गुगलची मालकी असलेली ‘अल्फाबेट’ ही अमेरिकेतील खूप मोठी टेक कंपनी आहे. भारतात गुगल माहीत नसलेला माणूस सापडणे कठीण. ऐकून आश्चर्य वाटेल, ही कंपनी पेस्ट कंट्रोल उद्योगाच्या क्षेत्रात येण्यासाठी प्रचंड खर्च करत आहे. अलीकडेच गुगलने अमेरिकेतील कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडा या राज्यांमध्ये डेंग्यू, मलेरियाच्या डासांचा सफाया करण्यासाठी अमेरिकी सरकारला एक ऑफर दिली आहे. ही ऑफर आहे ‘डीबगिंग’ची. म्हणजे निसर्गात निर्बीज नर डास सोडायचे, ज्यामुळे आजार पसरवणाऱ्या डासांची संख्या कमी होईल आणि परिणामी डेंग्यू, चिकनगुनिया, झिका, मलेरियाचा फैलाव कमी होईल.
गुगलची मालकी असलेल्या ‘अल्फाबेट’ या कंपनीचे बाजारमूल्य ४.६० ट्रिलियन डॉलर एवढे आहे. या कंपनीचे लक्ष आता सुमारे २९ अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या पेस्ट कंट्रोल उद्योगावर आहे. २०३५ पर्यंत ही उलाढाल ५१ अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. रसायनांची फवारणी बाजूला ठेवून तंत्रज्ञानाद्वारे कीटकांवर नियंत्रण आणण्याचा प्रयोग गुगलने सुरू केला आहे. याची सुरुवात डास नियंत्रणापासून होणार आहे. अमेरिकेला निसर्गात हस्तक्षेप करण्याची प्रचंड खुमखुमी आहे. निसर्गाचा बाजार उठवल्याशिवाय हे लोक थांबण्याची शक्यता नाही.
डास हा जगातील प्रत्येक देशाला छळणारा उपद्रवी कीटक आहे. डासाच्या चाव्यामुळे होणारे आजार दरवर्षी लाखो रुग्णांच्या मृत्यूला कारणीभूत ठरतात. फ्लोरिडा आणि कॅलिफोर्निया या राज्यांमध्ये ३.२ कोटी डास सोडण्याची परवानगी गुगलने अमेरिकी सरकारकडे मागितली आहे. ‘द गार्डियन’ या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. ही सेवा विनामूल्य (निःशुल्क) असेल. इराण युद्धात अमेरिकी सरकार इतके गुंतले आहे की, डासांबाबत विचार करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना वेळ कसा असेल? त्यामुळे गुगलला ही परवानगी मिळेल की नाही, याबाबत साशंकता आहे. तरीही एक सवाल शिल्लक राहतोच.
गुगलला ही खुमखुमी का झाली? एआयवरून गुगल डासांवर का घसरला? गेली १० वर्षे गुगलने डासांवरील या प्रयोगासाठी प्रचंड खर्च केला आहे. ‘व्हेरिली’ या कंपनीच्या माध्यमातून गुगलने अनेक देशांत हा प्रयोग राबवला आहे. जिथे हा प्रयोग राबवला, त्या देशांकडून एकही पैसा गुगलने घेतला नाही; कारण हे प्रयोग अद्याप व्यावसायिक टप्प्यावर आलेले नाहीत. या प्रयोगाचे निसर्गावर नेमके काय परिणाम होतात, याची बहुधा चाचपणी सुरू आहे.
कॅलिफोर्नियामध्ये या प्रयोगाची सुरुवात झाली. गुगलने २०१७ मध्ये तिथे हा प्रयोग राबवला होता. त्यावेळी गुगलने सोडलेल्या नर डासांच्या थव्यामुळे लोक प्रचंड त्रस्त झाले होते. हे डास चावत नसले, तरी सायंकाळी बागेत किंवा बाहेर फिरताना डासांचे थवे अंगावर यायचे. हे लोकांच्या दृष्टीने नवे आणि भीतीदायक होते. या डासांची भुणभुण त्रासदायक होती. हे डास प्रयोगशाळेत तयार केलेले निर्बीज डास असतात. फक्त नर डास बाहेर सोडण्यात येतात; कारण ते चावत नाहीत. ते फुलांचा रस पितात, परागीभवन करतात. या डासांसोबत मादीचा समागम झाल्यानंतर अंड्यांची पैदास होत नाही. त्यामुळे डासांची संख्या कमी होते आणि रोगाचा फैलावही कमी होतो. तसे झालेही.
सध्याचा जमाना हा ‘एआय’चा जमाना आहे. आतापर्यंत अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी आता शक्य झाल्या आहेत. ज्या आधीच शक्य होत्या, त्यांची व्याप्ती वाढली आहे. असे एकही क्षेत्र शिल्लक नाही, जिथे ‘एआय’चा वापर होत नसावा.
गुगलचा हा प्रयोग म्हणजे रोबोटिक्स, ऑटोमेशन आणि अचूक अभियांत्रिकीचा उत्तम नमुना आहे. कोट्यवधी डास प्रयोगशाळेत जन्माला घालणे तंत्रज्ञानाशिवाय शक्यच नाही. मानवी हातांना असलेली मर्यादा यंत्रांना नसते. अंडी, अळी, कोष आणि डास हे डासाचे जीवनचक्र. यातील प्रत्येक टप्प्यावर गुगलने तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. तंत्रज्ञान किती सूक्ष्म पातळीवर वापरता येते, याची ही एक झलक आहे. डासांचे लिंग उलगडणारे कॅमेरे आज वापरले जात आहेत. अळ्यांची जलद वाढ व्हावी म्हणून रोबोटिक सेन्सर्सद्वारे प्रयोगशाळेतील तापमान, पाण्याचे प्रमाण आणि हवेतील आर्द्रता नियंत्रित केली जाते. अळ्यांना वेळेवर अन्न देण्यासाठी फीडिंग मशीन असते. डासांचे लिंग ओळखून नर आणि मादी डासांना वेगळे करणे हे काम एआयद्वारे केले जाते; कारण फक्त नर डासांना बाहेर सोडायचे असते. मादी डासांना सोडले तर कहर होईल; कारण फक्त मादी डास रक्त शोषतात. कोशात असताना उच्च क्षमतेच्या कॅमेऱ्यांचा वापर करून नर आणि मादी डास ओळखले जातात व त्यांना वेगळे केले जाते.
नर डासांमध्ये रोबोटिक नीडल्स आणि ऑटोमेटेड लिक्विड हँडलिंग सिस्टमद्वारे ‘वोलबाचिया’ हा जिवाणू सोडला जातो. हा जिवाणू ज्या नर डासाच्या शरीरात असतो, त्याच्याशी समागम केलेली मादी अंडी घालू शकत नाही. अब्जावधी डास तयार झाल्यानंतर रोबोटिक आर्म्सद्वारे त्यांना कंटेनरमध्ये भरले जाते. प्रत्येक कंटेनरवर बारकोड आणि डिजिटल ट्रॅकर असतो. त्यामुळे प्रत्येक डासाच्या बॅचचा डेटा गुगलला मिळतो.
हे ही वाचा:
सीबीएसई घोटाळा प्रकरणी अध्यक्ष आणि सचिवाला हटवले
आरे जंगलात उभारलेल्या बेकायदा दर्ग्यावर पडला हातोडा
व्हिएतनामला जाणाऱ्या प्रवाशांसाठी नवे नियम
RBI च्या तिजोरीत सोन्याची मोठी चमक
२०१६ पासून सुरू झालेल्या या प्रकल्पात एआय मॉडेल्स, हायस्पीड कॅमेरे, रोबोटिक आर्म्स, प्रयोगशाळा इत्यादींसाठी गुगलने १०० ते १५० दशलक्ष डॉलर खर्च केले असावेत, अशी शक्यता आहे. गुगलने जे ३ कोटी २० लाख डास कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडामध्ये सोडण्यासाठी तयार केले आहेत, त्यासाठीही सुमारे ४० कोटी रुपये खर्च केलेले आहेत. गुगल ही काही चॅरिटेबल ट्रस्ट नाही. मग डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचे निर्मूलन करण्यासाठी गुगल हा खर्च का करत आहे, असा प्रश्न एखाद्याला पडू शकतो. त्याचे उत्तर अत्यंत सोपे आहे. डास मारण्यासाठी आपण सध्या जी रसायने वापरतो, त्याचा डासांवर परिणाम होईनासा झाला आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, झिका या रोगांमुळे दरवर्षी लाखो लोक दगावतात. जर गुगलचा प्रयोग यशस्वी झाला, तर पेस्ट कंट्रोलची अब्जावधीची नवी बाजारपेठ गुगलच्या ताब्यात येऊ शकेल. परंतु, हा थेट निसर्गात केलेला हस्तक्षेप आहे. अनेकदा असे प्रयोग मानवजातीला महाग पडलेले आहेत. तंत्रज्ञानामुळे एक समस्या कमी होते आणि अन्य चार समस्या निर्माण होतात.
डास हा उपद्रवी असला, तरी अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. डासांच्या अळ्या या पाण्यातील अनेक जीवांसाठी, उदा. मासे, बेडूक यांचे मुख्य अन्न असतात. हवेत उडणारे डास हे अनेक पक्ष्यांचे आणि कोळ्यांचे भक्ष्य असतात. त्यामुळे डासांची एखादी प्रजाती कमी झाली किंवा नष्ट झाली, तर त्याचा परिणाम पूर्ण इकोसिस्टिमवर (परिसंस्थेवर) होऊ शकतो.
गुगल सध्या ‘एडिस इजिप्ती’ या डेंग्यू पसरवणाऱ्या डासांना लक्ष्य करत आहे. हे डास जिथे नष्ट होतात, तिथे मलेरिया पसरवणारे ‘ॲनोफेलीस’ जातीचे डास किंवा अन्य घातक कीटक वाढू लागतात. नर डासांची फुलांच्या परागीभवनात महत्त्वाची भूमिका असते. नर डासांची संख्या घटली, तर वनस्पतींवर त्याचा परिणाम होऊ शकतो. चुकून जर वोलबाचिया जिवाणू टोचलेले मादी डास बाहेर पडले आणि ते माणसांना चावले, तर त्याचे परिणाम कदाचित वाईट होऊ शकतील. काही वर्षांनी डासांनी वोलबाचिया या जिवाणूविरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती निर्माण केली, तर डासांची ही प्रजाती अधिक चिवट आणि घातक होऊ शकते.
हा प्रयोग यापूर्वी सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, ब्राझील, कोलंबिया, व्हिएतनाम, फिजी, वानुआतु या देशांमध्ये झालेला आहे. तिथे डेंग्यू आणि झिकाचे प्रमाण ९५ टक्क्यांपर्यंत घटले आहे. इथे प्रश्न फक्त एवढाच आहे – डासांची समस्या सोडवताना गुगल किती नवीन समस्यांना जन्माला घालणार आहे? गुगलची गाडीही कदाचित याच प्रश्नावर अडकलेली आहे, त्यामुळे गुगलने अजून व्यावसायिक तत्त्वावर हा प्रयोग सुरू केलेला नाही.
(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







