अमेरिकेतील फिलाडेल्फिया शहरातून भारतीय समुदायाला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तेलंगणातील २८ वर्षीय अंशुल कुंचा या तरुणाची फेक पिझ्झा ऑर्डरच्या माध्यमातून सापळ्यात ओढून डोक्यात गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अंशुलच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अंशुल कुंचा हा गेल्या चार वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास होता. चांगल्या करिअरच्या शोधात तो अमेरिकेत गेला होता आणि एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी तो सुटीच्या दिवशी पिझ्झा डिलिव्हरीचे कामही करत असे. नेहमीप्रमाणे त्याला एका ग्राहकाकडून पिझ्झा डिलिव्हरीची ऑर्डर मिळाली. ऑर्डरनुसार तो दिलेल्या पत्त्यावर पोहोचला, मात्र तेथे त्याची वाट पाहत होता मृत्यूचा सापळा.
हे ही वाचा:
‘कट मनी परत करा’ म्हणत तृणमूलच्या आमदार मदन मित्रांवर अंडीफेक
AI बबल फुटतोय की बाजार वास्तवाच्या दिशेने?
मालवीय नगर अग्निकांडानंतर दिल्लीत MCD ची मोठी कारवाई
दिल्ली अग्निकांडात कुक केशव नेगीचा मोठा खुलासा
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, अंशुल घटनास्थळी पोहोचताच एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर अचानक गोळीबार केला. हल्लेखोराने थेट त्याच्या डोक्याला लक्ष्य करत अनेक गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झालेल्या अंशुलचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गोळीबारानंतर आरोपी फरार झाला. विशेष म्हणजे, अंशुलजवळील मोबाईल, पाकीट आणि इतर मौल्यवान वस्तूंना कोणताही हात लावण्यात आला नव्हता. त्यामुळे ही केवळ लुटमारीची घटना नसून पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकते, असा संशय व्यक्त केला जात आहे.
अंशुलच्या कुटुंबीयांनीही या हत्येबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याच्या बहिणीने सांगितले की, ज्या पत्त्यावर पिझ्झा डिलिव्हरीसाठी अंशुलला बोलावण्यात आले होते, तो पत्ता आणि ऑर्डर दोन्ही बनावट असल्याचे दिसून आले आहे. अंशुलला मुद्दाम त्या ठिकाणी बोलावून त्याची हत्या करण्यात आल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास केवळ हत्येपुरता मर्यादित न ठेवता त्यामागील संपूर्ण कट उघड करण्याची मागणी केली जात आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच भारतीय वाणिज्य दूतावासाने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला असून कुटुंबाला आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. अंशुलचा मृतदेह भारतात आणण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे, फिलाडेल्फिया पोलिसांनी हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक नेमले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांची तपासणी सुरू केली आहे.
अमेरिकेत शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी जाणाऱ्या भारतीयांची संख्या मोठी आहे. मात्र अंशुल कुंचाच्या हत्येने परदेशातील भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. एका फेक पिझ्झा ऑर्डरमुळे एका तरुणाचे आयुष्य क्षणात संपले आणि त्याच्या कुटुंबाची स्वप्ने उद्ध्वस्त झाली. आता या हत्येचा उलगडा होऊन दोषींना कठोर शिक्षा मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







