परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी नव्या उपक्रमाची घोषणा केली आहे. या अंतर्गत भारत आणि भूतान या दोन देशांमध्ये रेल्वे कनेक्टिव्हिटी स्थापन करण्यात येणार आहे. भारत आणि भूतान यांच्यात रेल्वे कनेक्टिव्हिटी स्थापनेसाठी एक मोठा नवीन उपक्रम सुरू आहे, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमवेत दिल्लीत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत विक्रम मिस्री म्हणाले.
बहुप्रतिक्षित भारत- भूतान रेल्वे प्रकल्पाला अधिकृत मान्यता मिळाली आहे, ज्यामुळे भूतानला पहिल्यांदाच रेल्वेने प्रवास करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय रेल्वेच्या नेतृत्वाखालील या क्रॉस- बॉर्डर रेल्वे उपक्रमामुळे भारत- भूतान थेट रेल्वे लिंक स्थापित होईल, ज्यामुळे सीमेपलीकडील वाहतूक वाढेल आणि दोन्ही राष्ट्रांमधील राजनैतिक आणि आर्थिक संबंध मजबूत होतील. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारत- भूतान रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रकल्पाची माहिती दिली. त्यांनी कोक्राझार ते गेलेफू आणि बनारहाट ते समत्से या दोन प्रमुख भूतानी शहरांना जोडणाऱ्या ८९ किमी लांबीच्या रेल्वे मार्गांसाठी ४,०३३ कोटी रुपयांची गुंतवणूक असल्याचे म्हटले आहे. गेलेफू हे माइंडफुलनेस सिटी म्हणून विकसित केले जात आहे, तर समत्से हे औद्योगिक केंद्र आहे.
भारत आणि भूतान यांच्या द्विपक्षीय संबंधांवर प्रकाश टाकताना विक्रम मिस्री म्हणाले की, “भारत आणि भूतानमध्ये विश्वास, परस्पर आदर आणि समजूतदारपणाचे नाते आहे. हे नाते सांस्कृतिक, विकासात्मक आणि सुरक्षा हितसंबंधांवर आधारित आहे. हे संबंध उच्च पातळीवर अतिशय जवळच्या संपर्कातून दिसून येतात. गेल्या वर्षी मार्च २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानला भेट दिली तेव्हा त्यांना ऑर्डर ऑफ द डुक याल्पो प्रदान करण्यात आला, जो भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच भूतानचे राजा आणि पंतप्रधान दोघेही भारताशी जवळून संबंध ठेवत आहेत. महामहिम, भूतानचे राजा आणि भूतानचे पंतप्रधान नियमितपणे भारताला भेट देत आहेत. महामहिम राजा यापूर्वी महाकुंभात सहभागी होण्यासाठी येथे आले होते आणि पंतप्रधान काही आठवड्यांपूर्वीच राजगीरमधील भूतान मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी येथे आले होते, असे मिस्री म्हणाले.
हे ही वाचा :
मेलोनी यांच्या आत्मचरित्राच्या भारतीय आवृत्तीची नरेंद्र मोदींनी लिहिली प्रस्तावना
अहिल्यानगरात ‘आय लव्ह मोहम्मद’च्या रांगोळीवरून तणाव; मुस्लिमांचा रास्तारोको, दगडफेक!
फरार शातिर ठगाला जम्मू-कश्मीरच्या सोपोरमध्ये अटक
भूतानच्या विकासात भारताच्या भूमिकेबद्दल बोलताना, मिस्री यांनी म्हटले की, भारत सरकार भूतानला विकासात्मक मदत देणारा सर्वात मोठा देश आहे आणि त्याच्या आधुनिकीकरणात, विशेषतः पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात आणि देशाच्या एकूण आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. २०२४ ते २०२९ पर्यंत चालणाऱ्या भूतानच्या १३ व्या पंचवार्षिक योजनेसाठी, भारत सरकारने १०,००० कोटी रुपयांचे पाठबळ देण्याचे वचन दिले आहे, ज्यामध्ये प्रकल्प-व्यापी सहाय्य, उच्च-प्रभावी समुदाय विकास प्रकल्प, आर्थिक प्रोत्साहन कार्यक्रम आणि कार्यक्रम अनुदान समाविष्ट आहे. आणि ही रक्कम १२ व्या पंचवार्षिक योजनेच्या आकडेवारीपेक्षा १०० टक्के वाढ आहे, असे ते पुढे म्हणाले.







