27 C
Mumbai
Monday, September 16, 2024
घरसंपादकीयनो वन किल्ड दिशा...

नो वन किल्ड दिशा…

आदित्य ठाकरे यांचे नाव या प्रकरणात आल्याने लोकांच्या मनात संशय बळावत चालला आहे.

Google News Follow

Related

महाराष्ट्र विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये सुरूवात झालेली आहे. पत्रकार परिषदातून महायुती सरकारच्या अपयशावर टिकेची झोड उठवणारे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे दोघेही पहिल्या दिवशी गैरहजर राहिले. दिशा सालियानच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गेल्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीची घोषणा केली होती. एसआयटीसमोर आदित्य ठाकरेंची चौकशी करा, अशी मागणी होते आहे. आदित्य ठाकरे याप्रकरणी स्वत: चौकशीला सामोरे गेले असते तर एव्हाना संशयाचे धुके कधी फिटले असते. भाजपा नेते आशीष शेलार यांनी तशी सूचनाही केली आहे. परंतु ठाकरे ती मनावर घेतील अशी सुतराम शक्यता नाही.

विधिमंडळ हे असे व्यासपीठ आहे जिथे सत्ताधारी आणि विरोधक जनतेचे प्रश्न मांडतात. विरोधकांकडे सरकारचे अपयश चव्हाट्यावर मांडण्याची अतिरिक्त जबाबदारी असते. ठाकरेंचा या व्यवस्थेवर फारसा विश्वास दिसत नाही. या दोघांनी संपूर्ण अधिवेशात हजेरी लावली, जनतेचे प्रश्न मांडून स्वत:ची छाप पाडली असे चित्र आजतागातयत तरी दिसलेले नाही. हे चित्र पाहायला महाराष्ट्राची जनता आसुसलेली आहे.

 

पत्रकारांसमोर आरोप करणे सोपे असते, कारण मराठी मीडियाचे पत्रकार ठाकरेंना अडचणीत आणणारा प्रश्न विचारण्याची शक्यता अजिबातच नसते. सभागृहात मात्र ही सोय नसते. तिथे तर तुमच्याकडे योग्य माहिती नसेल तर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा अभ्यासू नेता तुमचे तात्काळ वस्त्रहरण करू शकतो. आदित्य ठाकरे दुबईत संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पुढाकाराने आय़ोजित करण्यात आलेल्या जलवायू परिवर्तन परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी गेलेले आहेत. वडील मुख्यमंत्री असताना जागतिक आरोग्य संघटनेला सल्ला द्यायचे, आता चिरंजीव जगाला पर्यावरणासंबंधी धडे देतायत.

 

विधिमंडळ अधिवेशनासारख्या चिल्लर विषयांकडे लक्ष द्यायला या बाप बेट्यांकडे वेळ नाही. जेव्हा जागतिक स्तरावर एखाद्या गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी एखाद्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन होते तेव्हा सरकारचे प्रतिनिधी, अधिकारी किंवा त्या क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी होत असतात. कारण त्या विषयाचे त्यांना ज्ञान असते किंवा त्यासंबंधी निर्णय घेण्याचा अधिकार असतो. त्यामुळे आदित्य ठाकरे तिथे का गेले हा संशोधनाचा विषय आहे. राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनापेक्षा या उचापतींना वेळ देणे हे लोकशाही व्यवस्था आणि संस्थांवर त्यांना फारसा विश्वास नाही, हेच स्पष्ट करते.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर घणाघात केलेला आहे. दिशा सालियन प्रकरणात आदित्य यांच्या सहभाग आहे, गृहखात्याकडे त्यांच्याविरोधात पुरावे आहेत, असे शिरसाट म्हणाले आहेत. शिरसाट जे काही म्हणाले ते गंभीर आहे. लोकांच्या मनात दिशा सालियन प्रकरणी जो संशय आहे, तो संशय अधिक बळकट करणारे हे वक्तव्य आहे.

 

दिशा सालियन प्रकरण केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी लावून धरलेले आहे. भाजपा नेते आशीष शेलार आणि शिवसेना आमदार संजय शिरसाट हे नेते आज या मुद्द्यावर परखड बोललेले आहेत. आदित्य यांनी स्वत: चौकशीला सामोरे जावे अशी सूचना शेलार यांनी केलेली आहे. शिरसाट तर या प्रकरणात आदित्य यांचा सहभाग आहे, असे ठामपणे म्हणालेले आहेत.

 

मविआचे सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर जेव्हा जलयुक्त शिवार प्रकरणी किंवा सुधीर मुनगंटीवार यांच्यावर वनीकरण घोटाळा प्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेव्हा या दोघांनी समोरून चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दाखवली होती. आदित्य ठाकरे आणि त्यांचा पक्ष मात्र सूडाचे राजकारण अशी ओरड करत चौकशीपासून पळ काढत आहेत. करा चौकशी दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊ दे, असे आदित्य एकाही प्रकरणात म्हणालेले नाहीत.

हे ही वाचा:

वाराणसीत एकाच कुटुंबातील ४ जणांची सामूहिक आत्महत्या!

हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकरची अधिवेशनात ‘एन्ट्री’!

लग्नात हुंडा मागितल्याने केरळच्या २६ वर्षीय महिला डॉक्टरची आत्महत्या!

‘अशोक गेहलोत, पोलिसांनी सुरक्षा पुरवली नाही’

आदित्य ठाकरे बॉलिवूडच्या वर्तुळात रमणारे नेते आहेत. दिनो मोरया, सूरज पंचोली अशा अभिनेत्यांच्या गोतावळ्यात ते कायम असतात. त्यांना बॉलिवूडच्या गोतावळ्यात रमवणारा राहुल कनाल सध्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करता झालेला आहे. त्यामुळे दिशा सालियन प्रकरणात नेमके काय घडले होते. ८ जून २०२० रोजी मालाड प. येथील इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून जेव्हा ती पडली तेव्हा तिथे कोण कोण हजर होते, याबाबत कनाल यालाही माहीत असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्याचीही याप्रकरणी चौकशी होणे गरजेचे आहे.

संजय शिरसाट म्हणतात, गृहखात्याकडे याप्रकरणी पुरावे आहेत. आदित्य यांचा दिशा प्रकरणात सहभाग आहे. शिरसाट यांच्या दोन्ही विधानात कोणत्याही प्रकारची संदिग्धता नाही. मग प्रश्न निर्माण होतो की पुरावे असतील तर आदित्य ठाकरे यांची चौकशी का होत नाही? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या अधिवेशनात एसआय़टी मार्फत या प्रकरणाच्या चौकशीची घोषणा केली होती. गेल्या काही महिन्यांत एसआयटीने नेमका काय तपास केला? नव्याने केलेल्या तपासात त्यांना नेमके काय आढळले? एसआय़टीसमोर अजून आदित्य यांना का बोलावण्यात आले नाही? असे अनेक प्रश्न लोकांना पडलेले आहेत.

 

दिशा सालियनचा अपघाती मृत्यू ८ जून २०२० रोजी झाला. सुशांत सिंह राजपूत यांची कथित आत्महत्या अवघ्या सहा दिवसांच्या फरकाने झाली. लोकांच्या मनात या दोन्ही घटनांबाबत संशयाचे धुके आहे. या दोन्ही प्रकरणात काही तरी दडपण्याचा प्रयत्न झालेला आहे. पोलिसांनी या दडपादडपी प्रकरणी राज्य सरकारमधील काही प्रभावी लोकांची मदत केली, असा संशय आहे. मविआच्या काळात झालेल्या या दोन्ही मृत्यूप्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. लोकांच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तर मिळायला हवी.

राशिद खान पठाण या व्यक्तिने याप्रकरणात आदित्य ठाकरे यांची चौकशी व्हावी म्हणून मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केलेली आहे. दिल्लीत काही वर्षांपूर्वी झालेल्या खून प्रकरणावर बेतलेला नो वन किल्ड जेसिका हा सिनेमा आला होता. एक सत्य घटना, ज्यात प्रभावशाली व्यक्तिकडून करण्यात आलेली हत्या दडपण्याचा यशस्वी प्रयत्न झालेला आहे. या प्रकरणाची पोलखोल एक पत्रकार तरुणी करते. दोषीला अखेर शासन होते. हा सिनेमा प्रचंड गाजला. दिशा आणि सुशांतच्या प्रकरणात जे काही आरोप प्रत्यारोप होतायत, त्यावरून इथेही जेसिका प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे का, असा संशय लोकांच्या मनात बळावत चाललेला आहे. या प्रकरणाचे राजकारण होऊ नये, सरकारने जनतेच्या संयमाचा बांध तुटेपर्यंत प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा