गुरुवारी राजस्थानच्या बिकानेर येथे सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचा खरपूस समाचार घेतला. पाकिस्तानवर कठोर शब्दात टीका करत नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. तसेच भारतीय सशस्त्र दलांच्या कारवाईचे त्यांनी कौतुक केले.
सैन्यांनी निर्माण केलेल्या चक्रव्यूहामुळे पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “२२ तारखेला झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही २२ मिनिटांत दहशतवाद्यांचे नऊ सर्वात मोठे तळ उध्वस्त केले. जेव्हा सिंदूर दारूगोळ्यात बदलतो तेव्हा काय होते हे शत्रूंनी पाहिले. पहलगाममध्ये निष्पाप लोकांच्या मृत्यूने १४० कोटी देशवासीयांच्या हृदयाला जखम झाली होती. यानंतर, देशातील प्रत्येक नागरिकाने एकजूट होऊन दहशतवाद्यांचा नायनाट करण्याचा संकल्प केला. तुमच्या आशीर्वादाने आणि देशाच्या सैन्याच्या शौर्याने, या प्रतिज्ञेचे पालन केले आहे. सरकारने तिन्ही दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले. तिन्ही सैन्यांनी मिळून असा चक्रव्यूह निर्माण केला की पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले,” असे नरेंद्र मोदी म्हणाले.
सिंदूर पुसण्यासाठी निघालेल्यांना मातीत गाडण्यात आले
पुढे मोदी म्हणाले की, “जे सिंदूर पुसण्यासाठी निघालेले त्यांना मातीत गाडण्यात आले. ज्यांनी भारताचे रक्त सांडले त्यांना प्रत्येक थेंबाची किंमत मोजावी लागली आहे. ज्यांना वाटलेले की, भारत गप्प बसेल ते आता त्यांच्या घरात लपून बसलेत. ज्यांना त्यांच्या शस्त्रांचा अभिमान होता ते आता त्यांच्याच ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत,” अशा कठोर शब्दात नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला. पुढे नरेंद्र मोदी म्हणाले की, जरी ते शांत आणि संयमी असले तरी, राष्ट्राचा प्रश्न येतो तेव्हा त्यांचे रक्त उत्साह आणि दृढनिश्चयाने उसळलेले असते. त्यांच्या नसांमध्ये केवळ रक्तच वाहत नाही तर ते गरम सिंदूर वाहते, जे त्यांच्या वचनबद्धतेचे आणि उर्जेचे प्रतीक आहे.
पाकिस्तानकडून दहशतवादाचा शस्त्र म्हणून वापर
पाकिस्तान कधीही भारताविरुद्ध थेट युद्ध जिंकू शकत नाही, म्हणूनच ते दहशतवादाचा शस्त्र म्हणून वापर करण्याचा प्रयत्न करतात, भारताच्या स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांपासून ही रणनीती अस्तित्वात आहे, असं म्हणत नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर टीकास्त्र डागले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाचा सामना करण्यासाठी तीन तत्वे निश्चित केली आहेत. पाहिलं म्हणजे भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर त्याला योग्य उत्तर दिले जाईल. वेळ, पद्धत आणि परिस्थिती आपले सैन्य ठरवेल. दुसरे म्हणजे, भारत अणुबॉम्बच्या धमक्यांना घाबरणार नाही. तिसरे, आपण दहशतवादाचे सूत्रधार आणि दहशतवादाला आश्रय देणारे सरकार यांना वेगळे म्हणून पाहणार नाही; आपण त्यांना एकच मानू. पाकिस्तानचा हा खेळ आता चालणार नाही,” असा इशारा त्यांनी पाकिस्तानला दिला आहे.
हे ही वाचा..
पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी
जम्मू- काश्मीरच्या किश्तवाडमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा
पीरपैंती रेल्वे स्टेशनचे रुपडे बदलले !
पाकिस्तान अस्तित्वात आल्यापासून भारताविरुद्ध कट करतोय
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रेल्वे, रस्ते, वीज, पाणी आणि नवीन आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रातील अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या प्रकल्पांचा एकूण खर्च २६,००० कोटी रुपये आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकसित देशनोक स्टेशनचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी केले आणि बिकानेर-मुंबई एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ८६ जिल्ह्यांमध्ये १,१०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या १०३ पुनर्विकसित अमृत स्थानकांचे उद्घाटन करण्यात आले.
