34 C
Mumbai
Wednesday, May 31, 2023
घरसंपादकीयप्रतिभा पवारांच्या साक्षीने थोरल्या पवारांचा राजीनामा

प्रतिभा पवारांच्या साक्षीने थोरल्या पवारांचा राजीनामा

पवारांनी एखादी भूमिका घेतली, तर दोन-चार दिवसांनी कोलांटी मारण्याची पवारांना सवय आहे. परंतु राजीनाम्याबाबत ते तसे काही करण्याची शक्यता कमी वाटते.

Google News Follow

Related

सुमारे सहा दशकांचे सक्रीय राजकारण केल्यानंतर एखाद्याला जर आपल्या शिरावरचा जबाबदारीचा भार हलका करावासा वाटला तर त्यात कुणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. परंतु भार कमी करणारी व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार असतील तर मात्र लोकांच्या मनात किंतु परंतु निर्माण होणारच. पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे, सक्रीय राजकारणाचा नाही, तरीही त्यांच्या या घोषणेनंतर कार्यकर्त्यांमध्ये भावनिक उद्रेक झाला. या राजीनाम्याचा नेमका अर्थ काय?

यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ‘लोक माझे सांगाती’, या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाचा प्रकाशन सोहळा आज पार पडला. त्यावेळी भाषणाच्या दरम्यानच पवारांनी राजीनाम्याची घोषणा केली. त्याच्यानंतर सभागृहातील माहोलच बदलला. जयंत पाटील यांना तर रडू फुटले. छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, प्रफुल पटेल, फौजिया खान यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी पवारांना राजीनामा मागे घेण्याची गळ घातली. नवाब मलिक यांच्या दोन कन्याही या कार्यक्रमाला हजर होत्या त्यांनी उपस्थित असलेल्या तमाम कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. मंचावर उपस्थित असलेले पवारांच्या मर्जीतले पत्रकार राजीव खांडेकर आणि गिरीश कुबेर यांनी या गदारोळात पळ काढला.

अपवाद फक्त दोघांचा होता. पवारांच्या सौभाग्यवती प्रतिभा पवार आणि अजित पवार. या दोघांना या निर्णयाबाबत माहिती होती. हा निर्णय १ मे रोजी जाहीर होणार होता. परंतु वज्रमूठ सभा असल्यामुळे हा निर्णय एक दिवस नंतर जाहीर करण्यात आला. सभेवरून मीडियाचा फोकस हटू नये हा विचार यामागे असणार. सौ.पवारांचा या निर्णयाला पाठिंबा असणारच, कारण त्यांच्या चेहऱ्यावर आनंदी भाव होते. दुसरे अजित पवार. त्यांनी थोरल्या पवारांच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले. अजित पवार आज अनेकांना झापताना दिसले. बाकीचे सोडून द्या पण, सुप्रिया सुळेही यातून सुटल्या नाहीत. पवारांच्या राजीनाम्यावर बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुप्रिया यांना दादांनी पवारांच्या समोर गप्प केले.

राजीनामा किंवा नियुक्तीचे निर्णय खरे तर पक्षाच्या अंतर्गत बैठकांमध्ये होतात. पवारांनी यासाठी आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्याची निवड का केली? मीडियाचे कॅमेरे समोर असताना हा निर्णय जाहीर का केला? आपल्या घोषणेनंतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची काय प्रतिक्रिया येऊ शकेल याचा अंदाज पवारांना अंदाज नव्हता, असे निश्चितपणे म्हणता येणार नाही. तरीही पवारांनी राजीनाम्याची घोषणा याच ठिकाणी केली.   हा निर्णय घेण्यामागे पवारांची काय भूमिका असू शकेल याबाबत अनेक तर्क केले जातायत. गेली अनेक वर्षे पवार एका गंभीर आजाराचा मुकाबला करतायत. वयही त्यांच्या बाजूने नाही. परंतु पवारांची उमेद किंचितही कमी झालेली दिसत नाही. इतका दुर्धर आजार असताना आजारपणाचे कारण देऊन पवार कधी घरी बसले नाहीत. थकून थांबणारे पवार नाहीत. किंबहुना प्रवास करणे, कार्य़कर्त्यांच्या गाठीभेटी आणि राजकारणाच्या सोंगट्या हलवणे या सर्व गोष्टी पवारांना आजही ऊर्जा देऊन जातात.

सर्वोच्च पदावर राजकारण करणाऱ्या नेत्यांच्या जीवनात स्वल्पविराम अभावानेच असतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९७८ आणि १९९२ या वर्षी राजीनामा दिला होता. १९९२ मध्ये या राजीनाम्यानंतर सामनाचा मथळा सुद्धा अनेकांना अजून आठवत असेल. शिवसेनाप्रमुखांचा अखेरचा जय महाराष्ट्र… परंतु बाळासाहेबांनी राजीनामा दिला नाही. शिवसैनिकांच्या आग्रहाखातर राजीनामा मागे घेऊन ते अखेरपर्यंत सक्रीय राहिले. हयातीच्या अखेरपर्यंत शिवसेनाप्रमुख राहिले. त्यामुळे पवारांच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयाचे आश्चर्य वाटते आहे.

पवारांनी एखादी भूमिका घेतली, तर दोन-चार दिवसांनी कोलांटी मारण्याची पवारांना सवय आहे. परंतु राजीनाम्याबाबत ते तसे काही करण्याची शक्यता कमी वाटते. राजीनामा नाट्य घडवून सहानुभूती निर्माण करणे हे कारणही असावे असे वाटत नाही. कारण सहानुभूती प्रदीर्घ काळ टिकत नाही आणि अद्यापि कोणतीही निवडणूक दृष्टीपथात नाही. विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना पावसात भिजून पवारांनी मीडियामध्ये मोठी चर्चा घडवण्यात यश मिळवले होते. परंतु तूर्तास निवडणुका दूर आहेत. पवारांचा निर्णय हा पक्षातील अंतर्गत फूट टाळण्यासाठी झाला असावा, असे मानायला वाव आहे.   गेले काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेसबाबतच्या बातम्या मीडियामध्ये मथळे बनतायत.

अजितदादा लवकरच भाजपा सोबत जाणार या चर्चेने जोर धरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक नेते मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत, ही बाब काही लपून राहिलेली नाही, परंतु अजित पवार यांचा जलवा काही औरच आहे. त्यांना मानणाऱ्या आमदारांची संख्या मोठी आहे. महाविकास आघाडीचे तारु बुडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य तरी शाबूत राहावे हा पवारांचा प्रय़त्न आहे. लोक माझे सांगाती या आत्मचरीत्र प्रकाश सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना, ‘महाविकास आघाडीचे काय होईल हे मला माहीत नाही’, अशी स्पष्टोक्ती पवारांनी केलेली आहे. मविआत त्यांना फार रस उरलेला नाही, हे स्पष्ट करणारे हे वक्तव्य आहे. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाने उद्धव ठाकरे यांचा निद्रानाश अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी भाकरी परतायची वेळ आलेली आहे, असे विधान केले होते. ही भाकरी त्यांच्या घरीच असेल असे त्यावेळी कुणाला स्वप्नातही वाटले नसेल. भाकरी करपण्याची शक्यता आहे, हे पवारांना का वाटले याचा शोध घेण्याची मात्र गरज आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार आणि पक्ष एकच हे समीकरण आहे. हेच समीकरण बदलण्याची पवारांची ही खेळी असावी.

हे ही वाचा:

लुधियानाच्या वायूगळतीने घेतला तीन हुशार मुलांचा घास

समलिंगींच्या न्यायासाठी भिन्नलिंगींवर भार कशासाठी?

प्रतिभा पवार का हसत होत्या ? सुप्रिया सुळे का बोलल्या नाहीत ?

गँगस्टर इक्बाल मिर्चीच्या विरोधातील गुन्ह्यांच्या फाईल्स गहाळ

जितेंद्र आव्हाड आज म्हणाले की, पवार हे देशातील आजघडीचे सर्वात मोठे पुरोगामी नेते आहेत. पक्ष आणि पवार वेगळे झाले तर उद्या पक्ष भाजपासोबत किंवा एनडीएसोबत गेला तरी पवारांचे पुरोगामीत्व शाबूत राहाते. पक्ष सुद्धा शाबूत राहातो. पवार निर्णय बदलणार नाही हे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले आहे. खरंतर थोरल्या पवारांचा राजकीय लौकीक तसा नाही. धरसोड हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीचे वैशिष्ट्य राहिले आहे. परंतु तरीही अजित पवार हे त्यांच्या राजीनाम्याबद्दल ठामपणे बोलतायत. हे काकींना सुद्धा ठाऊक आहे, असे सांगून त्यांनी प्रतिभा पवारांकडे बोट दाखवले. हा निर्णय त्यांच्या संमतीने किंवा त्यांच्याशी चर्चा करून झालाय हे अजितदादांनी स्पष्ट केले आहे. हा निर्णय प्रफुल पटेल यांच्यासारख्या आणखी काही नेत्यांना ठाऊक असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जेव्हा या राजीनामा प्रकरणावरून सुमारे दीड दोन तास हा गदारोळ सुरू होता, शरद पवार अत्यंत गंभीर मुद्रेने हा तमाशा पाहात होते. या संपूर्ण घटनाक्रमात प्रतिभा पाटील एकदाही गंभीर दिसल्या नाहीत. उलट पक्षाचे नेते रडत असताना अनेकदा त्या हसताना दिसल्या. अनेक नेत्यांशी त्यांच्या कानगोष्टीही सुरू होत्या. शरद पवारांच्या राजकारणाला एक गूढ वलय आहे. तेच वलय आज प्रतिभा पवार यांच्या हास्याभोवती निर्माण झाले होते. जी महिला पवारांच्या अवघ्या आयुष्याची साक्षीदार आहे, त्याच महिलेच्या साक्षीने पवारांनी आज त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय जाहीर केला.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,851चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
75,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा