महायुती सरकारचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवार, १० मार्च रोजी सादर केला. यावेळी महिलांसाठी सरकार कोणत्या योजना जाहीर करणार याकडे लक्ष लागून राहिलेले असतानाच ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने’साठी अजित पवारांनी मोठी घोषणा केली. अजित पवार म्हणाले की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत सुमारे २ कोटी ५३ लाख लाभार्थी महिलांना जुलै, २०२४ पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी ३३ हजार २३२ कोटी रुपये खर्च झाला आहे. सन २०२५- २६ मध्ये या योजनेकरीता एकूण ३६ हजार कोटी रुपये प्रस्तावित आहेत. तसेच या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचे विचाराधीन आहे.
पुढे अजित पवार म्हणाले की, दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत सुमारे २२ लाख महिलांना “लखपती दिदी” होण्याचा मान मिळाला असून सन २०२५-२६ मध्ये आणखी २४ लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दीष्ट आहे.
तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच अन्य विशेष सहाय्य योजनांतील अर्थसहाय्य सर्व लाभार्थींच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. “लेक लाडकी” योजनेअंतर्गत 1 लाख 13 हजार लाभार्थींना थेट लाभ देण्यात आला आहे. सन २०२५- २६ मध्ये या योजनेकरिता ५० कोटी ५५ लाख रुपये प्रस्तावित आहे.
आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना, नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान, आदर्श आश्रमशाळा, ठक्करबाप्पा आदिवासी विकास योजना तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम् योजना आदी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. आदिवासी उपयोजनेच्या तरतुदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ४० टक्के एवढी भरीव वाढ करण्यात आली आहे, अशी मोठी घोषणा अजित पवारांनी केली.
हे ही वाचा..
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ‘नमामि गोदावारी’ अभियानाचा आराखडा तयार करणार
महायुतीच्या अर्थसंकल्पात बळीराजासाठी ९ हजार ७१० कोटी रुपयांची तरतूद
मुंबई महानगर प्रदेश आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘ग्रोथ हब’ म्हणून विकसित करणार
श्रीजेश, सविता, हरमनप्रीत यांचे हॉकी इंडिया वार्षिक पुरस्कारांसाठी नामांकन
अनुसूचित जाती घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थी वसतिगृहे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्तीसुधार योजना इत्यादी योजना राबविण्यात येत आहेत. महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाव्दारेही अनेक योजना राबविण्यात येत आहेत. अनुसूचित जाती उपयोजनेच्या तरतुदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ४२ टक्के एवढी भरीव वाढ करण्यात आली आहे, अशी खुशखबर अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना दिली.