अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा सूत्रे हाती घेतल्यापासून ते अनेक महत्त्वाचे आणि वादग्रस्त निर्णय घेत आहेत. अशातच आता डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंता आणि कॅम्पसमधील कथित गैरवर्तनाचे कारण देत हार्वर्ड विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी असलेले प्रमाणपत्र रद्द केले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. गृह सुरक्षा विभागाकडून विद्यापीठाची सुरू असलेली चौकशीचे कारण पुढे करत हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
ट्रम्प प्रशासनाने गुरुवारी हार्वर्ड विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यास बंदी घातली आहे. गृह सुरक्षा सचिव क्रिस्टी नोएम यांनी विद्यापीठाला यासंदर्भात एक पत्र पाठवले आहे. तसेच त्यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, हे प्रशासन हार्वर्डला हिंसाचार, यहूदी- विरोधी भावनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या कॅम्पसमध्ये चिनी कम्युनिस्ट पक्षाशी समन्वय साधण्यासाठी जबाबदार धरत आहे. विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे हा विशेषाधिकार आहे, अधिकार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तर, हार्वर्ड विद्यापीठाला पाठवलेल्या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, जर हार्वर्डला येत्या शैक्षणिक वर्षाच्या आधी ही बंदी नको असल्यास त्यांनी ७२ तासांच्या आत आवश्यक माहिती प्रदान करावी. ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयामुळे विद्यमान विद्यार्थ्यांना इतर विद्यापीठांमध्ये स्थानांतरित करण्यास भाग पाडले जाईल किंवा त्यांचा कायदेशीर दर्जा गमावावा लागेल, असे गृह सुरक्षा विभागाने म्हटले आहे.
हार्वर्ड विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची नोंदणी रोखण्याच्या अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाच्या निर्णयावर टीका केली आहे. एका अधिकृत निवेदनात, हार्वर्डने या निर्णयाला बेकायदेशीर म्हटले आहे. १४० हून अधिक देशांमधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना पाठिंबा देत राहील असेही म्हटले आहे. ही कारवाई एक सूडाची कारवाई असून यामुळे विद्यापीठाला गंभीर नुकसान होण्याची भीती आहे.
हे ही वाचा..
वैष्णवी हागवणेचे सासरे, दीर सापडले, पोलिसांनी केली अटक
जेव्हा सिंदूर दारुगोळा बनतो, तेव्हा काय होते ते शत्रूने पाहिले!
पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी
जम्मू- काश्मीरच्या किश्तवाडमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा
विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, हार्वर्डने २०२४- २०२५ शैक्षणिक वर्षात जवळपास ६,८०० आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची नोंदणी केली, जी एकूण नोंदणीच्या २७% आहे. दरवर्षी, ५००-८०० भारतीय विद्यार्थी आणि विद्वान हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेतात, अशी विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटनुसारची माहिती आहे. सध्या, भारतातील ७८८ विद्यार्थी हार्वर्ड विद्यापीठात नोंदणीकृत आहेत.







