दक्षिण कोरियामध्ये हवाई दलाच्या सरावादरम्यान मोठी चूक झाल्याची घटना घडली आहे. दक्षिण कोरियाच्या हवाई दलाच्या विमानातून नागरी वस्तीच्या भागात काही घरांवर चुकून बॉम्ब पडल्याची घटना घडली आहे. या बॉम्बचा स्फोट झाल्याने १५ लोक जखमी झाले आहेत, यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
माहितीनुसार, दाकाशीन कोरियाचे सैन्य अमेरिकन सैन्यासोबत काही ड्रिल करत होते. यावेळी लष्करी विमानातून बॉम्ब टाकण्यात आला आणि हे बॉम्ब चुकून मानवी वस्तीमध्ये पडल्याने अनेक घरांचे आणि चर्चचे नुकसान झाले आहे. बॉम्बचा स्फोट होऊन काही नागरिक जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर परिसर हादरला होता. अचानक झालेल्या बॉम्ब हल्ल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. उत्तर कोरियाशी वैर असल्याने सुरुवातीला हे हल्ले त्यांच्याकडून झाल्याचे लोकांना वाटले. परंतु, काही काळाने लक्षात आले की, बॉम्ब त्यांच्याच सैन्याच्या विमानातून पडले आहेत.
दक्षिण कोरियाच्या हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, राजधानी सोलच्या ईशान्येकडील पोचेओन शहरातील नागरी भागामध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळी १०:०७ वाजता दोन KF-१६ लढाऊ विमानांमधून आठ MK-८२ बॉम्ब टाकण्यात आले आणि ते नियुक्त केलेल्या फायरिंग रेंजच्या बाहेर पडले. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, प्राथमिक निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की, पायलटने चुकीचे बॉम्बस्फोट निर्देशांक प्रविष्ट केल्यामुळे हा अपघात झाला.
हे ही वाचा :
महाराष्ट्राची भाषा मराठीच, राज्यातील प्रत्येकाने मराठी शिकले पाहिजे, बोलले पाहिजे!
जयकुमार गोरेंकडून संजय राऊत, रोहित पवारांविरोधात हक्कभंग
रान्या रावला सोने तस्करीसाठी मिळत होते १ किलोमागे १ लाख!
डीप-टेक इनोव्हेशन भारताला १० ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवणार
दक्षिण कोरियाच्या लष्कराने सांगितले की, लवकरच या घटनेची चौकशी पूर्ण होईलं. सध्या सर्व लाईव्ह-फायर प्रशिक्षण स्थगित करण्यात आले आहे. तसेच घटनेच्या चौकशीसाठी एक अपघात प्रतिसाद पथक स्थापन करण्यात आले आहे. तसेच हवाई दलाने नुकसान भरपाई देण्याचे म्हटले आहे. हवाई दलाने या बॉम्बस्फोटामुळे नागरिकांचे नुकसान झाल्याबद्दल माफी मागितली आहे आणि जखमींना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिका- दक्षिण कोरियाच्या संयुक्त संरक्षण व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी फ्रीडम शील्ड ड्रिल १० मार्च ते २० मार्च दरम्यान आयोजित करण्याचे नियोजन होते, असे सोलच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफने गुरुवारी सांगितले.