पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्रा यांना हिसार कोर्टाकडून मोठा झटका बसला आहे. कोर्टाने ज्योतीला जामीन देण्यास नकार दिला आहे. कोर्टाने युट्यूबरची जामीन याचिका फेटाळली आहे. ज्योती मल्होत्राचे वकील कुमार मुकेश यांनी जामीन अर्ज दाखल केला होता.
तत्पूर्वी, हिसार न्यायालयाने सोमवारी (९ जून) ज्योती मल्होत्राच्या न्यायालयीन कोठडीची मुदत वाढवली. तसेच, तिच्या खटल्याची सुनावणी २३ जून रोजी निश्चित करण्यात आली आहे. ज्योती मल्होत्राचे वकील कुमार मुकेश यांनी सांगितले की, न्यायालयाने तिची न्यायालयीन कोठडी वाढवली आहे आणि या प्रकरणातील पुढील सुनावणीसाठी २३ जूनची तारीख निश्चित केली आहे.
हिसार पोलिसांनी १६ मे रोजी हेरगिरीच्या संशयावरून मल्होत्राला अटक केली होती. नंतर न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली, जी नंतर चौकशीसाठी आणखी चार दिवसांनी वाढवण्यात आली. २६ मे रोजी न्यायालयाने ज्योती मल्होत्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
दरम्यान, ज्योती मल्होत्रा ही हरियाणातील हिसार येथील एक युट्यूबर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. तिच्यावर पाकिस्तानसाठी भारताची हेरगिरी करण्याचा आरोप आहे. तिच्यावर भारताची संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला शेअर केल्याचा आरोप आहे. यामध्ये विशेषतः लष्करी कारवाया आणि ठिकाणांशी संबंधित माहितीचा समावेश होता.
२०२३ मध्ये पाकिस्तान व्हिसासाठी ज्योतीची दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात एहसान-उर-रहीम उर्फ दानिशशी भेट झाली होती. दानिश हा तो माणूस होता, ज्याला १३ मे २०२५ रोजी भारत सरकारने हेरगिरीच्या आरोपाखाली हद्दपार केले होते. ज्योतीने दानिश आणि इतर पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांशी, जसे की शाकीर आणि राणा शाहबाज यांच्याशी संपर्क कायम ठेवला. ज्योतीने पाकिस्तानी एजंटना गोपनीय माहिती पाठवण्यासाठी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला.
हे ही वाचा :
भारताने केलेल्या वस्त्रहरणानंतर पाकिस्तानने ‘झाकली’ लाज
राजा रघुवंशीच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याची सोनमची कबुली, पुरावे पाहून रडली!
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, तंबाखू थुंकणे महागडे
दरम्यान, ज्योती आणि तिचे वकील कुमार मुकेश यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत आणि ती निर्दोष असल्याचे म्हटले आहे. ज्योतीचे वडील हरीश मल्होत्रा यांनीही सांगितले की त्यांच्या मुलीला फसवले जात आहे आणि ती फक्त सहलीसाठी पाकिस्तानला गेली होती.
