जम्मू- काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. गुरुवार, २२ मे रोजी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सकाळी ७ वाजताच्या सुमारास लष्कराच्या ११ राष्ट्रीय रायफल्स (११ आरआर), २ पॅरा स्पेशल फोर्सेस, ७ व्या आसाम रायफल्स आणि किश्तवाड एसओजी (स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप) च्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
किश्तवाड जिल्ह्यात सिंगपोरा चतरूच्या जंगलात लष्कराच्या ११ राष्ट्रीय रायफल्स (११ आरआर), २ पॅरा स्पेशल फोर्सेस, ७ व्या आसाम रायफल्स आणि किश्तवाड एसओजी (स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप) च्या पथकांनी शोध मोहीम सुरू केली होती. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून चकमक सुरू झाली. बराच वेळ सुरू असलेल्या चकमकीनंतर दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. या भागात आता अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागातील नादिर गावात एका आठवड्यापूर्वी झालेल्या दहशतवादविरोधी कारवाईत जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना ठार केले होते. त्यांची ओळख आसिफ अहमद शेख, अमीर नीर वाणी आणि यावर अहमद भट अशी झाली आहे. हे सर्व जण पुलवामा येथील रहिवासी होते. याव्यतिरिक्त, १३ एप्रिल रोजी शोपियानमधील जिनपथर केलर भागात झालेल्या आणखी एका चकमकीत, लष्कर-ए-तैयबाचे तीन दहशतवादी मारले गेले, त्यापैकी दोघांची ओळख शाहिद कुट्टे आणि अदनान शफी अशी झाली होती.
हेही वाचा..
“दहशतवादी पाकिस्तानात असतील तर, जिथे असतील तिथेच मारू”
मसाला निर्यातीला चालना देण्यासाठी सरकारची योजना बघा
‘पातालगरुडी’: एक जादुई वनस्पती
२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर, दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी सुरक्षा दलांनी अनेक मोठ्या कारवाया सुरू केल्या आहेत.
