अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये ‘होळी मिलन’ साजरी करण्याची परवानगी नाकारल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. यानंतर काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासन हिंदूंशी भेदभाव करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच होळी साजरी करण्यास परवानगी न मिळाल्यास विद्यार्थ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे हा विषय उपस्थित करण्याचा इशारा दिला आहे.
पदव्युत्तर पदवीचा विद्यार्थी अखिल कौशल याने २५ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाकडे होळी निमित्त परवानगी मागितली होती. हिंदू विद्यार्थ्यांच्या वतीने, विद्यापीठाच्या प्रॉक्टर वसीम अली यांना व्हाइस चान्सलर म्हणून संबोधित केलेले पत्र सादर करण्यात आले होते, ज्यामध्ये ९ मार्च रोजी विद्यापीठातील एनआरएससी क्लबमध्ये ‘होळी मिलन’ कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी मागण्यात आली होती. त्यानंतर प्रॉक्टरने विद्यार्थ्यांना कळवले की प्रशासनाने कॅम्पसमध्ये होळी कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे.
अखिल कौशल याने म्हटले आहे की, “आमच्याकडे बैठकीत झालेल्या चर्चेचे ऑडिओ आणि व्हिडिओ आहेत. जर आम्हाला परवानगी दिली नाही, तर आम्ही ते ऑडिओ आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू. एएमयूमध्ये इतर धर्मांचे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. हिंदू विद्यार्थ्यांना त्यावर कोणताही आक्षेप नाही. मग हिंदू विद्यार्थ्यांना होळी मिलन समारोह आयोजित करण्यापासून का रोखले जात आहे? पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात एएमयूला एक लघु भारत असे वर्णन केले होते. भारत सर्व धर्मांचा आदर करण्यासाठी ओळखला जातो. जर आम्हाला होळी मिलन आयोजित करण्याची परवानगी दिली गेली नाही, तर आम्ही ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून देऊ.”
दरम्यान, विद्यापीठात कोणताही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी नसल्याचे प्रॉक्टर यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी पूर्वीही होळी साजरी केली होती, परंतु कॅम्पसमध्ये विशिष्ट ठिकाणी विशेष कार्यक्रमासाठी कधीही परवानगी मागितली गेली नव्हती. वसीम अली म्हणाले की, विद्यार्थी नेहमीप्रमाणे कॅम्पसमध्ये किंवा त्यांच्या वसतिगृहाच्या खोल्यांमध्ये होळी साजरी करू शकतात, परंतु विशेष कार्यक्रमासाठी परवानगी दिली जाणार नाही.
हे ही वाचा..
होळीच्या रंगाचा त्रास होत असेल तर मुस्लिमांनी घराबाहेर पडू नये
तहव्वूर राणाची तंतरली, म्हणतो, भारतात पाठवू नका, छळ करून मारतील!
दक्षिण आफ्रिका पुन्हा ठरले ‘चोकर्स’
नौदलात सामील होण्यासाठी २,९७२ अग्निवीर सज्ज
यानंतर अनेक हिंदू संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. अखिल भारतीय करणी सेनेने मोर्चा काढला असून ‘एएमयूची हुकूमशाही चालणार नाही’ अशा घोषणा देण्यात आल्या. उत्तर प्रदेशचे पर्यटन मंत्री जयवीर सिंह यांनी परवानगी नाकारल्याबद्दल टीका केली असून म्हटले की, जर भारतातील कोणतेही विद्यापीठ केवळ एका विशिष्ट धर्माचे समर्थन करत असेल आणि इतर सण साजरे करण्यास बंदी घालत असेल तर अशा प्रकरणांचा पुनर्विचार केला पाहिजे. माजी महापौर आणि भाजप नेत्या शकुंतला भारती यांनीही टीकेची झोड उठवत म्हटले आहे की, “विद्यापीठ कोणाचीही वैयक्तिक मालमत्ता नाही, ते सर्वांचे आहे. हिंदू असोत, मुस्लिम असोत, शीख असोत किंवा ख्रिश्चन असोत. ज्या पद्धतीने प्रशासन वागत आहे आणि होळी खेळली जाणार नाही म्हणत आहे तर मी म्हणत आहे की, ईद देखील तिथे साजरी केली जाणार नाही.”