राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात हा मुद्दा चांगलाच पेटला होता. विधिमंडळ अधिवेशनातही याचे पडसाद उमटले. विरोधकांनी हा मुद्दा उचलत भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावर सरकारची भूमिका काय? असा सवाल उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. मुंबईची, महाराष्ट्राची भाषा मराठी असून इतर भाषांचा इथे सन्मान आहे, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांसह हुतात्मा स्मारक येथे पोहचत हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, “माझी भूमिका मांडली आहे, पुन्हा पुन्हा तेच सांगण्यात अर्थ नाही. त्यांनी कितीही विष कालवलं तर ते मुंबई मराठी माणसांपासून तोडू शकत नाहीत. भैय्याजी जोशी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा,” अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह जयंत पाटील, डॉ. नितीन राऊत, सचिन अहिर, अजय चौधरी, भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार, भाई जगताप, आदी आमदार उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा स्मारकाला केलेल्या अभिवादनावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे की, “हुतात्मा चौकात जाऊन माफी मागा म्हणावं, मराठी अस्मितेसाठी आवाज उठवणाऱ्या आंदोलकांना गोळ्या घालून १०६ बळी घेणाऱ्या पक्षाच्या मांडीवर बसल्याबद्दल. त्यांच्यासोबत त्याच हुतात्मा स्मारकावर आंदोलनाची नौटंकी केल्याबद्दल,” अशी चपराक अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावली आहे.
हुतात्मा चौकात जाऊन माफी मागा म्हणावं, मराठी अस्मितेसाठी आवाज उठवणाऱ्या आंदोलकांना गोळ्या घालून १०६ बळी घेणाऱ्या पक्षाच्या मांडीवर बसल्याबद्दल. त्यांच्यासोबत त्याच हुतात्मा स्मारकावर आंदोलनाची नौटंकी केल्याबद्दल.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 6, 2025
हे ही वाचा..
अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये होळी कार्यक्रमाला परवानगी नाकारली
होळीच्या रंगाचा त्रास होत असेल तर मुस्लिमांनी घराबाहेर पडू नये
तहव्वूर राणाची तंतरली, म्हणतो, भारतात पाठवू नका, छळ करून मारतील!
दक्षिण आफ्रिका पुन्हा ठरले ‘चोकर्स’
मुंबईसह महाराष्ट्राच्या लढयादरम्यान राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते. याला विरोध करण्यासाठी म्हणून एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटन समोरील चौकात येणार होता. २१ नोव्हेंबर १९५६ रोजी सायंकाळी हा मोर्चा या भागात येणार होता. सरकारकडून जमावबंदी आदेश जारी करण्यात आला होता. या जमावबंदीला न जुमानता मोठ्या संख्येने मराठी लोक फ्लोरा फाऊंटेनच्या परिसरात जमा झाले होते. मोर्चाचे विशाल रूप पाहून परिस्थिती हाताबाहेर जाण्याचे संकेत मिळताच आपल्याच लोकांवर लाठीहल्ला करण्याचे आणि नंतर गोळीबाराचे आदेश पोलिसांना देण्यात आले. शांततापूर्वक आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी दिले होते. यात १०६ वीर पुत्रांना हौतात्म्य मिळाले.