जागतिक महासत्ता म्हणनू मिरवलेल्या अमेरिकेची स्थिती आता प्रचंड बिकट झालेली दिसते. एखादा शेजारी जो रात्री दात ओठ खावून भांडतो आणि दुसऱ्या दिवशी वाटगा घेऊन साखर मागायला दारात येतो तशी स्थिती डोनाल्ड ट्रम्प यांची झालेली आहे. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी चीनच्या विरोधात वरवंटा चालवायला सुरूवात केली. टेरीफ अस्त्र उगारले. पुढे तेच अस्त्र सगळ्या जगावर चालवले. चीनला आधी धमकी देणाऱ्या ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वी आधी चीनसमोर नाक रगडले. नंतर वाडगा पुढे केला. ट्रम्प यांचे विश्वासू, एफबीआयचे डायरेक्टर काश उर्फ कश्यप पटेल यांच्यावरही भारताला विनंती करण्याची वेळ आली. त्याचे कारणही चीनच होता. थोडक्यात काय ट्रम्प हे गब्बर सिंग व्हायला गेले होते, त्यांचा सुरमा भोपाली झालेला आहे.
अमेरिकेच्या अर्थकारणाला ग्रहण लागले आहे. विकासाची गती खुंटली आहे. कर्जाचा बोजा प्रचंड वाढतो आहे. अमेरिकेच्या बॉण्ड मार्केटचा डोलारा कधीही कोसळू शकतो अशी शक्यता लॅरी मॅक्डानाल्ड यांच्यासारखे अर्थ तज्ज्ञ व्यक्त करतायत. महासत्ता अमेरिकेची गादी ताब्यात घेण्याची तयारी चीनने सुरू केलेली आहे. अमेरिकेला हे कधीच नको होते. सत्तेची सूत्र हाती आल्यानंतर चीनला रोखण्यासाठी ट्रम्प यांनी पावले टाकायला सुरूवात. टेरीफ अस्त्रामुळे चीन झुकला नाही. तेव्हा सेमी कंडक्टर चीप, चीप निर्मितीसाठी आवश्यक उपकरणे, एवढेच काय अमेरिकेचे तंत्रज्ञान वापरून निर्माण केलेल्या चीपची परदेशातूनही चीनला निर्यात होणार नाही, असा प्रयत्न सुरू झाला. चीनची नाकाबंदी करण्यात काही काळ अमेरिकेला यश आले.
आर्टीफिशिअल इंटेलिजन्स, सुपर कंम्प्युटर, सेमी कंडक्टर आणि सेमी कंडक्टरची निर्मिती करणाऱ्या उपरकरणांचे उत्पादन रोखण्यासाठी अमेरिकेने हे पाऊल उचलले होते. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात चीनची प्रगती रोखली तर चीनची महासत्ता बनण्याकडे सुरू असलेली वाटचाल रोखता येईल असा हिशोब यामागे होता. कोनाड्यात अडकलेल्या मांजलासारखी चीनची अवस्था झाली. त्यानंतर चीननेही आपली चाल खेळली. ही चाल इतकी अचूक होती की अमेरीकेची चीनपेक्षा जास्त कोंडी झाली.
सेमी कंडक्टर चीप रोखल्यानंतरही चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ट्रम्प यांना लोटांगण घातले नव्हते. परंतु त्यांनी ट्रम्प यांच्यावर मात्र ती वेळ आणली. ट्रम्प यांना चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना आधी लोणी लावावे लागले. नंतर फोन करून विनंती करावी लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिवसरात्र लाखोली वाहणारे एक नेते महाराष्ट्रात आहेत. ते, त्यांच्या पक्षाचे नेते, त्यांचे मुखपत्र सतत मोदींवर विखारी टीका करत असतात. परंतु या महाशयांना मुख्यमंत्री पद टीकवण्यासाठी विधान परीषदेत शिरकाव करणे भाग होते तेव्हा मात्र यांनी मोदींना विनवण्या केल्या. मिशांना पिळ देत आकांड तांडव करणारे अनेकदा हळूच हात जोडून अशी तडजोड करत असतात. लोकांचे लक्ष नाही, असा त्यांचा गैरसमज असतो.
हे ही वाचा:
ठाणे मनपा ऍथलेटिक्स प्रशिक्षण योजनेच्या खेळाडूंनी सोने लुटले
राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील आरोपीची बहिण काय म्हणाली ?
माझ्या बकऱ्याला का मारले? पाकिस्तानच्या लहानग्याला अश्रु अनावर
रडार यंत्रणा, क्षेपणास्त्र, इकेल्ट्रीक कार, पवन चक्की, अणुभट्ट्या, विमानाचे इंजिन, एमआरआय अशा अनेक महत्वाच्या मशीनचा अविभाज्य घटक असलेल्या रेअर अर्थ मिनरलच्या निर्यातीवर चीनने बंदी घातली. टर्बियम, डायस्प्रोसिअम, गॅडोलिनिअम, निओडीमिअम, प्रेसोडीमिअम, लॅन्थॅनम या रेअर अर्थ मिनरलची निर्मिती आणि प्रक्रीया चीनमध्ये होते. जगातील ७० टक्के रेअर अर्थ मिनरलची निर्मिती आणि ९० टक्के प्रक्रीया चीनमध्ये होते. भारतासह जगातील अन्य देशांमध्ये हे रेअर अर्थ आढळत असले तरी त्यावर प्रक्रीया करणे अत्यंत वेळखाऊ आणि गुंतागुंतीचे काम असते. जग या मिनरलबाबत चीनवर प्रचंड अवलंबून आहे. अमेरिकाही त्याला अपवाद नाही. शस्त्रास्त्रांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची अमेरिकेत मोठी लॉबी. अमेरीकेच्या अर्थकारणावर त्यांचा पगडा आहे. चीनने निर्यातीवर निर्बंध लावल्यानंतर अमेरिकी डीफेन्स इंडस्ट्रीची तडफड व्हायला लागली. त्यांनी ट्रम्प यांच्यावर दबाव आणला. परीणामी ट्रम्प यांना नाक मुठीत धरून शी जिनपिंग यांना फोन करावा लागला. रेअर अर्थ मिनरल्सच्या निर्यातीवर लावलेले निर्बंध शिथील करण्याची विनंती ट्रम्प यांनी केली. या फोन कॉलनंतर दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी सुरू झाल्या. गेले दोन दिवस लंडनमध्ये दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांची चर्चा सुरू आहे.
ट्रम्प यांनी जिनपिंग यांना फोन करणे ही सामान्य बाब नाही हे लक्षात घ्या. जगाचे आपल्या शिवाय अडते, आपला जन्म जगाच्या समस्या सोडवण्यासाठी झालेला आहे, असा गैरसमज झाल्यामुळे जगातील देश तयार असो वा नसो नवनवे बिझनेस डील देण्याचे धंदे ट्रम्प करत होते. चीन सुद्धा याला अपवाद नव्हता. चीन हा उघड उघड अमेरिकेचा शत्रू आहे. अमेरिकेला रक्तबंबाळ करण्याची चीनची नीती लपलेली नाही. त्या चीनसमोर ट्रम्प यांना शरणागती पत्करावी लागली.
ट्रम्प यांचा फोन कॉल होण्यापूर्वी चीन अमेरिकेला उद्ध्वस्त करण्याचे कसे प्रयत्न करतो आहे ही बाब, एफबीआयचे डायरेक्टर काश पटेल यांनी एका पॉडकास्टमध्ये उघड केली होती. काश पटेल यांनी जो रोगन या प्रसिद्ध पॉडकास्टमध्ये खळबळजनक दावा केला होता की, अमेरिकेला उद्ध्वस्त कऱण्यासाठी चीनी कम्युनिस्ट पार्टी फेन्टानील या ड्रग्जचा वापर करते आहे. या ड्रग्जच्या अतिसेवनामुळे २०२४ मध्ये अमेरिकेत ८०३९१ जणांचा मृत्यू झाला. महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेची ही परीस्थिती आहे. अमेरिका या विरुदध एकाकी लढू शकत नाही, म्हणून काश पटेल यांनी भारताला मदतीची विनंती केली.
अमेरिकी सुरक्षा यंत्रणांना फेन्टानीलच्या विरोधात जोरदार मोर्चे बांधणी केल्यामुळे चीनकडून थेट हे ड्रग अमेरिकेत येत नाही. चीनकडून यासाठी मेक्सिकन ड्रग्ज माफीयांचा वापर केला जातो. फेन्टानील तयार करण्यासाठी भारतासारख्या देशातून कच्चा माल मेक्सिकोमध्ये जातो. तिथे निर्मिती होते. तयार मालाची अमेरिकेत तस्करी केली जाते. भारताकडून येणाऱ्या या कच्च्या मालाची निर्यात बंद व्हावी म्हणून काश पटेल भारतीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. भारताकडून याबाबत आपण मदतीची याचना केली आहे, असे त्यांनी जो रोगन शोमध्ये अगदी स्पष्टच सांगितले. चीनने अमेरिकेला बर्बाद करण्यासाठी हे ड्रग्ज युद्ध छेडले आहे. अफगाणिस्तान युद्धाच्या काळात अमली पदार्थांचा वापर अमेरिकेने रशियन फौजांच्या विरोधात केला होता. हे अस्त्र परीणामकारक ठरले. रशियन सैनिक ड्रग्जच्या पार आहारी गेल्यामुळे शारीरीक आणि मानसिक दृष्ट्या पूर्णपणे पोखरले गेले. चीन अमेरिकेच्या विरोधात आज तीच रणनीती वापरतो आहे. दोन्ही देशांचे संबंध असे विळ्या भोपळ्याचे असताना जगाचे अनभिषिक्त सम्राट असल्यासारखा माज दाखवणाऱ्या ट्रम्प यांना जिनपिंग यांच्यासमोर झुकावे लागले. त्यांनी जिनपिंग यांना फोन करणे हे दुसरे तिसरे काही नसून सपशेल शरणागती आहे. नाक रगडल्यावर जिनपिंग यांनी ट्रम्प यांना चीन भेटीचे निमंत्रण दिले, त्यानंतर ट्रम्प यांनीही जिनपिंग यांना अमेरिकेत येण्याचे निमंत्रण दिले आहे.
हा फोन कॉल केल्यानंतर ट्रम्प यांनी त्यांच्या खास शैलीत हा कसा अमेरिकेचा विजय आहे, हे भासवण्याचा प्रय़त्न केला. जिनपिंग यांनी रेअर अर्थ मिनरल आणि मॅग्नेटचा पुरवठा पुर्ववत करण्याचे आश्वासन दिले असल्याचे त्यांनी मीडियाला सांगितले. उद्य असाच एखादा फोन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना येणार हे धरून चला. ट्रम्प यांची कढी दिवसेंदिवस पातळ होत चालली आहे. अस्तित्व टीकवण्यासाठी त्यांच्या झुकण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.
जिनपिंग यांना फोन करण्यापूर्वी ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक दिवस आधी म्हणजे ५ जून रोजी, व्हेरी टफ, एक्सट्रीमली हार्ड टू मेक डील विथ… अशी पोस्ट करून जिनपिंग यांची प्रशंसाही केली होती. जिनपिंग यांनी आपल्याला फोन करावा अशी खरे तर ट्रम्प यांची इच्छा होती. त्यांनी २२ एप्रिल रोजी, म्हणजे ज्या दिवशी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला त्या दिवशी टाईम मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत जिनपिंग यांनी आपल्याला फोन केला होता, अशी माहिती उघड केली. प्रत्यक्षात ही थाप होती. चीनच्या अधिकृत सरकारी मीडियाने तसा खुलासाही केला.
६ जून रोजी ट्रम्प यांनी जिनपिंग यांना फोन केल्यानंतर चीनने आणखी एक बदमाशी केली. तैवानच्या संदर्भात चीनच्या वन चायना धोरणाला ट्रम्प यांनी पाठिंबा दिल्याची बोंब चीनने ठोकली आहे. जो बायडन यांच्या कार्यकाळात अमेरिकी हाऊस ऑफ रिप्रझेंटेडीव्हच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनी तैवानमध्ये भेट दिली होती. एक प्रकारे अमेरिकेने चीनच्या वन चायना धोरणाचे तीन तेरा करून टाकले. आता चीनी मीडिया उघडपणे सांगतो आहे, ट्रम्प यांनी चीनच्या तैवान धोरणाला पाठींबा दिलेला आहे आणि अमेरिकेला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो आहे. महासत्तेची मस्ती जिरते आहे.
