भय्याजी जोशी यांचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही. ते पूर्णपणे ऐकून, त्यावर माहिती घेवून बोलेन. पण आमची भूमिका काय, सरकारची भूमिका काय आहे. तर सरकारची भूमिका पक्की आहे. मुंबईची, महाराष्ट्राची , महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
मुंबईतील एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर नवा गदारोळ निर्माण झाला आहे. याचे पडसाद विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाहायला मिळाले. विरोधकांनी हा मुद्दा उचलत मराठी भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावर सरकारची भूमिका काय?, असा सवाल उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे. माझ्या वक्तव्यात, त्या संदर्भात भय्याजी जोशी यांचं दुमत असेल असं मला वाटत नाही. तथापि पुन्हा एकदा शासनाच्या वतीने सांगतो, मुंबईची भाषा मराठी आहे, महाराष्ट्राची भाषाही मराठी आहे. इतर भाषांचा इथे सन्मान आहे. कोणत्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही. कारण जो स्वत:च्या भाषेवर प्रेम करतो, तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करू शकतो, त्यामुळे तो सन्मान आहेच. म्हणूनच शआसनाची भूमिका पक्की आहे, शासनाची भूमिका मराठी आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा :
जयकुमार गोरेंकडून संजय राऊत, रोहित पवारांविरोधात हक्कभंग
रान्या रावला सोने तस्करीसाठी मिळत होते १ किलोमागे १ लाख!
डीप-टेक इनोव्हेशन भारताला १० ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवणार
अमेरिकेतील घुसखोरांना मायदेशी पाठवण्याचा खर्च ३० लाख डॉलर्स, उड्डाणे स्थगित
दरम्यान, मुंबईतल्या घाटकोपरमधील विद्याविहार या ठिकाणी एक कार्यक्रम पार पाडला. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी मुंबईतील विविधतेमधील एकता यावर एक वक्तव्य केलं. त्यावेळी ते म्हणाले, मुंबईमध्ये विविध राज्य आणि प्रांतामधील भाषा बोलणारे नागरिक राहतात तिथे अनेक भाषा आहेत जशी घाटकोपरची भाषा गुजराती आहे त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलच पाहिजे असं नाही.