‘हू किल्ड करकरे’ हे पुस्तक २००९ साली प्रकाशित झाले. लेखक होते, माजी आयपीएस अधिकारी एस. एम. मुश्रीफ कधी काळी ज्यांचे नाव तेलगी घोटाळ्यात होते. २६/११ रोजी मुंबईवर झालेला हल्ला हा फक्त लष्कर ए तोयबाने केलेला हल्ला नसून त्यात आरएसएसचाही हात होता, असा दावा या पुस्तकात करण्यात आला होता. योगायोगाने त्याच वर्षी देशाचे गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी ‘हिंदू टेररीझम’ या शब्दाचा वापर केला होता. काँग्रेस आणि काँग्रेसी इको सिस्टीमचे गेल्या २५ वर्षांतील हे सगळ्यात मोठे षडयंत्र होते. या षडयंत्रावरून पडदा उठण्याची वेळ आता आलेली आहे. कारण दहशतवादी तहव्वूर राणा याची रवानगी लवकरच अमेरीकेतून भारतात होते आहे.
डेव्हीड कोलमन हेडली या पाकिस्तानी वंशाच्या अमेरीकी नागरिकाला हाताशी धरून लष्कर ए तोयबाच्या तहव्वूर राणा याने २६/११ चा हल्ला घडवला होता. राणा हा पाकिस्तानच्या लष्करात होता. डेप्युटेशनवर त्याला लष्कर ए तोयबात पाठवण्यात आले होते. मुंबईत २६/११ रोजी झालेल्या हल्ल्याला भारतात झालेला आणखी एक हल्ला म्हणून पाहाता येत नाही. फक्त दहशत निर्माण करणे एवढा मर्यादित हेतू या हल्ल्यामागे नव्हता. एक खूप मोठे राजकीय षडयंत्रही होते.
अमेरीकेच्या तुरुंगात असलेल्या राणाचे भारतात होणारे हस्तांतरण त्या दृष्टीनेच महत्वाचे आहे, कारण त्याला या षडयंत्राची एकेक साखळी ठाऊक आहेत. मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या हल्ल्यामागे एक मोठे षडयंत्र होते. हल्ला करणारे हिंदू आहेत, असे भासवण्याचा आयएसआय़चा प्रयत्न होता. अजमल कसाबच्या हातात बांधलेला लाल रंगाचा कलावा, त्याच्या खिशात सापडलेले समीर चौधरी या नावाचे बंगळूरुचा पत्ता असलेले आयकार्ड, याचे पुरावे आहेत. परंतु हा हिंदू दहशतवाद्यांचा हल्ला आहे, हे दाखवण्याचा फक्त आयएसआयचा प्रयत्न नव्हता. मालेगाव ब्लास्ट पासून काँग्रेसचे नेते हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते. २६/११ या षडयंत्राचा परमोच्च बिंदू बनवण्याची त्यांची तयारी होती.
आयएसआय आणि काँग्रेसला एकच गोष्ट सिद्ध करायची होती की या देशात फक्त मुस्लीम दहशतवाद नसून हिंदू दहशतवादही आहे. इथे सवाल फक्त एवढाच आहे की आयएसआय आणि काँग्रेस एकत्रितपणे यासाठी प्रयत्न करत होते का? मुश्रीफ यांनी लिहीलेल्या पुस्तकात ते असे म्हणतात की, ‘२६/११ रोजी लष्करच्या दहशतवाद्यांच्या रडावर फक्त ताज, ट्रायडण्ट आणि नरीमन हाऊस होते. सीएसटी आणि कामा हॉस्पिटलवर झालेले हल्ले हे संघाशी संबंधित संघटनांनी केले होते’. कसाब जिवंत सापडला नसता तर हा हल्ला हिंदू संघटनांनी केला आहे, हे सिद्ध करणे सोपे झाले असते. एटीएसचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे हे मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निमित्ताने हिंदू दहशतवाद सिद्ध करण्याच्या प्रयत्नात होते. म्हणूनच त्यांना २६/११ च्या हल्ल्याच्या आडून हिंदू संघटनांच्या लोकांनी ठार केले असा दावा मुश्रीफ यांनी केला आहे. करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर दहशतवादी अजमल कसाब आणि अबू इस्माईल याच्या हल्ल्यात हुतात्मा झाले, परंतु तपास यंत्रणांच्या सुदैवाने यांच्या क्वालीसमध्ये असलेला अरुण जाधव हा कॉन्स्टेबल या हल्ल्यात बचावला. या अधिकाऱ्यांची हत्या केल्यानंतर कसाब आणि अबु इस्लाईल त्याचीच क्वालिस घेऊन पळाला होते. अरुण जाधवने वायरलेसवर दिलेल्या माहीतीच्या आधारे तुकाराम ओंबाळे या शूर अधिकाऱ्याने आपल्या जीवाची पर्वा न करता, कसाबला पकडले. त्यामुळे मुश्रीफच्या थापा उघड झाल्या.
कसाब पाकिस्तानी होता, याचे ढीगभर पुरावे पुढे समोर आले. पाकिस्तानी मीडियाने पुढे कसाब हा पाकिस्तानी असल्याचे पुरावे समोर आणले. त्याच्या वडीलांची मुलाखतच प्रसारीत केली. पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार मेहमूद अली दुर्राणी यांनीही कसाब हा पाकिस्तानी असल्याचे कबूल केले. त्यामुळे चवताळलेले पाकिस्तानचे पंतप्रधान यूसूफ रझा गिलानी यांनी त्यांची हकालपट्टी केली. करकरेंच्या हत्येनंतर के. पी. रघुवंशी या अधिकाऱ्याला एटीएसचा चार्ज देण्यात आला. त्यानेच पुढे संघाला सामील असलेल्या आयबीच्या अधिकाऱ्यांच्या दबावाखाली पुढील तपासात करकरेंच्या हत्येमागे आरएसएस असल्याचे सगळे पुरावे पुसून टाकले, असा दावा मुश्रीफ हू किल्ड करकरे या पुस्तकात करतात. मुश्रीफ यांनी हे पुस्तक लिहीले तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार होते. केंद्रात यूपीएचे सरकार होते. सरकारे काँग्रेसची मात्र परंतु आयबी, एटीएसचे अधिकारी आरएसएसच्या इशाऱ्याने कामे करतायत, या पेक्षा मोठा विनोदी दावा कोण करू शकेल. ही सगळी मंडळी ब्राह्मणवादी होती, त्यांना भारतीय घटना उलथून टाकायची होती. असे ते म्हणतात. आज संघावर सगळ्यात जहरी टीका कोण करत असेल तर काँग्रेस नेते राहुल गांधी. त्यांची ताकद त्यावेळी मनमोहन सिंह यांच्यापेक्षा जास्त होती. इतकी की पंतप्रधानांनी काढलेला अध्यादेश जाहीरपणे फाडण्याची क्षमता त्यांच्याकडे होती. इतका मोठ्या हिंदू द्वेष्ट्याकडे, आरएसएस विरोधकाकडे केंद्र सरकारची सूत्र असताना आणि त्याच्याच पक्षाची महाराष्ट्रात सत्ता असताना केंद्रीय तपास यंत्रणा आरएसएसच्या मार्गदर्शनाखाली काम करतात हा दावा एखादा नशेडीच करू शकतो. परंतु, हा दावा एकटे मुश्रीफ करत नव्हते. २६/११ नंतर केंद्र सरकारमधील अल्पसंख्याक विभागाचे मंत्री जे कधी काळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्या अब्दुल रेहमान अंतुले यांनीही हाच दावा केला होता. केंद्र सरकारने त्यांचा राजीनामा घेतला. परंतु भूमिका मात्र नरो वा कुंजरावा अशा प्रकारे घेतली. काँग्रेसने मुस्लीम मतांसाठी अशी भूमिका घेतली, अशी माहीती पुढे विकी लिक्सच्या माध्यमातून पुढे आली. अमेरीकेचे भारतातील राजदूत डेव्हीड मलफोर्ड यांनी २३ डिसेंबर २००८ रोजी अमेरीकेच्या स्टेट डीपार्टमेंटला पाठवलेल्या एका संदेशात ही बाब म्हटली आहे. काँग्रेस नेते मुंबईवर झालेल्या हल्ल्याचा मुस्लीम मतांसाठी राजकीय वापर करतायत, असे त्या संदेशात म्हटले होते.
२००९ मध्ये देशाचे गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी दहशतवाद हा दहशतवादच असतो, तो मुस्लीमांचा असो किंवा हिंदूंचा असे विधान केले. याचा अर्थ हिंदू दहशतवादही अस्तित्वात आहे, असे त्यांनी सुचक विधान करून ए. आर. अंतुले यांनी जे तर्कट मांडले ते चिदंबरम यांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केले. मुस्लीम तुष्टीकरणाची ही भूमिका वारंवार उघडी पडली आहे. २६/११ च्या हल्ल्यानंतर माजी केंद्रीय गृहसचिव राम प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली होती. याच प्रधानांनी २०१७ मध्ये एका मुलाखतीत एक मोठा खळबळजनक गौप्यस्फोट केला. ते म्हणाले या हल्ल्यात लष्कर ए तोयबाच्या अधिकाऱ्यांना मदत करणारे लोकल कनेक्शन होते, परंतु ही माहीती चिदंबरम यांच्या दबावामुळे अहवालात आम्हाला उघड करता आली नाही.
हे ही वाचा..
श्रीजेश, सविता, हरमनप्रीत यांचे हॉकी इंडिया वार्षिक पुरस्कारांसाठी नामांकन
सीता मातेचे मंदिर बांधण्याची क्षमता मोदी सरकारमध्येच
विरोधी पक्ष नेत्यासह विरोधी खासदारांसाठी रिफ्रेश कोर्सची गरज
संभल: मोठ्या आवाजात अजान केल्याबद्दल इमामाविरुद्ध एफआयआर दाखल
मुश्रीफ यांचे पुस्तक म्हणजे सत्य असत्याची बेमालूम भेसळ होती, त्याला काँग्रेस नेत्यांचा आशीर्वाद होता. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात काँग्रेस नेते दिग्विजय सिंह उपस्थित होते, त्यावरून हे पुरेसे स्पष्ट व्हावे. ‘२६/११ च्या हल्ल्या आधी हेमंत करकरे यांचे माझ्याशी जेव्हा बोलणे झाले तेव्हा आपल्याला हिंदुत्ववादी संघटनांकडून धमक्या येत असल्याचे त्यांनी सांगितले होते’, असे विधान दिग्विजय सिंह यांनी या प्रकाशन सोहळ्यात केले होते. मुंबईवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानमधून रवाना झालेल्या बोटीची माहीती अमेरीकी गुप्तचर यंत्रणांकडून रिसर्च एण्ड एनॅलिसिस विंग अर्थात रॉला मिळाली. त्यांच्याकडून आयबीला मिळाली होती. परंतु आयबीने ही माहीती मुंबई पोलिसांना न देता नेवल इंटेलिजन्स आणि कोस्टगार्डला दिली असा दावा मुश्रीफ करतात. आयबीमध्ये असलेल्या संघ धार्जिण्या अधिकाऱ्यांनी हे जाणीवपूर्वक केले. कारण मुंबईवर होणारा हल्ला त्यांना हवा होता, कारण त्यांना करकरे यांचा बळी घ्यायचा होता, असे भन्नाट आरोप मुश्रीफ या पुस्तकात करतात आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह त्या पुस्तकाचे प्रकाशन करतात.
अलिकडेच भाजपामध्ये प्रवेश करणारे कृपाशंकर सिंह देखील त्या मंचावर होते हे विशेष. हेच दिग्विजय फरार दहशतवादी झाकीर नाईक यालाही डोक्यावर घेऊन नाचत होते. तपासाचा विषय हा आहे, की केंद्रात यूपीएचे सरकार होते. त्या सरकारच्या सुप्रीम नेत्या सोनिया गांधी होत्या. मग त्यांच्या सरकारने मुंबई हल्ल्याच्या संदर्भातील या गंभीर इनपुटकडे दुर्लक्ष का केले? मुंबईवर हल्ला व्हावा, त्यात सगळे दहशतवादी मरावे आणि त्यांच्या बोगस आयडेंटीटवरून हा हल्ला हिंदूंनी घडवला असा निष्कर्ष काढण्यात यावा अशी काँग्रेसच्या नेत्यांची इच्छा होती का? म्हणूनच आधीपासून वातावरण निर्मिती करण्यासाठी त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाचे कथानक रचून त्यात कर्नल श्रीकांत पुरोहीत, मेजर रमेश उपाध्या, साध्वी प्रज्ञा सिंह यांना अटक करून त्यांना थर्ड डीग्री लावली होती? या कारस्थानात पाकिस्तानच्या आयएसआयने काही काँग्रेस नेत्यांशी हातमिळवणी केली होती का ? संघाला कायम स्वरुपी चिरडून टाकायचे जेणे करून २००९ च्या लोकसभेचा मार्ग निर्वेध होईल आणि भरभरून मुस्लीमांची मते मिळतील असा काँग्रेसचा गेम प्लान होता का? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. दहशतवादी तहव्वूर राणाचे लवकरच भारतात होणारे आगमन त्याच दृष्टीने महत्वाचे आहे. त्याच्याकडे ही सगळी उत्तरे आहेत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)