38 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
घरसंपादकीयभेजा फ्राय झालाय का यांचा?

भेजा फ्राय झालाय का यांचा?

पुन्हा खासदारकीचा योग येणार नाही, हे राऊतांचे मुख्य दु:ख आहे.

Google News Follow

Related

तुम्ही भेजा फ्राय पाहिलाय का? सिनेमा अत्यंत विनोदी आहे. यातील भारत भुषण हे प्रमुख पात्र, विनय पाठकने मस्त रंगवले आहे. आपल्याला संगीतातील बरंच कळते, असा समज असलेला हा नायक. चलते, चलते…. मे चलते चलते कितनी बार आता है… असे फडतूस प्रश्न तो विचारतो, कारण ही संगीतातील समज दाखवण्याची खुमखुमी असते. संगीत विद्यालयात क्लर्क असलेल्या पित्याकडून संगीताचा वारसा मिळालाय, असा त्याचा दावा असतो. विश्वप्रवक्ते संजय राऊत आणि त्यांचे समाजवादी साथी अलिकडे हिंदुत्व आणि राम मंदिराबाबत अलिकडे आपली समज दाखवण्याची धडपड करतायत तेव्हा भेजा फ्रायमधल्या भारत भूषणची आठवण झाल्याशिवाय राहात नाही.

 

बाबरी उगाच पाडली अशी हळहळ संजय राऊतांना वाटत असावी. राम मंदीर वादग्रस्त वास्तूपासून चार किमीवर बांधलंय असा नवा दावा त्यांनी केलेला आहे. मुळात सामनामध्ये खर्डेघाशी करण्याच्या पलिकडे राऊतांचा या चळवळीशी संबंध नाही. परंतु अलिकडे ते रोज राम मंदीरावर बोलत असतात. केवळ तेच नाही. राम मंदीराच्या नावाने गेली तीन दशकं ज्यांच्या पोटात मुरडा उठायचा असे तमाम समाजवादी साथी, भुक्कड डावे, बिनबुडाचे काँग्रेसवाले, जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे ब्रिगेडी नेते राम मंदीर, हिंदुत्व, हिंदू धर्म आणि शंकराचार्यांवर ज्ञान पाजळतायत.

 

आज फक्त अयोध्येत राम मंदीर उभे राहते आहे, तर ही परिस्थिती, कल्पना करा उद्या काशी-मथुरेसह देशातील तमाम वादग्रस्त भूमीवर मंदिरांचा जीर्णोद्धार सुरू झाला तर कुमार सप्तर्षी, विश्वंभर चौधरी, जितेंद्र आव्हाड बहुधा भगव्या कफन्या घालून प्रवचने करत देशभर फिरतील.

 

मंदिराच्या जागेवर हॉस्पिटल का बांधत नाही, हा डाव्या मंडळींचा लाडका सिद्धांत. तीच मंडळी आता मंदीराच्या कळसाचे काम पूर्ण झालेले नाही, मुहूर्त योग्य नाही, शंकराचार्यांना काय टाळ्या वाजवण्यासाठी बोलावणार काय? असे फाजील प्रश्न विचारतायत. हिंदू हा शब्द उच्चारला तरी ज्यांचा चेहरा पाटणकर काढा प्यायल्या सारखा व्हायचा त्यांचे हिंदुत्वाबद्दल प्रेम अचानक उफाळून आले आहे.

 

बिन शिखराच्या मंदीराचे उद्घाटन करणे धर्मशास्त्रात बसत नसेल तर भाजपाकडून झालेले हे हिंदू धर्माचे अवमूल्यन नाही का ? असा सवाल कुमार सप्तर्षी विचारतायत. धर्माला अफूची गोळी ठरवणाऱ्या डाव्यांना, समाजवाद्यांना अचानक धर्म शास्त्रांबद्दल इतका कळवळा का आलाय?

 

२०१७ मध्ये गुजरात निवडणुकांमध्ये भाजपाला विजय मिळाल्यानंतर पोटशूळ व्यक्त करण्यासाठी पुण्यात समाजवादी गोतावळ्याची हळहळ सभा झाली होती. त्यावेळी ‘हिंदुत्ववाद हा बंधुत्ववाद होऊ शकत नाही’, असे विधान कुमार सत्पर्षी यांनी केलेले आहे. या क्रांतीवाल्यांची भाषाही राम मंदिरामुळे बदललेली आहे.

सप्तर्षी गेली अनेक वर्षे पुण्यात युवक क्रांती दल नावाची संस्था चालवतात. ते युवक असताना संस्था स्थापन झाली असावी बहुधा. परंतु या संस्थेने क्रांती कमी आणि हिंदुत्ववाद्यांविरुद्ध गरळ ओकण्याचा धंदा जास्त केला.

 

युवक क्रांती दलाची स्थापना १९६७ सालची, सप्तर्षींचा जन्म १९४१ चा. म्हणजे संस्थेने पन्नाशी पार केली आहे. सप्तर्षींचे वय आता ८२ इतके आहे. गेल्या अनेक दशकांमध्ये ना काही संस्थेने मिळवलं, ना सप्तर्षींच्या हाती काही लागले. युवा क्रांतीची स्वप्न कुजून, झडून गेली. आय़ुष्यभर आदळ आपट करून सुद्धा हिंदुत्ववादाला आपण रोखू शकलो नाही, ही खदखद त्यांच्या मनात असणारच. हे समाजवादी सप्तर्षी हिंदू धर्माच्या अवमूल्यनाबाबत बोलतायत. काय संबंध याचा? हा एकूणच समाजवादी क्रांतीचा पराभव आहे. त्यांचे विश्वंभर चौधरी, सरोदे यांच्यासारखे चेले-चपाटे तर इतके निराश झालेत कि पोष्टी पाडण्यासाठी त्यांना राम मंदीराशिवाय दुसरा विषय सापडत नाही.

 

या सगळ्यांना वैचारिक खाद्य पुरवण्याचे किंवा चघळण्यासाठी मुद्दे पुरवण्याचे काम संजय राऊत करतायत. मुळात उबाठा गटाचा बाजार उठल्यामुळे पुन्हा खासदारकीचा योग येणार नाही, हे राऊतांचे मुख्य दु:ख आहे. दुकान बंद झाले आहे, हे आठवून त्यांना सतत उमाळे येत असतात. जेवढा दु:खावेग जास्त तेवढी जास्त जळजळ ते व्यक्त करतात. भडास म्हणा हवी तर.

रामलल्ला होती त्या ठिकाणापासून मंदीर चार किमीवर बांधले असल्याचा शोध त्यांनी लावलेला आहे. हा दावा निखालस खोटा आहे. रामजन्मभूमी न्यासाने ७० एकरच्या जमिनीत मंदीर परिसर विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी २.७७ एकरच्या वादग्रस्त जागेसाठी गेली अनेक वर्षे कोर्टबाजी सुरू होती. याच भूमीवर बाबरीचे तीन घुमट होते. मधल्या सर्वात मोठ्या घुमटाखाली रामलल्ला विराजमान होती. इथेच सीता रसोई होती, राम चबुतरा होता. रामलल्लाकडे मुख करून उभे राहिले तर उजव्या बाजूला सीता रसोई आणि डाव्या बाजूला राम चबुतरा आहे. या ज्या जागेवर बाबरीचा मुख्य घुमट होता, त्याच जागेवर गर्भगृह बांधण्यात आलेले आहे.

हे ही वाचा:

विराट कोहलीला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लेपाक्षीच्या वीरभद्र मंदिराला दिली भेट

भारतीय समाजाचा मानबिंदू नष्ट करण्याचे अथक प्रयत्न

दहशतवादी पन्नूला आली पुन्हा धमकी देण्याची खुमखुमी!

राऊत यांच्या विकृत मेंदूतून निघणारे हे तर्क फक्त हिंदूंची दिशाभूल करणारे नाहीत, तर हिंदू समाजाच्या श्रद्धांचा अपमान करणारे आहेत. राऊतांनी यापूर्वी चॅनेलच्या बूमसमोर शिवीगाळ करणे, थुंकणे असे सर्व कमरेखालचे चाळे केलेले आहेत. परंतु त्यांचा हा गुन्हा माफ करण्यालायक नाही.

देशात राम लहर पसरलेली आहे. लोक त्यात स्वयंप्रेरणेने सामील होतायत. राम मंदीराशी आपला संबंध जोडण्याचा प्रयत्न करून सुद्धा यश येत नाही. या सोहळ्यात आपला सहभाग नाही, याची जबरदस्त टोचणी लागलेले राऊतांसारखे छुपे काँग्रेसी या सोहळ्याला नाट लावण्याचा प्रयत्न करतात. त्यांची ही तडफड आता पाहवत नाही, अशी झालेली आहे. संजय राऊत लवकर बरे व्हा…

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा