ती आता बरीचशी कमी झालेली आहे. रा.स्व.संघाची यात मोठी भूमिका आहे. बांगलादेशमध्ये सत्तांतर झाल्यानंतर तिथे निर्माण झालेले अराजक आणि हिंदूंवर होणारे अनन्वित अत्याचार याचा परिणामही मतदारांवर निश्चितपणे होणार. मुस्लीम कट्टरतावादाचा विचार केला तर बांगलादेश जात्यात आणि आपण सुपात आहोत, याची जाणीव हिंदूंना आता होते आहे. महाराष्ट्रात मुस्लिमांची तळी उचलणाऱ्या पक्षांपासून मतदार अंतर ठेवतील अशी शक्यता आहे. त्यात लाडकी बहीण योजनेमुळे महिला मतदार जर महायुतीच्या बाजूने वळला तर पूर्ण खेळ पालटेल.

दोन कोटी महीलांना लाभ मिळाला तर त्या सगळ्या दोन कोटी महिला भाजपाला किंवा महायुतीला मतदान करतील अशी शक्यता नाही. तटस्थ महिला मतदारांवर मात्र याचा परिणाम होऊ शकतो. भावाने ओवाळणी घातल्यावर बहीण भावापेक्षा लहान असली तर शुभेच्छा देते, मोठी असेल तर आशीर्वाद देते. महायुतीला सध्या आशीर्वाद आणि शुभेच्छा दोहोंची खूप गरज आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
181,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा