पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची ई-मेलद्वारे धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. धमकी मिळताच उच्च न्यायालयाच्या परिसरात तातडीने सावधगिरीचे पाऊल उचलण्यात आले असून, संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे. पोलिसांनी बॉम्ब शोध पथक आणि स्नायपर डॉग्सच्या मदतीने तपासणी मोहीम सुरू केली आहे.
मुख्य न्यायाधीश, वकील व उपस्थित सर्व व्यक्तींना बाहेर पाठवण्यात आले आहे आणि कोणालाही आत प्रवेश करण्याची परवानगी दिली जात नाही. चंदीगड पोलिसांचे सर्व वरिष्ठ अधिकारी उच्च न्यायालय परिसरात पोहोचले आहेत आणि सुरक्षेची पाहणी करत आहेत. पंजाब विधानसभा व सचिवालयासह परिसरातील इतर संवेदनशील भागांतही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
हेही वाचा..
जम्मू- काश्मीरच्या किश्तवाडमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा
पीरपैंती रेल्वे स्टेशनचे रुपडे बदलले !
पाकिस्तान अस्तित्वात आल्यापासून भारताविरुद्ध कट करतोय
पंजाब हरियाणा उच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष सरतेज नरूला यांनी सांगितले की, ईमेलद्वारे कोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला असून, सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि बॉम्ब शोध पथक घटनास्थळी उपस्थित आहेत. ते पुढे म्हणाले, “दररोज सुमारे ६ ते ७ हजार वकील आणि सुमारे ५ हजार नागरिक इथे येतात. त्यामुळे अशा प्रकारची धमकी अतिशय गंभीर आहे.
नरूला यांनी यासंदर्भात मुख्य न्यायाधीशांकडे विनंती केली होती की, एखाद्या वकिलाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहायचे ठरवले, तर त्याला परवानगी द्यावी आणि जर कोणी वकील प्रत्यक्ष उपस्थित राहू शकला नाही, तर त्याच्याविरोधात कोणताही आदेश दिला जाऊ नये. सध्या पाकिस्तान आणि भारत यांच्यात तणावपूर्ण वातावरण आहे. अशा परिस्थितीत सीमावर्ती राज्य असलेल्या पंजाबमधील उच्च न्यायालयाला धमकी मिळणे केंद्र आणि राज्य सरकारांसाठी गंभीर चिंतेचा विषय आहे.
