ऑपरेशन सिंदूर मोहिमेत भारताने ज्या पद्धतीने पाकिस्तानला दणका दिला, त्याचे पडसाद रोज विविध स्तरावर उमटत असल्याचे पाहायला मिळते. १० मे रोजी भारताने पाकिस्तानातील एअर बेस उद्ध्वस्त केले. त्याची सगळी छायाचित्रे भारतीय सेनादलांनी प्रसिद्ध केल्यानंतर पाकिस्तानची पुरती नाचक्की झाली. आता ती गेलेली प्रतिष्ठा झाकण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे.
इंडिया टुडेने यासंदर्भात दिलेल्या बातमीत हे स्पष्ट होते आहे की, नव्या सॅटेलाइट प्रतिमांनुसार, पाकिस्तानने किमान तीन हवाई तळांवर – मुरिद (पंजाब), जैकबाबाद (सिंध) आणि भोलारी (सिंध) – नुकसान झाकण्यासाठी तारपॉलिन आणि आच्छादनांचा वापर सुरू केला आहे.
-
भोलारी एअर बेस (सिंध):
४ जूनच्या हाय-रेझोल्युशन प्रतिमांमध्ये एक उद्ध्वस्त हँगर आता मूळ छतासारख्या रंगात आच्छादित दिसतो.
ही लपवाछपवी सौंदर्यासाठी नाही तर ती आहे पुराव्यांना झाकण्यासाठीचा एक अपयशी प्रयत्न. -
मुरिद बेस (पंजाब):
२ जूनच्या प्रतिमांमध्ये, एक हिरव्या रंगाची तारपॉलिनने झाकलेली इमारत दिसते – जी १० मे रोजीच्या हल्ल्यात लक्ष्य बनली होती. विशेष बाब म्हणजे – ३ मीटर रुंद खड्डा, जो अणू केंद्राजवळ आहे, तोही तंबूखाली झाकलेला आढळतो. -
जैकबाबाद PAF बेस (शहबाज):
इथे F-16 फायटर जेट्स असतात. ४ जूनला घेतलेल्या प्रतिमांमध्ये छताचा काही भाग झाकलेला असून, ११ मेच्या प्रतिमांमध्ये दिसलेला ढिगाराही नाहीसा झालेला आहे.
जवळपास डझनभर लष्करी ठिकाणी नुकसान स्पष्ट दिसत असूनही, पाकिस्तानने नेहमीप्रमाणे नकार, दिशा बदल आणि प्रचार याचा वापर सुरू ठेवला आहे. भारतीय लढाऊ विमाने पाडल्याचे अप्रमाणित दावे करून देशांतर्गत जनतेचे लक्ष विचलित केले जात आहे. पण सगळ्या जगापुढे पुरावे आलेले आहेत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने आपल्या लष्करप्रमुखाची फील्ड मार्शलपदी पदोन्नती केली आहे – एक असाधारण आणि दुर्लभ गोष्ट. ही पावले प्रत्यक्षात “पराभव लपवण्याचा प्रयत्न” म्हणून पाहिली जात आहेत.
