37 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
घरसंपादकीयवडेट्टीवारांनी केले जरांगेंच्या भाजपा प्रवेशाचे सुतोवाच...

वडेट्टीवारांनी केले जरांगेंच्या भाजपा प्रवेशाचे सुतोवाच…

Google News Follow

Related

विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. जरांगेच्या भाषेवर त्यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांच्या भाषेत गुर्मी असल्याचा दावाही केला आहे. राज्य सरकारने दिलेल्या आरक्षणात त्यांनी समाधान मानावे, मराठा समाजाला गृहीत धरू नये, अशी तंबीही दिली आहे. भविष्यात जरांगे भाजपामध्ये प्रवेश करतील असे भाकीत करून ते मोकळे झाले आहेत.

अंतरावली सराटीचे नवे पोप मनोज जरांगे यांनी गेल्या काही महिन्यांच्या आंदोलनात शिवराळ भाषा वापरली नाही, असा एकही नेता उरलेला नाही. फार शिक्षण नसलेला, फारशी समज नसलेला, कसे बोलावे याची पोच नसलेला हा नेता फक्त पाठीशी उभ्या असलेल्या गर्दीमुळे बेगुमान झाला आहे. अंतरावलीच्या उपोषण मंचावरून गोधडीत लोळता लोळता विरोधात बोलणाऱ्या प्रत्येकाविरुद्ध शेलक्या शब्दांच्या पिचकाऱ्या सोडण्याचे काम हा माणूस करतोय. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतरही जनतेला वेठीस धरण्याचा उद्योग याने बंद केलेला नाही. बहुधा जोपर्यंत मालक गप्प राहा म्हणून सांगत नाही तोपर्यंत हा थांबेल असे दिसत नाही.

ऐन परीक्षेच्या मौसमात रस्ता रोको करण्याचे आदेश देणाऱ्या या नेत्याची समज आता लोकांच्या लक्षात आली आहे. रास्ता रोकोवर टीका झाल्यानंतर त्याने रास्ता रोको कोणत्या वेळी करावा याचे वेळापत्रक जारी केले. जरांगेच्या या कारवाया राज्य सरकारला पेचात पकडणाऱ्या आहेत, असा विचार करून विरोधी पक्ष आधी जरांगेना पाठिंबा देत होते. आता मात्र त्यांच्याही डोक्यावरून पाणी गेल्याचे वडेट्टीवार यांच्या विधानावरून स्पष्ट झालेले आहे. गोधडीवाले बाबा गुर्मीत आहेत, अशी टीका वडेट्टीवार यांनीच केली आहे. त्यांचा पुढचा दावा मात्र भाजपाच्या समर्थकांना चक्रावणारा आहे. जरांगे यांचा हार्दिक पटेल होईल, असे वडेट्टीवार म्हणाले आहेत.

जरांगे आणि हार्दिक पटेल यांच्यात काही साम्यस्थळे निश्चित आहेत. पाटीदार आंदोलनामुळे युवा नेता म्हणून हार्दिक पटेल यांचा नावलौकिक झाला. पाटीदारांचा नेता म्हणून त्यांची लाट निर्माण झाल्यावर त्यांनी आधी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याच काळात त्यांची सेक्स सीडी बाहेर आली. ही सीडी भाजपाने व्हायरल केली असा दावा त्यांच्या समर्थकांनी केला होता. त्याच समर्थकांना पेचात टाकत हार्दिक पटेल भाजपामध्ये प्रवेश करते झाले, आज ते आमदार आहेत.

वडेट्टीवार जेव्हा म्हणतात की जरांगेंचा हार्दिक पटेल होईल त्याचे अनेक अर्थ निघतात. वडेट्टीवारांना नेमका कोणत्या काळातला हार्दिक अपेक्षित आहे, कळायला मार्ग नाही. पाटीदार आंदोलनात भाजपावर सडकून टीका करणारा की त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला की सीडी निघालेला? हार्दिक पटेल सध्या आमदार आहेत. काही काळापूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. हा अलिकडच्या काळातील हार्दिक वडेट्टीवारांना अपेक्षित आहे का? वडेट्टीवार यांच्या विधानामुळे अनेकांना गोंधळात टाकलेले आहे. जरांगे यांचा हार्दिक होईल, या वाक्याची टोटल कोणालाही लागताना दिसत नाही.

जरांगे आधीच वैतागलेले आहेत. बारस्कर बुवा आणि वानखेडे बाई यांनी जरांगेंची पोलखोल केलेली असताना आता विरोधी पक्ष नेता आपली खरडपट्टी काढतोय हे पाहून त्यांनाही चेव आला आहे. जरांगेंचे एक वैशिष्ट्य आहे ते मुख्यमंत्र्यांपासून विरोधी पक्ष नेत्यापर्यंत कोणाबाबतही आदराने बोलत नाहीत. सर्वांचा एकेरी उल्लेख. अंतरावलीचे पोप जॉन पॉल आहोत असा त्यांनी स्वत:चा समज करून घेतल्यामुळे त्यांनी वडेट्टीवारांचाही तसाच समाचार घेतला आहे. तू नीट राहा, असा दम त्यांनी वडेट्टीवार यांना भरला आहे. राहुल गांधींनी तुला असे बोलायला सांगितले आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे.
जरांगे बहुधा भुजबळ यांनी सांगितल्याप्रमाणे गोधडीच्या आतून सर्व चॅनलच्या बातम्या ऐकत असतात आणि कोणी विरोधात बोलले तर गोधडीबाहेर डोकं काढून बोलणाऱ्यांचा समाचार घेत असतात.

हे ही वाचा:

‘महानंद’वरून पुन्हा विरोधकांची आग पाखड

“कधीही छत्रपतींचे नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला”

उत्तर प्रदेशात ट्रॅक्टर ट्रॉली तलावात पडून भीषण अपघात; १५ भाविक ठार

बहीण, आईला छळणाऱ्यांना रोखणाऱ्या अल्पवयीन मुलावर गोळीबार

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळलास आणि महाराष्ट्रात अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न केलास तर खबरदार, असे जरांगेनाही कोणी तरी एकेरी उल्लेख करून सांगण्याची गरज आहे. संयमी आणि विचारी मराठा समाज फार काळ या उर्मट नमुन्याला सहन करेल असे वाटत नाही. कारण मराठ्यांना सरकारने आरक्षण दिले आहे. मराठा समाजाचा सरकारवर विश्वास आहे. जरांगेचा हार्दिक होण्याची शक्यता नाही. त्यांचा राकेश टीकैत होण्याची शक्यता जास्त. राकेश टीकैत होणे म्हणजे ना घर का न घाटका. ना धड किसान नेता, ना राजनेता.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा