घाटकोपरमध्ये एका कार्यक्रमात संघाचे माजी सह सरकार्यवाह भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावरून संघ-भाजपाला टार्गेट करण्याचे प्रयत्न उबाठा शिवसेनेने सुरू केले आहेत. तुमच्या रक्तात भेसळ आहे, असे विधान उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेले आहे. उठसूठ यांच्या तोंडी अस्मितेच्या बाता असतात. जिथे गुजरातीचा मुद्दा असतो तिथे जनाब उद्धव ठाकरे आणि कंपनीची मराठी अस्मिता जागी होते. तेच उद्धव ठाकरे जेव्हा चिता कॅंप, भेंडी बाजार सारख्या मुस्लीम वस्त्यांमध्ये जातात तेव्हा मराठीची ध्वजा गुंडाळतात, शेपूट घालतात.
मराठी नको हिंदीच हवे, या आग्रहासमोर माना तुकवतात. जेव्हापासून उबाठा शिवसेनेने हिरवे हिंदुत्व स्वीकारलेले आहे, तेव्हापासून काही ना काही मुद्द्यावरून ते संघाला झोडण्याचे काम करतात. कधी सरसंघचालक मोहनराव भागवत, कधी भैयाजी जोशी, हे का केले जाते त्याचे उत्तर सोपे आहे. एकतर भुंकणाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे हे संघाचे जुने धोरण आहे. त्यामुळे काहीही बोलले तरी संघ उत्तर देणार नाही याची ठाकरेंना खात्री असते. दुसरे संघाला झोडले तर कट्टरतावादी टोपीवाल्यांना उकळ्या फुटतात. मतपेढी अधिक पक्की होते. घाटकोपरची भाषा गुजराती आहे, या भैयाजी जोशी यांच्या कथित वक्तव्यावरून उबाठा शिवसेनेसह मविआच्या नेत्यांनी राळ उडवलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी भैयाजी जोशींचा उल्लेख अनाजी पंत असा केला आहे.
ब्रिगेडींच्या सानिध्यात आणि शरद पवारांच्या छत्रछायेखाली राहिल्याचा हा परिणाम आहे. घाटकोपरची भाषा गुजराती आहे, हे भैयाजींचे वक्तव्य मराठीत आहे, हे उद्धव ठाकरे विसरतात. ते बहुधा लोकसभा निवडणुकीच्या काळात केलेली स्वत:ची भाषणे सुद्धा विसरलेले दिसतात. मुस्लिम मतांसाठी जेव्हा ठाकरेंचे वाकरे झाले होते, त्या काळात उबाठाचे लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची चिता कॅंपमध्ये सभा झाली होती. हा मुस्लीमबहुल भाग आहे. एटीएसचे अधिकारी जेव्हा दहशतवादी कारवायांच्या संदर्भात जेव्हा केव्हा संशयास्पद व्यक्तिंच्या शोधात असतात तेव्हा मुंबईतील जे परिसर पिंजून काढले जातात, त्यात चिता कॅंपचा समावेश कायम असतो. इथे अनेक बांगलादेशींनी बस्तान बसवले असल्याचा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरेंच्या नव्या मतपेढीत हा भाग अग्रक्रमाने येतो.
हे ही वाचा:
सैन्याच्या विमानातून नागरी वस्तीत चुकून झाला बॉम्बवर्षाव आणि…
विधानपरिषद निवडणुकीतील विजय समृद्ध तेलंगणा निर्मितीचे पाऊल
अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या!
शाळांमधील गैरसोयीवर दिल्लीच्या मुख्यमंत्री संतापल्या!
अनिल देसाई यांच्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे बोलायला उभे राहतात. मराठीमध्ये बोलू की हिंदीमध्ये? असा सवाल करतात. समोर बसलेले दाढीवाले, बुरखेवाल्या जेव्हा हिंदी हिंदी असा घोषा करतात, तेव्हा उद्धव ठाकरे मराठी अस्मितेचा झेंडा खाली उतरवतात. व्यवस्थित घडी करून खिशात घालतात. चिता कॅंपची भाषा हिंदी आहे, मराठी नाही, असे मनोमन मान्य करत पुढचे संपूर्ण भाषण हिंदीत करतात. तेव्हा या जमावासमोर उद्धव ठाकरे मराठीचा आग्रह धरत नाहीत. सभेला आलेल्या चिता कॅंपच्या लोकांना ‘चिता कॅंप महाराष्ट्रात आहे. इथली भाषा मराठी आहे, तुम्ही हिंदीचा आग्रह कसा काय धरू शकता?’ असे विचारण्याच्या भानगडीत उद्धव ठाकरे पडत नाहीत. ठाकरेंचा तोंडाळपणा, त्यांची शेलकी भाषा, त्यांचे टोमणे हे संघाच्या सज्जन पदाधिकाऱ्यांसाठी राखीव आहेत. मुस्लीम मतदारांचा विषय जिथे येतो तिथे ते वाकायला काय सरपटायलाही तयार असतात. तिथे उद्दामपणा दाखवण्याची धमक असती तर मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर बेहरामपाडा उभा राहीला नसता. हा दुटप्पीपणा, हा निलाजरेपणा ठाकरेंच्या व्यक्तिमत्वात व्यवस्थित मुरलेला आहे. स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे वाकून हे त्यांचे जुने धोरण आहे.
चिता कॅंपमध्ये समोर बसलेल्या जमावाला उद्धव ठाकरे मराठी अस्मितेचे धडे देण्याच्या भानगडीत पडत नाहीत. तुमच्या रक्तात भेसळ आहे किंवा तुम्ही टिपू सुलतानाची औलाद आहात, अशी विधानही करत नाहीत. कारण तिथे प्रश्न मतांचा असतो. आणि मतांसाठी उद्धव ठाकरे कितीही वाकू शकतात, कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळू शकतात? अशी उदाहरणे खंडीभर आहेत. फार इतिहासात जाण्याची गरज नाही. अगदी गेल्या दहा वर्षांचा इतिहास तपासला तरी भरपूर उदाहरणे मिळतील. बाता मराठी अस्मितेच्या करायच्या आणि सत्तेवर आल्यानंतर उर्दूभवने उभी करायची. त्यावेळी ना मराठीची आठवण येत ना अस्मितेची. यांनी मराठीची अवस्था चंद्रभागा आजीसारखी करून ठेवली आहे. जेव्हा उन्हातान्हात लढण्याची गरज असते तेव्हा फक्त चंद्रभागा आजी आठवतात. सत्तेवर असताना प्रियांका चतुर्वेदी.
वरळीतून पहिल्यांदा आदित्य ठाकरे लढले तेव्हा केम छो वरळीचे लावलेले फलक हा मराठी अस्मितेचा जय जयकार होते का? काय गरज होती गुजराती फलकांची? अवघा वरळी कोळीवाडा मराठी आहे, त्यांचा गुजरातीशी काय संबंध होता? वरळीची भाषा गुजराती आहे, असे मानूनच ‘केम छो वरळी’चे फलक लावलेत ना तुम्ही? नाही तर ‘कसं काय वरळी’चे फलक लागले असते. तिथे मराठीची आठवण होत नाही, कारण पुन्हा प्रश्न मतांचा असतो.
मुंब्र्यात मराठीत बोलायचा आग्रह धरल्यामुळे मुस्लीम तरुणांकडून मारहाण झालेल्या विषयावर ना ठाकरे बोलले, ना जितेंद्र आव्हाड. तेव्हा ज्यांची दातखीळ बसली होती, त्यांना आता कंठ फुटला आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







