महाराष्ट्रातील लातूर जिल्यात गुरुवारी (९ जुलै) पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. लातूर शहरासह निलंगा परिसरातील नागरिकांनी जमिनीला हलका कंप जाणवल्याचे सांगितले. मात्र, जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपात आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची नोंद नाही.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत माहितीलाच महत्त्व द्यावे, असे आवाहन केले आहे. तसेच भूकंपाचे धक्के जाणवल्यास तातडीने घराबाहेर पडून मोकळ्या जागी जावे, असा सल्लाही देण्यात आला आहे. जिल्हा आपत्कालीन संचालन केंद्राच्या माहितीनुसार, बुधवार-गुरुवार मध्यरात्रीनंतर हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्यांतही भूकंपाचे धक्के नोंदवले गेले. पहिला धक्का रात्री १.३७ वाजता, दुसरा २.१५ वाजता आणि तिसरा २.१७ वाजता जाणवला.
अधिकृत अहवालानुसार, या भूकंपांची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे ४.६, ३.६ आणि ३.९ इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्यातील वसमत तालुक्यातील शिरली गाव येथे होता. प्रशासनाने सांगितले की, प्राथमिक तपासात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
भूकंपाचे धक्के मध्यरात्री जाणवल्याने त्यावेळी बहुतांश नागरिक गाढ झोपेत होते. सलग धक्के जाणवल्यामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनाने सकाळपर्यंत आणखी काही सौम्य धक्के बसण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नसल्याचे सांगितले आहे. तसेच भूकंपाचा अचूक अंदाज आधीच वर्तवता येत नसल्याने नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
सरकारी नोकरी, संपत्तीच्या लालसेपोटी मुलीनेच रचला आईच्या हत्येचा कट
“भारत-पाक युद्ध अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर होते” ट्रम्प यांचा पुन्हा युद्ध थांबवल्याचा दावा
शांतता करार संपल्याच्या घोषणेनंतर अमेरिकेचे इराणवर पुन्हा हल्ले
कनेक्टिंग लिंकबाबतचा सगळा खोटारडेपणा समोर आला!
जिल्हाधिकारी राहुल कार्डिले यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवल्यास तात्काळ घराबाहेर पडून मोकळ्या जागी जावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. तसेच अफवांपासून दूर राहून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत केवळ अधिकृत माहितीलाच विश्वास ठेवावा.







